चालू घडामोडी 21-05-2015 ते 31-05-2015

चालू घडामोडी 21-05-2015 ते 31-05-2015

१. भारतीय हवाई दलाचे मिराज २००० हे लढाऊ विमान आज यमुना मथुरेजवळ एक्‍स्प्रेस-वेवर यशस्वीरित्या उतरले. कोणत्याही कारणामुळे विमानतळ वापरण्यायोग्य स्थितीत नसेल तर लढाऊ विमान उतरवण्यासाठी जवळचा मोठा रस्ता हा एक पर्याय असू शकतो असेही वायुदलाने सांगितले.


२. सध्या जर्मनी, पोलंड, स्वीडन, दक्षिण कोरिया, तैवान, फिनलंड, स्विर्त्झलंड, सिंगापूर आणि पाकिस्तानमध्ये विमानतळ बंद पडल्यास लढाऊ विमान उतवण्यासाठी मोठ्या रस्त्यांचा पर्याय प्रमुख शहरांमध्ये उपलब्ध आहे.

३. युकी भाम्ब्री भारताचा अव्वल टेनिसपटू जागतिक क्रमवारीत १५८ व्या स्थानावर आहे.  तो सोमदेव देवरमण(१७२) व साकेत मिनेनी (१९६) यांच्या पुढे आहे.  त्याचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट रॅन्क १४३ वा मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होता.


४. आय.एन.एस. कवरत्ती (INS Kavaratti) भारतीय नौदलात दाखल. ही पाणबुडीविरोधी युद्धनौका प्रोजेक्ट २८ अंतर्गत बनवण्यात आली, याच प्रोजेक्ट मधील आय.एन.एस. कामोर्ता हि पहिली युद्धनौका होती जी २०१४ मध्ये सेवेत आली. 


५. हंगेरीचे लेखक लाझ्लो क्राझ्नाहोर्काय (Laszlo Krasznahorkai) यांना २०१५ चा मॅन बुकर पुरस्कार जाहीर. 


६. मेघालय राज्य पंतप्रधान जन-धन योजनेत १००% यशस्वी, सर्व ११ जिल्हे प्रति कुटुंब एक खाते असे सज्ज.


७. पती आणि सासरच्या अन्य व्यक्तींकडून विवाहितेचा होणारा छळ रोखण्यासाठी भारतीय दंड विधानाच्या कलम ४९८ (अ) मध्ये कडक तरतूद करण्यात आली आहे. पण अलीकडील काळात या कलमाचा वापर सासरच्या मंडळींवर सर्रास सूड उगविण्यासाठीच होत असल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, याकडे केंद्राने राज्यांचे लक्ष वेधले आहे.


८. या कायद्यातील तरतुदीनुसार, हुंडाबळीची तक्रार दाखल झाल्यानंतर अटक वॉरंट नसतानाही आरोपीला तत्काळ अटक करण्याचे अधिकार पोलिसांना बहाल झाले असले, तरी कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी तक्रारकत्र्या महिलेच्या सासरकडील लोकांना ताबडतोब अटक न करता संशयास्पद वाटर्णाया तक्रारींची सखोल चौकशी करण्यात यावी आणि तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य दिसून येत असेल, तरच कारवाई करावी, असे केंद्राने स्पष्ट केले आहे


०९. सन्मानाने जगण्याचा मूलभूत अधिकार पक्ष्यांना आहे. मुळात उडणे हा त्यांचा धर्म आहे. त्यामुळे त्यांना आकाशात मुक्तपणे विहार करण्याचा अधिकार आहे. त्यांचा हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटल्यामुळे यापुढे पोपटासह अन्य पक्ष्यांना व्यावसायिक हेतूने बंदिस्त ठेवता येणार नाही.


१०. दिल्लीतील पीपल्स फॉर अ‍ॅनिमल या प्राणीप्रेमी संघटनेने पोपटाला पिंज-यात ठेवणा-या मालकाविरुद्ध दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय सुनावला. 


११. यावेळी न्यायालयाने पक्ष्यांचा योग्य आहार, पाणी आणि वैद्यकीय मदतीशिवाय विदेशात होणा-या निर्यातीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. अर्थात, विदेशात पक्ष्यांची तस्करी करणे, त्यांना पुरेसे अन्न-पाणी, वैद्यकीय सुविधांपासून वंचित ठेवणे अमानुष असल्याचे दिल्ली हायकोर्टाने म्हटले आहे. 


१२. नव्या गृहनिर्माण धोरणाचा आराखडा राज्य सरकारने तयार केला असून, २०२२ पर्यंत तब्बल १९ लाख घरे उभारण्यात येणार आहेत. या घरांचा अधिकाधिक फायदा गरिबांना होण्यास मदत होईल. 


