०१. प्रत्यक्षात संघर्षाला प्रारंभ १७६३ मध्ये झाला. ताबडतोब कंपनीने मीर कासीमला काढून पुन्हा मीर जाफरला बंगालच्या नवाबपदावर बसविण्याची घोषणा केली. बादशाहा शाह आलमची संमती घेण्याचेही कंपनीला आवश्यक वाटले नाही. पण मीर कासीमने इंग्रजांची दखल घेतली नाही.
०२. त्यामुळे इंग्रजांनी मीर कासीमचा बंदोबस्त करण्यासाठी फौज पाठविली. ७ जुलै १७६३ रोजी कंपनीने मीर कासीमविरूध्द युध्द पुकारले. कंपनीने सर्व कायदे धाब्यावर बसविले. हळूहळू मीर कासीमची ताकद कमी पडू लागली म्हणून तो पाटण्याला निघून गेला. यावेळी कासीमने त्याच्या ताब्यात असणाऱ्या सर्व इंग्रज कैद्यांना ठार मारले. याचा बदला घेण्यासाठी इंग्रजांनी पाटण्यावर फौज पाठविली.
०३. युध्द पुकारण्यापूर्वीच २४ जून १७६३ रोजी एलिसने पाटण्याचा किल्ला व पाटणा ताब्यात घेतले. दंडेलीची बातमी लागताच मीर कासिमच्या सेनापतीने पाटण्याजवळील कंपनीच्या वखारीवर हल्ला करून एलिस आणि कंपनीचे सैन्य यांना वखारीत कोंडले. मीर जाफरला सुभेदारपद देण्यासाठी मुर्शिदाबादकडे निघालेल्या कंपनीच्या सैन्यावर ५ जुलै १७६३ रोजी मीर कासिमने केलेला हल्ला अयशस्वी ठरला.
०४. १९ जुलै १७६३ रोजी काट्वा येथे झालेल्या लढाईत मीर कासिमचा निष्णात सेनापती मुहंमद तकी मारला गेला व त्याला माघार घ्यावी लागली. २३ जुलै १९६३ रोजी मुर्शिदाबाद येथे मीर जाफरला सुभेदारी देण्यात आली. मीर कासिमला बंगाल सुभ्यातून हाकलून लावण्यासाठी कंपनीने मुंघेरकडे सैन्य पाठविले. २ ऑगस्ट रोजी मुर्शिदाबादजवळ व ५ सप्टेंबर रोजी गंगेच्या काठी उघुनाला येथे किरकोळ लढाया होऊन मीर कासिमला माघार घ्यावी लागली.
०५. ९ सप्टेबर १७६३ रोजी मीर कासिमने कंपनीला ताकीद दिली, की जर पाटण्याच्या रोखाने कंपनी सैन्याने आगेकूच केला, तर पाटण्यातील एलिस व इतरांना देहदंड दिला जाईल. कंपनीने मुंघेर घेतल्याबरोबर मीर कासिमचा सेनापती वॉल्टर राइनहार्ट (समरू) याने एलिस इत्यादींना मारले.
०६. यावेळी अवधचा नवाब शुजाउद्दौला होता. सादत खानपासून शेवटच्या वाजीद अली शाह पर्यंत सर्व सुभेदार अयोध्येचे नवाब म्हणून ओळखले जातात. त्यापैकी शुजौद्दौलाच्या काळात इंग्रजांचा अयोध्येच्या राजकारणात प्रवेश झाला. व वाजीद आली च्या कारकिर्दीत अयोध्येचा स्वतंत्र दर्जा संपुष्टात आला.
०७. नोव्हेंबर १७६३ मध्ये मीर कासिमने पाटणा सोडले व तो शुजाउद्ददौलाच्या आश्रयाला गेला. पानिपतच्या युद्धाच्या वेळी दिल्लीहून पळालेला मुगल सम्राट शाह आलम अवधच्याच आश्रयाने होता. १७६३ च्या अखेरीपासून मार्च १७६४ पर्यंत कंपनीच्या गोऱ्या व हिंदुस्थानी सैन्यांत बेदिली होती. त्यामुळे सैनिकी कारवायात खंड पडला होता. या काळात शाह आलम, शुजाउद्ददौला व मीर कासिम यांनी मोगली संयुक्त आघाडी उभी करून पाटण्याकडे चाल केली.
