०१. ऑक्टोबर, १७४० मध्ये ऑस्ट्रियाच्या वारसाहक्काच्या युद्धाला सुरुवात झाली. हे युद्ध आठ वर्षे चालले. या युद्धात ऑस्ट्रिया आणिप्रशिया हे दोन परस्परविरोधी मुख्य पक्ष होते. या युद्धात इंग्लंडने ऑस्ट्रीयाचा तर फ्रान्सने प्रशियाचा पक्ष घेतला. 


०२. यावरून भारतात इंग्रज-फ्रेंच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचांचे भारतातील मुख्य केंद्र पोन्डिचेरी हे होते. शिवाय मछलीपट्टणम, कारिकल, माहे, सुरत व चंद्रनगर हि उपकेंद्रे होती. इंग्रजांचे केंद्र मद्रास, मुंबई व कलकत्ता येथे होते याशिवाय काही उपकेंद्रे होती. कोरोमंडल किनारा व त्याच्या अंतर्गत भागास कर्नाटक असे नाव होते. त्यामुळे या युद्धाना कर्नाटक युद्धे असेही म्हणतात. या सर्व भागावर कर्नाटकच्या नवाबाची सत्ता होती. 





प्रथम कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८)
०१. भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून जोसेफ डुप्लेने ऑक्टोबर,  १७४१ मध्ये कारभार स्विकारला होता. पॉण्डेचेरी हे त्याच्या कारभाराचे मुख्यालय होते. यावेळी फ्रेंच जहाजाची एक तुकडी मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोनेसच्या नेतृत्वाखाली भारतीय समुद्रात आली. युद्ध झालेच तर ब्रिटिशांविरूद्ध लढण्यासाठी ही तुकडी आली होती. 

०२. एक वर्षाहून अधिक काळ ही तुकडी युद्धाची वाट पाहत समुद्रात थांबली परंतु युद्ध न झाल्याने ही तुकडी परत मॉरिशसला निघून गेली. इंग्लंड व फ्रांस यांच्यात जेव्हा प्रत्यक्षात युद्धाला सुरुवात झाली त्यावेळी भारतीय समुद्रात कोणतीही फ्रेंच जहाजे नव्हती.

०३. १७४५ मध्ये चार युद्ध जहाजे घेऊन बार्नेटच्या नेतृत्वाखाली इंग्लिश आरमार कोरोमंडल किनाऱ्यावर आले. डुप्लेने त्यावेळी आपण मुघलांचा नवाब व मनसबदार असल्याचे सांगितले. डुप्लेने अर्काटचा नवाब अन्वरूद्दिनचे मन वळवून त्याच्या अधिकारक्षेत्रात युरोपियन सत्तांमधील संघर्ष टाळण्यास त्याला राजी केले. 


०४. बर्नेटच्या नेतृत्वात इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली. म्हणून पोन्डिचेरीचा फ्रेंच गवर्नर डूप्ले याने मोरिशसचा फ्रेंच गवर्नर ला बोर्डोने ह्यांस मदत मागितली. त्यानुसार ३००० सैनिकासह ला बोर्डोने मद्रासजवळील कोरोमंडल तटाकडे निघाला. दरम्यान एप्रिल १७४६ मध्ये बार्नेटचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या जागी पेटॉनची ब्रिटिश आरमाराच्या तुकडीचा प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली.

०५. जुलै १७४६ मध्ये ला बोर्डोनेस आठ युद्ध जहाजे असलेली नवीन आरमाराची तुकडी घेऊन कोरोमंडल किनाऱ्यावर आला आणि त्याने ब्रिटिश आरमाराच्या तुकडीला आव्हान दिले. ब्रिटिश जहाजांची तुकडी फ्रेंचांसमोर टिकू शकली नाही. कोणताही निर्णय न लागता ब्रिटिश जहाजे सिलोनला परतली व तिथून बंगालकडे गेली व तिथे नवीन ब्रिटिश कुमकेची वाट पाहू लागली.

०६. मद्रास असुरक्षित असल्याचे लक्षात येताच ला बोर्डोनेसने मद्रासवर चढाई करुन त्याची नाकेबंदी केली. दोन आठवड्यांच्या संघर्षानंतर २१ सप्टेंबर १७४६ रोजी मद्रास फ्रेंचांच्या ताब्यात आले. इंग्रज युद्धकैद्यामध्ये रोबर्ट क्लाईव्ह सुद्धा होता.  