१३. या अगोदर राज्यात २००७ मध्ये गृहनिर्माण धोरण तयार करण्यात आले होते. आता नव्याने धोरण आखण्यात आले असून, यातून अनेकांना मालकीचे घर मिळण्यास मदत होणार आहे.


१४. नव्या गृहनिर्माण आराखड्यानुसार २०२२ पर्यंत १९ लाख घरे तयार करण्यात येणार आहेत. या माध्यमातून हाऊसिंग फॉर ऑलचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या अंतर्गत एमएमआरमध्ये ११ लाख घरे उभारण्यात येतील. 


१५. सरकारी जमिनीसाठी लँड पूलिंग पॉलिसी बनविण्यात येईल आणि यात सॉल्ट पॅनची जमीन, एसईझेडमध्ये अडकलेल्या जमिनीचा वापर करण्यात येईल. स्वस्त दरात घरे उभारण्यााठी ३-४ पर्यंत एफएसआय जाईल. 


१६. एवढेच नव्हे, तर रेंटल हाऊसिंग पुन्हा सुरू केले जाईल. याचे काम एमएमआरडीएकडे सोपविण्यात येईल. सिडकोला नवे टाऊनशिप उभारण्याची जबाबदारी दिली आहे. त्यासाठी वर्षभराकरिता १० लोकेशन निश्चित केले आहेत.


१७.  रशियात भारतीय कला, चित्रपट आणि संस्कृतीचे दर्शन घडवून आणणाऱ्या ‘नमस्ते रशिया’ उत्सवाचे उद्घाटन मॉस्को दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते करण्यात आले. पुढील सहा महिन्यांत हा उत्सव रशियातील विविध प्रांतांपर्यंत पोहोचून भारतीय संस्कृती व कलेचा प्रचार करणार आहे.


१८. जगप्रसिद्ध प्रतिभाशाली चित्रकार पाब्लो पिकासो यांच्या एका कलाकृतीची न्यूयॉर्क येथील लिलावामध्ये नुकतीच १७.९४ कोटी डॉलरकिमतीला विक्री झाली.  या किमतीमुळे नवा उच्चांक प्रस्थापित झाला आहे. ‘विमेन ऑफ अल्जियर्स’ या नावाची ही चित्रनिर्मिती आहे.  पिकासो यांनी १९५४-५५ मध्ये निर्माण केलेल्या १५ चित्रांच्या मालिकेमधील हे एक चित्र आहे.


१९. याच लिलावामध्ये अल्बर्टो जियाकोमेत्ती या ख्यातनाम स्वीस शिल्पकाराचे ‘पॉइंटिंग मॅन’ हे शिल्प विक्रमी किमतीत (१४.१२ कोटी डॉलर) विकले गेले. 


२०. या लिलावासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे नाव ‘लूकिंग फॉरवर्ड टू द पास्ट’ असे होते. या लिलावामध्ये विसाव्या शतकामधील ३६ कलाकृतींपैकी ३५ कलाकृतींचा लिलाव करण्यात आला. या एकूण लिलावाची किंमत ७०.६ कोटी डॉलर.


२१. भारत व चीनने अंतराळ, विज्ञान, रेल्वे, स्मार्ट सिटी, पर्यटन, शिक्षण अशा विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी दोन्ही देशांनी तब्बल १० अब्ज डॉलर्सच्या २४ करारांवर स्वाक्षरी केली. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात दौ-यावर आले होते त्यावेळी १८ करारांवर स्वाक्षरी केली होती. 


२२. शांघाई येथे गांधवादी व भारतीय केंद्राची स्थापना, कुनंमिग येथे योग महाविद्यालय, चेन्नई व चीनमधील चोंगकिक तसेच हैदराबाद व किंगदाओ या शहरांना सिस्टर स्टेट बनवणे असे विविध करार याप्रसंगी करण्यात आले.


२३. भारतीय हवाई दलातील अनेक वर्षांपासून वापरात असलेल्या ऍव्हरो या मालवाहू विमानांच्या तुकडीतील विमाने बदलण्यासाठी एअरबस-टाटा यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता. ऍव्हरो विमानांचा ताफा बदलण्यासाठी “मेक इन इंडिया” अंतर्गत “कामोव्ह केए-२२६टी” या हेलिकॉप्टरची निर्मिती करण्याचा प्रस्ताव रशियाने दिला होता. 