०८. इंग्रजांना बंगालच्या बाहेर काढण्याबाबत तिघांचे संगनमत होऊन त्यांनी एक संयुक्त फळी तयार केली. “इंग्रजांनी राजकीय कारवाया थांबवून व्यापारापुरते आपले कार्यक्षेत्र मर्यादित ठेवावे ” असा खलिता संयुक्त फळीने इंग्रजांकडे पाठवला. इंग्रजांनी खलीत्याची दखल न घेतल्याने तिघांनी आपल्या संयुक्त फौजा पाटण्यावर पाठविल्या. इंग्रजांनी संयुक्त फौजेचा पराभव करून त्यांना पाटण्यापर्यंत माघार घेण्यास भाग पाडले.
०९. संयुक्त फळीने परत जोरदार तयारीसह फौज जमविली. त्यात ५०००० सैनिक होते. पाटण्यापाशी मे १७६४ मध्ये चकमकी उडाल्या. पावसाळ्यामुळे मोगली सैन्याने बक्सार येथे तळ ठोकला. बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. १२० किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.मोगली सैन्याचा पाठलाग कंपनी सैन्याने सुरू केला. बक्सार येथे संयुक्त आघाडीला तडे जाऊ लागले. शाह आलमने कंपनीशी गुप्तपणे मसलत सुरू केली.
१०. मीर कासिमच्या अकार्यक्षम नेतृत्वामुळे आघाडीचे नेतृत्व शुजाउद्दौलाकडे आले. पाटण्याहून सेनापती मेजर हेक्टर मन्रोच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कंपनी सैन्याला बक्सारपाशी २२ ऑक्टोबर १७६४ रोजी मोगली सैन्य दिसले. मन्रोने २४ ऑक्टोबरला त्यावर हल्ला करण्याचे ठरविले. पूर्वतयारी म्हणून त्याने गंगेच्या किनाऱ्यापासून पूर्वेकडे एका तळ्यापर्यंत तिरप्या रांगेचा व्यूह रचला. व्यूहाची रचना साधारणपणे चौकोनी होती.
११. इंग्रज सैन्यात ७०२७ गोरे शिपाई व इतर काही हजार एतद्देशीय सैन्य होते. शुजाउद्ददौला याने २३ ऑक्टोबर रोजी गंगातीरावरील सेरामपूर गावापासून पूर्वेकडे अर्धचंद्राकृती व्यह रचला व कंपनी सैन्याच्या पीछाडीवर व डाव्या बगलेवर धडाका सुरू केला. मन्रोने कंपनी सैन्याच्या पीछाडी सैन्याला उत्तरेकडे तोंड फिरवून मोगली सैन्याच्या हल्ल्यास तोंड द्यावयास लावले.
१२. मीर कासिमचा सेनापती राइनहार्ट याने आयत्या वेळी काढता पाय घेण्यास सुरूवात केली. मन्रोने तोफखाना पुढे काढून मोगली तोफा बंद पाडल्या. मोगली घोडदळाचे हल्ले अयशस्वी झाले. मन्रोने ताबडतोब मोगली सैन्याच्या आघाडीवर व डाव्या बगलेवर जोरदार हल्ला केला. मोगली सैन्याचा धीर सुटून त्याने रणांगणातून माघार घेतली.
१३. कंपनीचा विजय झाला. कंपनीचे ८५७ गोरे व ७,०७२ एतद्देशीय सैनिक आणि संयुक्त आघाडीचे ६,००० वर मोगली सैनिक ठार झाले, असे म्हणतात. संयुक्त आघाडीच्या पराभवामुळे येथे ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला भारतात आता इंग्रजाना आव्हान देणारा कोणी उरले नाही. इंग्रजांचे प्रभावक्षेत्र पश्चिमेला अलाहाबादपर्यंत वाढले आणि त्यामुळे दिल्लीला जाण्याचा मार्ग मोकळा झाला.
