आझाद हिंद सेना (भारतीय राष्ट्रीय आर्मी)

आझाद हिंद सेना (भारतीय राष्ट्रीय आर्मी)

आझाद हिंद सेना (भारतीय राष्ट्रीय आर्मी)

सुभाषचंद्र बोस

सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७, बंगाल प्रांतात झाला. सुभाषबाबू १९२० मध्ये आय. सी. आय. परीक्षा उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी नोकरी सोडली.
०१. भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते

सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.

०२. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला.

०३. सुभाषबाबू १९३८ हरिपूर व १९३९ त्रिपूरा कॉंग्रेसचे अध्यक्ष होते फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि १९४० मध्ये फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना.

०४. ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते जानेवारी १९४१ मध्ये पेशावर – मास्को मार्गे प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले. नजर कैदेतून सुटल्यावर नेताजीनी झियाउद्दीन हे नाव धारण केले होते.

०५. १९४१ च्या एप्रिल महिन्यात ते जर्मनीला पोहोचले. तेथे त्यांनी ‘फ्री इंडिया सेंटर’ची स्थापना केली. रासबिहारी बोस यांनी नेताजींना जापानला येण्याची विनंती केली. बोस यांनी आग्नेय आशियातील राष्ट्रांत वास्तव करणाऱ्या देशप्रेमी भारतीयांना संघटीत करून ‘इंडियन इंडिपेंडन्स लीग’ नावाची संस्था स्थापन केली.

आझाद हिंद सेना

०१. रासबिहारी बोस यांनी जपानमधील पौर्वात्य देशातील निवडक लोकांची नागासाकी येथे बैठक घेतली. यासाठी ज्ञानेश्वर देशपांडे, देवनाथ दास यांनी प्रमुख कार्य केले. रासबिहारी बोस यांनी हिंदी लोकांची एक परिषद २८ ते ३० मार्च १९४२ मध्ये टोकियो येथे भरवली. जपान, मलाया, चीन, थायलंड, या देशातून अनेक हिंदी स्वातंत्र्य संघ स्थापना केली.

०२. कोणत्याही प्रकारे परकियांचे अधिकार नसणारे स्वातंत्र्य हिंदुस्थानला प्राप्त करु देणे हा संस्थेचा उद्देश होता. लीगचे पहिले अध्यक्ष म्हणून रासबिहारी बोस यांची निवड करण्याल आली रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीगच्या अनेक शाखा स्थापन केल्या.

०३. स्वातंत्र्याचे ध्येय साध्य करण्यासाठी रास बिहारी बोस यांनी टोकियो येथे आझाद हिंद फौजेची (इंडियन नॅशनल आर्मी) स्थापना केली. कॅप्टन मोहन सिंग हे सरसेनापती झाले. जपानने १९४२ च्या पूर्वार्धात आग्नेय आशियातील काही प्रदेश ब्रिटीशांकडून जिंकल्याने तेथील ब्रिटीश सैन्यातील हजारो भारतीय सैनिक व अधिकारी जपानच्या हाती आले. युद्धबंदी झालेल्या भारतात सैनिकांची एक पलटण कॅप्टन मोहन सिंग यांनी तयार केली. त्यालाच आझाद हिंद सेना असे म्हणतात.

०४. आग्नेय आशियात १९४२ च्या सुमारास युद्धास प्रारंभ होऊन १५ फेब्रुवारी रोजी जपानने सिंगापूरचा ब्रिटिश आरमारी तळ काबीज केला. १५ फेब्रुवारी १९४२ रोजी जपानचे पंतप्रधान जनरल टोजो व रासबिहारी बोस यांनी हिंदी स्वातंत्र्याची घोषणा केली. आझाद हिंद फौज आणि इंडियन इंडिपेन्डन्स लीगने ऑगस्ट १९४२ पर्यत सिंगापूर, बॅकॉक, रंगून जिंकले. आझाद हिंद फौजेचे आणि हिंदी स्वातंत्र्य संघाचे मुख्य ठाणे बॅकॉकहून सिंगापूरला आणले.

०५. आझाद हिंद फौजेच्या अधिकारावरुन मोहन सिंगला कमी करून जगन्नाथराव भोसले यांना मेजर जनरल आणि सुप्रीम कमांडर म्हणून नियूक्त केले.

०६. दुसरे महायुद्ध चालू असता नेताजी सुभाषचंद्रांना ब्रिटीश सरकारने कलकत्ता येथे नजरकैदेत ठेवले होते. १७ जानेवारी १९४१ रोजी कैदेतून सुटून बोस जर्मनीला गेले. सुमारे तीन हजारांची फौज त्यांनी तेथे निर्माण केली. कॅ. मोहनसिंग ह्यांच्या निमंत्रणावरून बँकॉक येथील परिषदेस हजर राहण्यासाठी जर्मन व जपानी सरकारच्या मदतीने महत्प्रयासाने नेताजी जून १९४३ मध्ये सिंगापूरला जाण्यासाठी टोकिओत दाखल झाले.

