स्वातंत्र्य चळवळीचा अंतिम टप्पा

०. १९४५ सालच्या ऑगस्ट महिन्यात दुसरे महायुध्द थांबले. त्यात इंग्लंडला विजय मिळाला. परंतु युध्दामुळे इंग्लंडची आर्थिक हानी व मनुष्य हानी फार मोठया प्रमाणावर झाली. तशातच भारतीय जनता आणि सैनिक यांच्यावरील ब्रिटीश सत्तेचा दरारा नाहीसा झाल्याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्याना झाल्यामुळे भारतातून काढता पाय घेण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला.

०२. दुसरे महायुध्द संपताच इंग्लंडमध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात विन्स्टन चर्चिल यांचे सरकार जाऊन क्लेमंट अ‍ॅटली यांच्या नेतृत्वा खालील मजूर पक्षाचे सरकार अधिकारावर आले. भारताला शक्य तितक्या लवकर स्वातंत्र्य देण्याचा मानस पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहीर केला. तसेच तीन ब्रिटिश मंत्र्यांचे एक शिष्टमंडळ (त्रिमंत्री योजना) भारताच्या भवितव्याबाबत भारतीयांशी वाटाघाटी करण्यासाठी पाठवत असल्याचेही त्यांनी घोषित केले.
०३. मार्च १९४६ मध्ये इंग्लंड चे त्रिमंत्री मंडळ भारतात आले. लॉर्ड पैट्रीक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स व ए. व्ही. अलेक्झांडर हे या मंडळाचे सदस्य होते. भारताबाबतची इंग्लंडची योजना त्यांनी भारतीय नेत्यांपुढे मांडली. तिला ‘त्रिमंत्री योजना’ असे म्हणतात. ब्रिटिशांच्या शासना खालील प्रांत व संस्थाने यांचे मिळून भारतीय संघराज्य स्थापन केले जावे, या संघराज्याचे संविधान भारतीयांनीच तयार करावे, हे संविधान तयार होईपर्यंत भारताचा राज्यकारभार व्हाइसरॉयच्या सल्ल्याने भारतीयांच्या हंगामी सरकारने करावा असे या योजनेचे स्वरूप होते.
०४. या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रीय सभेला मंजूर नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही म्हणून लीगही असंतुष्ट होती. यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णत: मान्य झाली नाही.
०५. त्रिमंत्री योजनेनुसार संविधान समिती स्थापन करण्यासाठी जुलै १९४६ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली. राष्ट्रीय सभेला त्यात प्रचंड बहुमत मिळाले. संविधान समितीत सहभागी होण्यास लीगने नकार दिला. पाकिस्तानच्या निर्मितीची मागणी जोराने पुढे मांडण्यास लीगने सुरूवात केली. इतकेच नव्हे तर सनसदशीर मार्ग सोडून पाकिस्तानच्या निर्मितीसाठी हिंसाचाराचा मार्ग पत्करण्याचा मानस लीगने जाहिर केला. या मार्गावरील पहिले पाऊल म्हणून १६ ऑगस्ट, १९४६ हा प्रत्यक्ष कृतिदिन म्हणून घोषित केला.
०६. लीगच्या या निर्णयानुसार १६ ऑगस्ट रोजी लीगच्या अनुयायांनी लुटालुट, जाळपोळ, सशस्त्र हल्ले यांचे सत्र सुरू केले. कोलकता शहरात तर रस्तोरस्ती चकमकी झाल्या. त्यात केवळ तीन दिवसांत चार हजार लोक मृत्युमुखी पडले. बंगाल प्रांतातील नोआखालीच्या भागात भीषण हत्या झाल्या.

०७. हा राक्षसी हिंसाचार थांबवण्यासाठी वयाची पंचाहत्तरी ओलांडलेले गांधीजी बंगालच्या दौर्‍यावर गेले. जातीय दंगलीचा भयानक वणवा पेटलेला असताना प्राणाची पर्वा न करता गावोगावी पदयात्रा करत लोकांची मने त्यांनी शांत केली. परंतु देशातील परिस्थिती चिघळतच गेली. देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात हिंसाचाराचे थैमान चालूच राहिले. देशात असुरक्षिततेचे, तणावाचे व दहशतीचे वातावरण वाढत गेले. 

