०१. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्या निमित्ताने पोर्तुगीज आले. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते भारतात व्यापार करु लागले. या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले.
०२. पूर्वी भारतातील माल इराणचे आखात – कॉन्स्टॅटिनोपल (इस्तंबूल) – इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे. परंतु १४५३ मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला. कारण तुर्कानी युरोपियन व्यापाऱ्यांचा मार्गच अडवून धरला.
०३. भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसऱ्या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते. या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले.
०४. या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जाणाऱ्या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो १४९२ मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला.
०५. पुढे लवकरच पोर्तुगाल या देशास भारताकडे जाणारा मार्ग शोधून काढण्यास यश मिळाले. वास्को-द-गामा हा पोर्तुगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून २३ मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनाऱ्यावरील पहिले पाऊल होते.
०६. पण त्या वेळी भारतात कार्यरत असणार्या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली. त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे हा होता.
०१. व्यापाराच्या हेतुने पोर्तृगीज व डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. भारतात चालविलेल्या व्यापारात पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी खूप नफा कमावला होता. त्याचा मोह इंग्रजांनासुद्धा झाला. भारताशी थेट व्यापार केल्यास कच्चा माल खूप स्वस्तात मिळेल यांची इंग्रजांना खात्री होती. आणि त्यावर भर म्हणजे त्याकाळी अजिंक्य असणाऱ्या फ्रेंच आरमारचा पराभव करून इंग्रजांनी (समुद्र सम्राज्ञी) असा किताब मिळविला होता. त्यामुळे पोर्तुगीजांनी शोधलेल्या सागरी मार्गावर वर्चस्व मिळविण्याचे धाडस इंग्रजांना करावेसे वाटले.
०२. १५९९ साली लंडनच्या लॉर्ड मेयो यांच्या नेतृत्वाखालील गटाने भारताशी थेट व्यापार करण्यासाठी एक कंपनी स्थापन करण्याचे ठरविले. इंग्लंडची महाराणी पहिली एलिझाबेथ हिने ३१ डिसेंबर १६०० रोजी केप ऑफ गुड होप व मैगेलिनीची सामुद्रधुनी या भागांतील सर्व देशांशी खुला थेट व्यापार करण्याची इस्ट इंडिया कंपनीस परवानगी दिली. ही सनद प्रथम १५ वर्षांसाठी होती आणि तसेच काही अनिष्ट घडल्यास कंपनीस दोन वर्षांची नोटीस देऊन रद्द करण्याची तरतूद त्यात होती.
०३. इस्ट इंडिया कंपनीच्या पहिल्या सागरी मोहिमेत कॅप्टन होकिंस आपल्या ताफ्यासह १६०८ मध्ये सुरतला येउन पोहोचला. तत्कालीन मुघल बादशाह जहांगीर याच्याकडे त्याने व्यापारात काही सवलतीसाठी अर्ज केला. त्यावेळी मुघल बादशाहवर पोर्तुगीजांचा प्रभाव होता. त्यामुळे सवलती मिळाल्या नाहीत.
०४. परंतु इंग्रज आरमाराने १६१२ मध्ये एका चकमकीत पोर्तुगीज आरमाराचा पराभव केल्याने पोर्तुगिजांचा मोग्लावरील प्रभाव कमी झाला. त्यानंतर इंग्रजांना सुरत येथे व्यापारी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळाली.
०५. १६१५ साली इंग्रज राजा जेम्सने जहांगीरच्या दरबारी सर थोमस रो याला आपला राजदूत म्हणून पाठवले. थोमस रो ने बादशाहकडून आणखी काही व्यापारी सवलती मिळविल्या. त्यात मुक्त व्यापाराबरोबरच इंग्रजांना अहमदाबाद, भडोच आणि आग्रा येथे व्यापारी वखारी उघडण्यास परवानगी मिळाली.
०६. दरम्यान इंग्रजांनी इतर भागातही व्यापारी वखारी स्थापन केल्या. १६११ मध्ये कॅप्टन हिप्पोनने मसुलीपट्टम येथे एक व्यापारी वखार सुरु केली. इंग्रजांनी ओरिसा, बंगाल या राज्यातही वखारी सुरु केल्या.