०७. एका मोठ्या खंडणीच्या बदल्यात फ्रेंच एडमिरल ला बोर्डोनेने मद्रासचा ताबा इंग्लिश गवर्नर मोर्सशी तह करून सोडून दिला. पण डूप्लेला ते मान्य नव्हते. त्यामुळे डूप्लेने मद्रास पुन्हा जिंकून घेतले. मात्र पोन्डिचेरीपासून १८ मैल दक्षिणेला असलेला सेंट डेविड किल्ला त्याला जिंकता आला नाही. ला बोर्डोनेसने मोर्सकडून स्वत:साठी चाळीस हजार पौंडांची रक्कम घेतली असल्याने तो डुप्लेशी भांडला व रागारागाने आपले आरमार घेऊन मद्रासहून निघून गेला. 


०८. परिणामी इंग्रजांनी अर्काटचा नवाब अन्वरूद्दीन याची मदत घेतली. आपल्या प्रदेशात फ्रेंच व इंग्रज युद्ध करत असल्याचे पाहून कर्नाटकच्या नवाब अन्वरुद्दिन याने हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशाची शांतता भंग न करण्याची आज्ञा दोघांना दिली. परंतु फ्रेंच गव्हर्नर डुप्लेने इंग्रजांकडून जिंकलेले मद्रास अन्वरुद्दीनला देण्याचे कबूल करुन त्याला शांत बसविले. पण त्याने हे आश्वासन न पाळल्याने नबाबाने किल्ला ताब्यात घेण्यासाठी आपले सैन्य पाठवले. 


०९. डूप्लेने या लढाईत कॅप्टन पैराडाइज याच्या नेतृत्वाखाली २३० फ्रेंच व ७०० भारतीय सैनिकांची तुकडी पाठवली. सेंट टोमे येथील लढाईत या छोट्याशा प्रशिक्षित तुकडीने मह्फुजखानच्या नेतृत्वाखालील १०००० असंघटित भारतीय सैनिकांना पराभूत केले. 

१०. इंग्रजांनी पोंडीचेरीवर हल्ला केला पण डूप्लेने हा हल्ला परतवून लावला. १७४८ आली ‘एक्स ला शापेल’ तहानुसार युरोपातील ऑस्ट्रियन वारसांचे  युद्ध बंद होताच प्रथम कर्नाटक युद्धाचीही समाप्ती झाली. व मद्रास इंग्रजांना परत मिळाले. त्याबदल्यात फ्रेंचांना उत्तर अमेरिकेतील लुईसबर्ग मिळाले तसेच पॉण्डेचेरीवर आक्रमण न करण्याचे आश्वासन इंग्रजांनी फ्रेंचांना दिले



द्वितीय कर्नाटक युद्ध (१७४८-१७५४)

०१. कर्नाटकात त्रिचनापल्ली, तंजावर व म्हैसूर या तीन राज्यांत गादीसबंधी तंटे चालू होते. तंजावरमध्ये शहाजी व प्रतापसिंह भोसले यांत भांडण चालू होते. इंग्रजांनी प्रतापसिंहास गादीवर बसवून त्याजकडून देवीकोटचा किल्ला मिळविला. 

०२. सफदरअली हा कर्नाटकाचा नबाब असताना त्याचा मेहुणा चंदासाहेब बऱ्याच उलाढाली करीत असे. पण रघुजी व फत्तेसिंह भोसले यांनी कर्नाटकाच्या स्वारीत त्यास कैद करुन साताऱ्यास पाठविले. नंतर सफदरअलीचा खून होताच निजामुल्मुल्कने अल्पवयी नबाबास अर्काटच्या गादीवर बसविले. त्याचा कारभार पाहण्यासाठी त्याने अन्वरुद्दीनला अर्काट येथे पाठविले. 
०३. दरम्यान चंदासाहेब सुटला व मराठ्यांचा दंड देऊन या गादीवर हक्क सांगू लागला. त्याचे व फ्रेंचांचे संबंध चांगले होते. डूप्लेने अन्वरुद्दीन व चंदासाहेब यांच्या भांडणात पडून मुलूख मिळविण्याचा प्रयत्न केला. 