२४. तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या (व्हीव्हीआयपी) प्रवासासाठी दोन “बोइंग ७७७-३०० ईआर” विमानांमध्ये आवश्‍यक ते बदल करण्याच्या प्रस्तावालाही आज मंजुरी देण्यात आली आहे.ही बैठक संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.


२५. बालकामगारविषयक कायद्यात दुरुस्ती करून बालकांकडून कामे करवून घेण्याचे किमान वय १४ वर्षे निश्‍चित करण्याबाबतचा अध्यादेश जारी करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यानुसार बाल श्रम कायदा-१९८६ व २०१२ यात अनेक बदल केले जातील. मुलांना आपल्या वडिलोपार्जित; पण धोकादायक नसलेल्या व्यवसायांत शाळेतून परतल्यावर व सुट्यांमध्ये काम करण्यास याद्वारे मुभा असेल. 


२६. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावित कायदा दुरुस्तीला मंजुरी देण्यात आली. संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात याबाबतचे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. 


२७. पहिल्यांदा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास तीन महिन्यांवरून सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा होईल. यासाठी दंडाची तरतूदही दहा हजार रुपयांवरून 20 ते 50 हजार रुपये इतकी वाढविली जाईल.एखाद्याने बालकामगार कायद्याचे दुसऱ्यांदा उल्लंघन केले, तर त्याला एक ते तीन वर्षे तुरुंगवास होईल.


२८. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवार नवीन युरिया धोरणाला मंजुरी दिली. या धोरणामुळे आता चार वर्षांत रासायनिक खते आणि खत उत्पादनांमध्ये आत्मनिर्भर बनणे आणि शेतक-यांना वेळेवर रासायनिक खते पुरविणे शक्य होणार आहे. मंत्रिमंडळाने पुढील चार वर्षांसाठी नवीन युरिया धोरण ठरवले आहे.  शिवाय, 2015-16 या वर्षासाठी फॉस्फेट आणि पोटॅश-आधारित असलेल्या खतांना स्थिर अनुदान देण्याचे देखील सांगितले आहे.


२९. ‘सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा’ हे अजरामर गीत लिहणारे प्रसिध्द कवी दिवंगत डॉ. मुहम्मद अल्लामा इक्बाल यांना ‘तराना-ए-हिंदी’ पुरस्कार जाहीर झाला. त्यांचे नातू वालीद इक्बाल यांनी शुक्रवारी कोलकाता येथे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बैनर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. कोलकातामध्ये सध्या ‘जश्न ए इक्बाल’ हा कार्यक्रम सुरु आहे. 


३०. दहशतवाद तज्ञ ल्युसी रिचर्डसन यांची ऑक्सफ़र्ड विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


३१. त्रिपुरा राज्य सरकारने मुख्यमंत्री माणिक सरकार यांच्या नेतृत्वाखाली त्रीपुरातून १८ वर्षानंतर लष्कर विशेषाधिकार कायदा (अफस्पा) हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिपुरा राज्यात १६ फेब्रुवारी १९९७ रोजी हा कायदा लागू करण्यात आला होता. 


३२. संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेनुसार (एफ.ए.ओ.) भारतात लोकसंख्येचा साधारणतः १५% लोक म्हणजेच १९.४ कोटी लोक उपासमारीचा सामना करत आहेत. 


३३. २०१४-१५ मध्ये भारताचा आर्थिक विकास दर ७.३% आहे. २०१३-१४ मध्ये हा दर ६.९% इतका होता. भारत आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. 


३४. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ योजनेच्या धरतीवर राज्यात ‘स्वच्छता सप्तपदी’ या नावाने स्वच्छता अभियान राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 


३५. २१ मे १९९१ रोजी ‘लिट्टे’ या दहशतवादी संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली होती. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ २१ मे हा दिवस “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन” म्हणून साजरा केला जातो. 


३६. संपूर्णपणे कृषी विषयासाठी देशातील पहिली वाहिली दूरचित्र वाहिनी ‘डी डी किसान’ सुरु. सर्व केबल व डायरेक्ट टू होम सेवा देणाऱ्या ऑपरेटरना डी डी किसान चे प्रसारण बंधनकारक आहे. यापूर्वी २४ वाहिन्यांचे प्रसारण ऑपरेटरसाठी बंधनकारक होते. केंद्रीय अर्थसंकल्पात डी डी किसानसाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 


३७. आंबेडकरी चळवळीचे लढाऊ नेते एकनाथ आवाड (जीजा) यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांनी ‘कसेल त्याची जमीन’ हे जनआंदोलन उभारले होते. ‘जग बदलू घालूनी घाव’ हे त्यांचे आत्मचरित्र आहे. 

Scroll to Top