०७. परंतु दरम्यान मोहनसिंग ह्यांचे जपानशी मतभेद होऊन जपान्यांनी ही सेना बरखास्त केली परंतु भारतीय स्वातंत्र्य संघ ही संस्था तेथे अस्तित्वात होती. नेताजींनी जपान्यांच्या मदतीने मोहनसिंगांच्या लष्करी संघटनेचे पुनरुज्जीवन करून तिला ‘आझाद हिंद सेना’ हे नाव देण्याचे ठरविले.

०८. सुभाषचंद्र बोस २० जून १९४३ ला टोकियोला आले. रासबिहारी यांनी त्यांचे स्वागत केले. ते त्यांनतर सिंगापूरला गेले. आझाद हिंद फौजेच्या निरनिराळया घटकांच्या भेटी घेतल्या. ५ जूलै १९४३ रोजी सिंगापूर येथे नव्याने फौजेची स्थापना केली. आठ दिवसातच राणी ऑफ झाशी रेजिमेंट ही स्त्री शाखा स्थापन केली. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या.

०९. २५ ऑगस्ट १९४३ रोजी आझाद हिंद सेनेचे अधिकृत नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, लक्ष्मी स्वामिनाथन, गुरुबक्षसिंग धिल्लन , प्रेमकुमार सहगल इत्यादी नेताजींचे प्रमुख सहकारी होते.

१०. जगन्नाथराव भोसले, शाहनवाजखान व मेजर सैगल या भारतीय युद्धबंदी लष्करी अधिकाऱ्यांना मेजर जनरल हा हुद्दा देण्यात आला व त्यांच्या अनुक्रमे चीफ ऑफ जनरल स्टाफ व विभागीय सेनाप्रमुख म्हणून नेमणुका केल्या. नेताजी सुभाषचंद्रांनी ह्या सेनेचे सरसेनापतिपद आपणाकडे घेतले. ह्या सर्व सैन्यास तातडीचे लष्करी शिक्षण देण्यात येऊ लागले.

११. ‘तिरंगी ध्वज’ हे आझाद हिंद सेनेचे निशाण होते. ‘जय हिंद’ हे अभिवादनाचे शब्द तर ‘चलो दिल्ली’ हे घोषवाक्य होते . ‘कदम कदम बढाये जा’ हे आझाद हिंद सेनेचे समरगीत होते. या वेळी ‘तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दुंगा’ असे आवाहन नेताजींनी केले.

आझाद हिंद सेनेची कामगिरी

०१. आझाद हिंद सेनेने मलाया, सिंगापूर, ब्रहादेश, जिंकून जपान व जर्मनीच्या मदतीने तेथे २१ ऑक्टोबर १९४३ रोजी हिंदुस्थानचे हंगामी सरकार (आझाद हिंद सरकार) स्थापन केले.  जपान, इटली, जर्मनी वगैरे राष्ट्रांनी तत्काळ त्यास औपचारिक मान्यताही दिली.

०२. लष्करी संघटनेबरोबरच आझाद हिंदच्या तात्पुरत्या सरकारने नागरी शासनव्यवस्थेतही लक्ष केंद्रित केले आणि काही मुलकी खाती उघडली. . स्वत: नेताजींनी जनतेचे सहकार्य मिळावे म्हणून सभा घेतल्या आणि नभोवाणीवरून भाषणे दिली.

०३. थोड्याच दिवसांत आझाद हिंद सेनेस जपानी सेनेचा दर्जा प्राप्त झाला व ती कार्यन्वित झाली. नेताजीच्या आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे व स्वातंत्र्याच्या उच्च ध्येयामुळे भारतीय सैनिकांची संख्या तीस हजारांच्या वर गेली.

०४. पुढे त्या सेनेची गांधी, नेहरू, आझाद अशी तीन पथकांत विभागणी करण्यात आली. ह्या पथकांतील निवडक लोकांचे एक स्वतंत्र पथक ‘नंबर एक गनिमी पथक’ ह्या नावाने तयार करण्यात आले व ते शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली कार्य करू लागले हेच पथक पुढे ‘सुभाष –पथक’ म्हणूनही लोकप्रिय झाले.

०५. आझाद हिंद सेना जरी युद्धासाठी सज्ज झाली, तरी जपानी अधिकारी तिला आपल्या बरोबरीची समजण्यास तयार नव्हते. त्यांचे मत असे होते की, तिच्यातील बहुतेक सैनिक ब्रिटिशांच्या नोकरीतील भाडोत्री सैनिक असल्याने ते जपान्यांप्रमाणे जिद्दीने लढणे शक्य नाही. म्हणून त्यांची स्वतंत्रच पथके ठेवावीत.