०४. हैदराबादचा निजाम उल मुल्क असफजाह मे १७४८ मध्ये मृत्यू पावला. त्यानंतर निजामाचा मुलगा नासिरजंग गाडीवर बसला. पण त्याला निजाम उल मुल्कच्या नातुने  मुजफ्फरजंगने  (म्हणजे निजाम उल मुल्कची मुलगी खैरुन्निसा बेगम याच्या मुलाने)  आव्हान दिले. त्याचवेळी कर्नाटकचा नवाब अन्वरुद्दिन व त्याचा मेहुणा चंदासाहेब (हुसैन दोस्त खान) यांच्यात संघर्ष निर्माण झाला. चंदासाहेब हा माजी नवाब दोस्त अलीचा जावई होता.


०५. जोसेफ डूप्लेने मुजफ्फरजंग व चंदासाहेब यांना समर्थन द्यायचे ठरवले तर इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी नासिरजंग व अन्वारुद्दिन यांचा पक्ष उचलून धरला. 


०६. मुजफ्फरजंग, चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने ३ ऑगस्ट १७४९ रोजी वेलोर जवळ अम्बुर येथे अन्वरुद्दिनला पराभूत करून ठार मारले. चंदासाहेब कर्नाटकचा नवाब बनला. चंदासाहेबने पोन्डिचेरीजवळचा काही प्रदेश (८० खेडी) आणि ओरिसाच्या किनाऱ्यावरचे काही प्रदेश मसुलिपट्टमसहित डूप्लेला बहाल केले. व बुसी या फ्रेंच अधिकाऱ्याची नेमणूक केली. उत्तर सरकार प्रदेशातील काही जिल्हे फ्रेंचाना मिळाले. 


०७. ऑक्टोबर १७४९ मध्ये त्रिचनापल्ली येथे अडकलेल्या महंमद अलीला मदत करण्यासाठी ब्रिटिश फौजेची एक तुकडी मद्रासहून निघाली. या फौजेने मद्रासजवळील सेंट थॉमस किल्ल्याचा ताबा घेतला. नासिरजंगही आपली फौज घेऊन आला. मेजर लॉरेन्सच्या नेतृत्वाखालील ब्रिटिश फौजही नासिरजंगाला येऊन मिळाली. 


०८. तिथे मुझफ्फरजंगशी झालेल्या युद्धात नासिरजंगचा विजय झाला. मुझफ्फरजंगला कैद करण्यात आले. पुढे १६ डिसेंबर १७५० मध्ये नासीरजंगला सुद्धा डूप्ले-फतहाबाद (सारसनगुपेत्ताई) येथे कडप्पाचा नवाब हिम्मत खान याने ठार मारले. मुझफ्फरजंगला कैदेतून मुक्त करण्यात आले.


०९. मुजफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला तर मुजफ्फरजंगने कृष्ण नदीच्या दक्षिणेकडील कन्याकुमारी पर्यंतच्या मुगल प्रदेशाचा (म्हैसूर, तंजावर व मदुराई) गवर्नर म्हणून डूप्लेची नियुक्ती केली. तसेच दोन लाख रुपये भेट डूप्लेला दिली. याशिवात १० हजार रुपये वार्षिक उत्पन्नाचा प्रदेश डूप्लेला जहागीर म्हणून देण्यात आला.


१०. मुजफ्फरजंगच्या विनंतीवरून बुसिच्या नेतृत्वात एक फ्रेंच तुकडी हैद्राबादला तैनात करण्यात आली. बुसीने या तुकडीचे नेतृत्व करण्यासाठी वैयक्तिकरीत्या चार लाख रुपये व त्याच्या तुकडीतील प्रत्येक सैनिकासाठी तीन महिन्याचे आगाऊ वेतन मुझफ्फरजंगकडून घेतले होते.



११. २८ सप्टेंबर १७५० रोजी सॅण्डर्सने मद्रास येथील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या गव्हर्नरपदाची सूत्रे हाती घेतली. त्याने चंदासाहेबाच्या अर्काटच्या नवाबपदाला हरकत घेतली व महंमदअलीला अर्काटचा कायदेशीर नवाब म्हणून घोषित केले. त्याने डुप्लेला देण्यात आलेल्या पदव्या व मुझफ्फरजंगकडून फ्रेंच कंपनीला जो प्रदेश मिळाला होता त्यालाही मान्यता देण्यास नकार दिला.