०८. अशा अराजकाच्या परिस्थितीत गव्हर्नर जनरल लॉर्ड वेव्हेल यांनी भारतीय प्रतिनिधींचे हंगामी सरकार स्थापन केले. पंडित जवाहरलाल नेहरूच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. सुरूवतीला हंगामी सरकारमध्ये सामील होण्यास लीगने नकार दिला होता. परंतु तो निर्णय बदलून ऑक्टोबरमध्ये लीगचे सदस्य हंगामी सरकारमध्ये सामील झाले.

०९. मंत्रिमंडळात शिरून अडवणुकीचे धोरण स्वीकारावे आणि हंगामी सरकारला कामकाज करणे अशक्य करावे. असा लीगचा निर्धार होता. यामुळे मंत्रिमंडळात सतत खटके उडू लागले. सरकारचे कामकाज ठप्प होऊ लागले. देशातील वाढत्या अराजकाला व हिंसाचाराला आवर घालणे हंगामी सरकारला जड जाऊ लागले. राजकीय तणाव पराकोटीला गेला.

१०. ‘भारतावरील आपला ताबा इंग्लंड जून १९४८ पूर्वी सोडून देईल’, असे ब्रिटिश पंतप्रधान अ‍ॅटली यांनी जाहिर केले. त्याचबरोबर भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे भारतीयांच्या हाती लवकर सोपवण्यासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांची नेमणूक भारताचे नवे गव्हर्नर जनरल म्हणून केल्याचेही त्यांनी घोषणा केले.
११. मार्च १९४७ मध्ये लॉर्ड लुई माउंटबॅटन भारतात आले. त्यांनी सर्व प्रमुख भारतीय नेत्यांशी बोलणी केली त्यानंतर भारताची फाळणी करून भारत व पाकिस्तान या दोन स्वतंत्र राष्ट्रांच्या निर्मितीची योजना त्यांनी तयार केली.

१२. भारतीय फाळणी होण्याची कल्पना भारतीयांना दु:सह होती. देशाचे ऐक्य हा तर राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता. परंतु पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास लीगने धरला. त्यासाठी हिंसाचाराचे थैमान देशात सुरू केले. यामुळे फाळणी शिवाय देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही अशी राष्ट्रीय सभेची खात्री झाली. अतिशय नाइलाजाने फाळणीचा निर्णय राष्ट्रीय सभेला मान्य करावा लागला.

* भारताचे स्वातंत्र्य

०१. २ सप्टेंबर १९४६ रोजी भारताच्या हंगामी सरकारच्या मंत्रीमंडळाचे प्रमुख म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अखंड भारताच्या राज्यकारभाराची सूत्रे हातात घेतली. पण यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या.

०२. माउंटबॅटन योजनेच्या आधारे भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा १८ जुलै, १९४७ रोजी ब्रिटिश पार्लमेंटने मंजूर केला. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारताने विभाजन होऊन भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील, त्यानंतर त्यांच्यावर ब्रिटिश पार्लमेंटचा कोणताच अधिकार राहणार नाही, अशी तरतूद या कायद्याने केली.

०३. स्वातंत्र्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ पासून १९४८ पर्यंत लॉर्ड माउंटबटन भारताचे प्रथम गव्हर्नर जनरल बनले. त्यानंतर चक्रवर्ती राजगोपालाचारी भारताचे दुसरे व पहिले भारतीय गव्हर्नर जनरल बनले.

०४. स्वातंत्र्याच्या पूर्व संध्येला नेहरू म्हणाले, “The achievement we celebrate today is but a step, an opening of opportunity, to the greater triumphs and achievements.”

०५. नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्य सभागृहात १४ ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान समितीची बैठक सुरू होती. मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला. त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला.
०६. या ऐतिहासिक क्षणाचे महत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रभावी भाषणात उलगडून दाखवले. ते म्हणाले, ‘अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता, पूर्णपणे नसली तरी बर्‍याच मोठया प्रमाणात आपण करत आहोत. मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेले असताना स्वतंत्र व चैतन्यमय भारत जन्माला येईल’. या मंगल क्षणी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या सेवेला वाहून घेण्याची शपथ घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याचा सोहळा अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला.
०७. स्वातंत्र्य सोहळयात सहभागी व्हायला गांधीजी दिल्लीत थांबले नव्हते. शांतता व जातीय सलोखा टिकवण्यासाठी ते बंगालमध्ये जिवाचे रान करत होते. भारत स्वतंत्र करण्यासाठी अहर्निश झटलेल्या या महात्म्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच निर्घृण हत्या करण्यात आली. ही हत्या नथुराम गोडसे याने ३० जानेवारी, १९४८ रोजी केली. हिंदु-मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती व त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाचेही मोल दिले