०६. परंतु हे मत नेताजींना अमान्य होते. त्यांना आपल्या सैन्याबद्दल आत्मविश्वास होता. त्यांनी आपले सैन्य जपान्यांबरोबर मुद्दाम धाडले. आझाद हिंद सेनेचा पराक्रम पाहून जपान्यांचेही पुढे मत बदलले. १९४४ च्या मार्च महिन्यात जपान्यांनी हिंदुस्थानच्या ईशान्य सीमेवर चढविलेल्या हल्ल्यात भाग घेण्यासाठी ह्या सेनेतील काही पथके धाडण्यात आली. १९४४ मध्ये अंदमान निकोबार ही बेटे मुक्त करून शहीद व स्वराज्य असे नामकरण केले.

०७. सीमेवरील इंफाळ येथे झालेल्या लढाईत ह्या सैन्यातील काही पथकांनी चांगली कामगिरी बजाविली. १९४४ च्या मे महिन्यात शाहनवाजखान ह्यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाने भारतीय हद्दीत प्रवेश करून मोडोक हे ठाणे जिंकले. ब्रिटिशांच्या मोठ्या फौजेला व विमानमाऱ्याला न जुमानता ते जवळजवळ महिनाभर लढले.

०८. ह्या वेळी कॅप्टन सूरजमल ह्यांच्या हाताखाली एक जपानी पलटणही देण्यात आली होती. मोडोकप्रमाणे इतर लढायांतही ह्या सेनेने चांगले पराक्रम केले. एक मोक्याचे ठिकाण जिंकण्याची आज्ञा होताच, लेफ्टनंट मनसुखलाल व मूठभर सैनिकांनी जिवाची पर्वा न करता ती टेकडी जिंकली व आपण जपानी सैनिकांपेक्षा कोणत्याही प्रकारे कमी नाही हे सिद्ध केले. ह्या युद्धात मनसुखलाल ह्यांना अनेक जबर जखमा झाल्या, तरी त्यांनी आपले उद्दिष्ट साध्य केलेच.

०९. आझाद हिंद सेनेच्या इतर पथकांनीही अशीच उत्तम कामगिरी बजावली. परंतु अखेर शत्रूचे प्रचंड संख्याबळ, विमानदल आणि शस्त्रसामग्री, तसेच जपानी सैनिकांनी घेतलेली युद्धक्षेत्रातील माघार ह्यांमुळे सुभाष पथकास नाइलाजाने माघार घ्यावी लागली. शिवाय अपुरा शस्त्र-व अन्न-पुरवठा, रसद मिळण्यातील अडचणी, जपान्यांचे लहरी सहकार्य इत्यादींमुळेही लढाई थांबविणे ह्याशिवाय त्यास दुसरा पर्याय नव्हता.

१०. ही पीछेहाट चालू असतानाच ब्रिटिशांनी विमानांतून पत्रके टाकली व ब्रिटिश सैन्यात परत या, अशी लालूच दाखविली. पण एकाही सैनिकाने त्यास भीक घातली नाही किंवा आझाद हिंद सेनेशी बेइमानी केली नाही, ही विशेष उल्लेखनीय गोष्ट होय. भारत-सीमा पार करून पुढे ब्रह्मदेशात आगेकूच करणाऱ्या ब्रिटिश व भारतीय सैन्याला आझाद हिंद सेनेची पथके शरण आली.

११. २ मे १९४५ रोजी रंगून पडल्यावर थोड्याच दिवसांत पुढे जपानने शरणागती पतकरली. नेताजी त्या वेळी सिंगापूरहून विमानाने टोकिओला जात असता अपघात होऊन मृत्यू पावले असावेत, असे म्हणतात. आझाद हिंद सेनेच्या पुष्कळ अधिकाऱ्यांना व सैनिकांना कैद करण्यात येऊन भारत सरकारविरुद्ध बंड केल्याचा आरोप त्यांच्यावर लादण्यात आला.

१२. शाहनवाजखान, सैगल आदी अधिकाऱ्यांवर कोर्टापुढे खटले भरण्यात आले. तथापि भारतीयांच्या यासंबंधीच्या प्रक्षुब्ध लोकमताच्या जाणिवेने ब्रिटीश सरकारने या आधिकाऱ्यांच्या शिक्षा माफ केल्या (३ जानेवारी १९४६).

१३. आझाद हिंद सेनेचे सरसेनापती म्हणून सुभाषचंद्रांना भारतीय जनता प्रेमाने, मानाने व आदराने ‘नेताजी ’ְम्हणू लागली; त्यांनी दिलेली ‘जय हिंद’ही घोषणा आजही सर्वतोमुखी झाली आहे.

१४. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी बॅकॉककडून टोकियोकडे नेताजींचा तैपेई विमानतळाजवळ विमान अपघातात मृत्यू झाल्याचे मानण्यात येते. व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली.

१५. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली. स्वातंत्र्य लढयामध्ये आझाद हिंद सेनेने सुभाषचंद्र बोसच्या नेतृत्वाखाली प्रभावी कामगिरी केली. परंतु अखेरीस अपयश आले. 

१६. आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणाऱ्या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली.

Scroll to Top