१२. अन्वरुद्दिनचा मुलगा मुहम्मदअली आश्रयार्थ त्रिचनापल्लीला होता. म्हणून चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीला वेढा घातला. डूप्लेने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यात असलेल्या मुहम्मद अलीशी बोलणी सुरु केली. त्रिचनापल्ली सर केल्यास सर्व कर्नाटक फ्रेंचांच्या ताब्यात जाईल, या भीतीने इंग्रज गव्हर्नर साँडर्स याने त्रिचनापल्ली घेण्याचा प्रयत्न केला. इंग्रजांच्या सल्ल्यावरुन त्यांची मदत येईपर्यंत मुहम्मद अलीने डूप्लेशी बोलणी चालू ठेवली.

१३. १७५१ मध्ये इंग्रजांनी एक तुकडी त्रिचनापल्लीस धाडली. याच वेळी तंजावर, म्हैसूर येथील राज्यकर्ते आणि मराठ्यांचा एक सेनापती मुरारराव यांनी इंग्रज व मुहम्मद अली यांच्याशी हातमिळवणी केली. त्यातच क्लाइव्हच्या आगमनामुळे या लढाईला वेगळेच वळण लागले. मुहम्मद अली, गव्हर्नर साँडर्स व क्लाइव्ह व रोबर्ट क्लाईव्ह यांनी फक्त २१० सैनिकासह चाल करून ३१ ऑगस्ट १७५१ रोजी कर्नाटकची राजधानी अर्काट जिंकून घेतले. 

१४. राजधानी अर्काट परत घेण्यासाठी चंदासाहेबाने त्याचा मुलगा रजासाहेबाच्या नेतृत्वाखाली ४००० सैनिक पाठवले. परंतु क्लाईव्हने उत्कृष्ट बचाव केला. त्याचबरोबर त्रिचनापल्ली वाचविण्यातही इंग्रजांना यश आले. जून १७५२ मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच सैन्याने इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. ह्याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला. अशा प्रकारे दोन्ही ठिकाणी फ्रेंच सैनिकांचा पराभव झाला. 

१५. युद्धात झालेल्या धन हानीमुळे फ्रेंच कंपनीच्या संचालकांनी १७५४ मध्ये डूप्लेला परत बोलावून घेतले. २ ऑगस्ट १७५४ रोजी गोडेव्ह्यूला भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गवर्नर म्हणून धाडण्यात आले. फ्रेंचांनी इंग्रजांशी १७५५ मध्ये पोंडीचेरीचा तह करून हे युद्ध समाप्त केले. 



१६. या तहानुसार इंग्रज-फ्रेंच यांनी एतद्देशीयांच्या भांडणांत पडावयाचे नाही, फ्रेंचांना उत्तर सरकार प्रांत द्यावा व मुहम्मद अलीकडे कर्नाटकचे राज्य ठेवावे असे ठरले. डूप्ले फ्रान्सला परत गेला. यामुळे इंग्रजांच्या सत्तासंपादनातील एक मोठा अडथळा दूर झाला. युद्धसमाप्तीनंतर मुहम्मदअली कर्नाटकचा नवाब बनला. 


१७. तसेच जानेवारी १७५१ मध्ये लक्कीरेड्डीपल्ली येथील युद्धात कुर्नुलच्या नवाबाचा वार डोक्यावर लागल्यानंतर मुजफ्फरजंगाचा मृत्यू झाला. जनरल बुसीने ताबडतोब निजामाचा तिसऱ्या क्रमांकाचा मुलगा सलाबतजंगची हैदराबादच्या गादीवर चौथा निजाम म्हणून नेमणूक केली. सलाबतजंग स्वत:च्या आस्तित्वासाठी फ्रेंचांच्याच मदतीवर अवलंबून राहिला. 


१८. बुसीच्या फौजेला नियमित पगार मिळावा म्हणून सलाबतजंगने त्याच्या राज्याच्या उत्तरेकडील चिकाकोल, एल्लोर, राजमुंद्री आणि गंटूर हे चार जिल्हे फ्रेंचांना दिले. हे चार जिल्हे व त्यालगतची जमीन फ्रेंचांना मिळाल्याने किनारपट्टी तसेच गोदावरी आणि कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील सुपीक प्रदेशावर फ्रेंचांचा संपूर्ण ताबा प्रस्थापित झाला.३० लक्ष रुपये वार्षिक उत्पन्नाचा उत्तर सरकार प्रदेशातील काही जिल्ह्यांचा भूभाग फ्रेंच कंपनीला देण्यात आला. 


इंग्रज फ्रेंच युद्ध – भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.




या विषयीचा व्हिडियो पहा