०७. कंपनीला ब्रिटीश सरकारकडूनसुद्धा काही महत्वाचे अधिकार मिळाले. १६२३ साली कंपनीला आपल्या कर्मचाऱ्याना गुन्ह्याबद्दल शिक्षा देणे, गंभीर गुन्ह्यबद्दल ज्युरीची संमती असल्यास फाशी देणे अधिकार मिळाला.
०८. हरिहरपूर व बालासोर येथे १६३३ साली इंग्रजांनी आपल्या वसाहती उभारल्या होत्या. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला सुभेदार शाहशुजा याने इंग्रजांना परवानगी दिली. त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. ब्राऊटन याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन शाहशूजाने इंग्रजांना फक्त ३००० रु दर वर्षी देण्याच्या मोबदल्यात संपूर्ण संपूर्ण बंगाल, बिहार ओरिसात मुक्त व्यापाराची परवानगी दिली.
०९. त्यानंतर इंग्रजांनी संपूर्ण बंगाल प्रांतात आपल्या वखारी स्थापन केल्या. १६५० साली कंपनीने बंगालच्या गवर्नरकडून बंगालमध्ये व्यापार करण्यास परवाना मिळवला. इंग्रजांनी १६५१ मध्ये कलकत्त्याजवळ हुगळी येथे बंगालमधील त्यांची पहिली वखार सुरु केली. महत्वाचे व्यापारी केंद्र गोविंदपूर (आजचे कोलकाता) येथेही सतरावे शतकाच्या अखेरीस इंग्रज वखार स्थापन झाली.
१०. ब्रिटीश सरकारकडून १६६१ साली कंपनीला आपल्या वखारीच्या संरक्षणासाठी लढाऊ जहाजे व दारुगोळा पाठविण्याचा अधिकार तसेच १६८३ साली युद्ध व तह करण्याचा तसेच आपली फौज वाढविण्याचा अधिकार मिळाला. १६८६ साली ब्रिटीश सरकारकडून कंपनीला आपल्या आरमारावर ‘अडमिरल’ या हुद्दाचा उच्च नौदल अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार मिळाला.
११. १६८८ साली इंग्लंडचा तत्कालीन राजा दुसरा चार्ल्स याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजाकडून आंदन म्हणून मिळालेले मुंबई हे बेट वार्षिक १० पौंड इतक्या भाड्यावर कंपनीस मिळाले. काही वर्षानंतर मुंबई बेट इंग्रजांचे महत्वाचे व्यापारी केंद्र झाले.
१२. पुढे १७१७ साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फ़र्रुखसियार याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापाऱ्यांनी घेतला. त्यांनी बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमित्ताने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.
१३. सोळाव्या शतकाच्या सुरूवातीस पोर्तुगिजांनी भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आपली सत्ता स्थिर केली. त्यानंतर सतराव्या शतकात डच, इंग्रज व फ्रेंच व्यापारी भारतात आले. त्यावेळी भारतात मुघलांची प्रबळ सत्ता अस्तित्वात होती. त्यामुळे सुरूवातीच्या काळात युरोपीय व्यापाऱ्यांनी आपले लक्ष व्यापारावरच केंद्रित केले.
१४. सुरूवातीस युरोपीय व्यापारी मुघल सम्राटाकडून परवाने मिळवून शांततेने व्यापार करत असत. मात्र औरंगजेब बादशहाच्या मृत्युनंतर मुघल सत्तेला उतरती कळा लागली. मुघल साम्राज्याचे सुभेदार स्वतंत्रपणे वागू लागले. देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली. याचा फायदा युरोपीय व्यापाऱ्यांनी घेतला.
१५. यानंतरच्या काळात व्यापार वाढत जाऊन व्यापारी कंपन्यामध्येही स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेतून युद्धेही होऊ लागली. इस्ट इंडिया कंपनी व फ्रेंच ट्रेडिंग कंपनी या दोन कंपन्यामध्ये खरी स्पर्धा होती. या काळात भारतात निजाम, अवध, बंगाल, मराठा या महत्वाच्या सत्ता होत्या.