१४. बंगालचा नवाब मीर जाफर इंग्रजांच्या हातातील खेळणे बनला. दिल्ली सम्राट शाह आलम इंग्रजांना शरण आला.ह्यानंतर बंगालने इंग्रज नियंत्रणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही. मीर कासीम सत्तावंचित झाला व त्यापुढील वर्षे त्याने दिल्लीला काढली. १७७७ मध्ये मीर कासीमचा मृत्यू झाला.
१५. अवधचा नवाब शुजाउद्दौला मल्हारराव होळकरांच्या आश्रयाला आला. होळकर-शुजाउद्दौला यांच्या संयुक्त फौजेचा इंग्रजांनी ३ मे १७६५ रोजी रोजीकोरा येथे पराभव केला. त्यानंतर शुजाउद्दौला इंग्रजांना शरण आला. इंग्रजांनी परत त्याला सन्मानाने अवधचा राजा बनविले. ह्यानंतर अवधनेसुद्धा इंग्रज नियंत्रणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला नाही.
१६. पराभूत मुघल बादशाह व अवधचा नवाब यांच्याशी सन १७६५ मध्ये इंग्लिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने रॉर्बट क्लाईव्हने तह केला. हा तह अलाहाबादचा तह म्हणून प्रसिध्द आहे. या तहान्वये महसूल गोळा करण्याचा अधिकार इंग्रजांनी मिळवला. याला दिवाणी अधिकार असे म्हणतात.
१७. दिवाणी अधिकाराप्रमाणे इंग्रजंनी बंगालच्या नवाबकडून फौजदारी अधिकारीही मिळवले. यामुळे इंग्रज हे बंगालचे प्रत्यक्ष शासक बनले. नवाब केवळ नामधारी शासक राहिला. इंग्लिश व्यापारी कंपनी राजकीय सत्ताधारी बनली. भारतातील इंग्रजी सत्तेचा पाया अशा प्रकारे बंगालमध्ये घातला गेला.
१८. बक्सारच्या लढाईचे अनेक अनिष्ट परिणाम झाले. बंगालचे प्रशासन इंग्रजांनी ठरवून दिलेल्या नायब सुभेदाराने पाहावे असे ठरले. बंगालचा सुभेदार इंग्रजाचा पेन्शनर बनला. कोरा आणि अलाहाबाद अयोध्या प्रांतातून काढून मुगल बादशाहकडे देण्यात आले. अयोध्या प्रांत शुजाउद्दौलाकडे राहावा व त्याबद्दल त्याने इंग्रजांना ५० लाख रुपये द्यावेत असा तह झाला.
१९. मुगल बादशाहने इंग्रज कंपनीला बंगाल, बिहार, ओरिसा या प्रांताचे दिवाणी हक्क बहाल केले. पुढे सात वर्षांनी कंपनीने त्याचा प्रत्यक्ष उपयोग करण्यास सुरुवात केली. या परिणामामुळे बक्सारची लढाई प्लासिपेक्षा काकणभर जास्त महत्वाची आहे असे समजले जाते.
२०. इंग्रजांनी प्लासीचा विजय मुख्यतः कटकारस्थान व विश्वासघाताने मिळविला होता. त्यादृष्टीने बक्सारचा विजय खऱ्या शस्त्रसामर्थ्याचा होता. म्हणून प्लासीपेक्षा बक्सारचा विजय सरस होता, असे इतिहासकार म्हणतात. इंग्रजांनी बंगाल, बिहार व ओरिसा जिंकण्याची जी प्रक्रिया प्लासीच्या लढाईपासून सुरु केली होती. ती बक्सारच्या लढाईने पूर्ण झाली.
बक्सारची लढाई – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.