०१. इंग्रजांची भारतातील पहिली वखार मुगल सम्राट जहांगीरच्या कारकिर्दीत पश्चिम किनाऱ्यावर सुरत येथे स्थापन झाली. १६४० मध्ये इंग्रजांनी मद्रासला जागा घेऊन सेंट जॉर्ज किल्ला बांधला.
०२. बंगालमध्ये पहिली इंग्रज वखार १६५१ मध्ये हुगळी येथे निघाली. त्यासाठी बंगालचा तत्कालीन सुभेदार शाहशुजा (शाहजहानचा द्वितीय पुत्र) ह्याने इंग्रजांना परवानगी दिली. तत्कालीन बंगाल प्रांतात बंगाल, ओरिसा व बिहार यांचा समावेश होता.
०३. त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. बाऊटन ह्याने केलेल्या उपचारामुळे खुश होऊन शाहशुजाने इंग्रजांना फक्त ३००० रु. वार्षिक देण्याच्या मोबदल्यात संपूर्ण बिहार, बंगाल व ओरिसात मुक्त व्यापाराची परवानगी दिली. लौकरच इंग्रजांनी कासीमबाजार, पटना इत्यादी ठिकाणी वखारी स्थापन केल्या. महत्वाचे केंद्र गोविंदपूर (कोलकाता) येथेही सतरावे शतक संपता संपता इंग्रज वखार स्थापन झाली.
०४. औरंगझेबाच्या कारकिर्दीत १७०२ मध्ये सुभ्याचा संपूर्ण कारभार मीर जाफर खान कडे आला. त्याला मुर्शिकुलीखान हा किताब मिळाला होता. १७२६ मध्ये त्याचा जावई शुजौद्दिन खान बंगालचा नवाब बनला. त्याने बंगाल प्रांतात ओरिसाचाही समावेश केला. शुजाउद्दौलाने आपला विश्वासू सहकारी अलीवर्दीखान याच्याकडे बिहार प्रांताची जबाबदारी सोपविली.
०५. शुजाउद्दौलाच्यानंतर त्याचा मुलगा सर्फराज खान नवाब बनला. १७४० मध्ये सर्फराजखान ह्याच्या विरुद्ध बंड करून व त्याला युद्धात ठार मारून बिहारचा नायब सुभेदार अलीवर्दीखान नबाब बनला. आपले पद सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने तत्कालीन मुघल सम्राट मुहम्मदशाह याच्याकडून वार्षिक १ कोटी रुपयाच्या मोबदल्यात बंगालवर राज्य करण्याचे संमतीपत्रक घेतले.
प्लासीच्या लढाईची पार्श्वभूमी
०१. बंगालवर मराठ्यांची आक्रमणे सुरु झाल्याने अलीवर्दी खानाचा सर्व वेळ लढण्यातच गेला. मराठ्यांच्या ह्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी इंग्रजांनी नबाबाच्या परवानगीने कलकत्त्याच्या फोर्ट विल्यमच्या चारही बाजूने खंदक खोदले.
०२. मराठ्यांनी नबाबाला इंग्रजांना बंगालमधून हाकलून देण्याची सूचना केली. त्यावर नबाबाने युरोपियनांना मधमाशांची उपमा देऊन त्यांना त्रास न दिल्यास मध मिळत राहील आणि त्रास दिल्यास त्या दंश करून मारून टाकतील असा युक्तिवाद केला.
०३. एप्रिल १७५६ साली अलीवर्दी खानच्या मृत्युनंतर त्याच्या मुलीचा अमीना बेगम चा मुलगा मिर्झा मुहम्मद सिराज उद्दौला वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी बंगालचा नवाब बनला. त्याला मन्सूर उल मुल्क, सिराजूद, आणि हैबत जंग हे किताब देण्यात आले होते.
०४. पुर्नियाचा शासक शौकत जंग (सिराजचा मावसभाऊ), मेहरुन्निसा उर्फ घसीटी बेगम (सिराजची मावशी), राजा रजबल्लाह, आणि मीर जाफर हे सिराजचे प्रतिस्पर्धी होते. शिवाय इंग्रजही सिराजच्या डोळ्यात खुपत होता. सिराजने नवाब बनताच युरोपियनांना वसाहती व कारखान्याभोवती उभारलेली तटबंदी नष्ट करण्याचे फर्मान काढले. फ्रेंचानी नवाबाच्या आदेशाचे पालन केले परंतु इंग्रजांनी यात टाळाटाळ केली.
०५. प्लासित इंग्रजांनी त्यांना मिळालेले करमुक्त व्यापाराचे परवाने येथील व्यापाऱ्यांना विकले.फ्रेंचाशी युद्ध सुरु होण्याची परिस्थिती दिसत असल्याने इंग्रजांनी फोर्ट विलियम लढण्यासाठी सज्ज केला व परकोटावर तोफा चढविल्या. ह्याबद्दल सिराजने जाब विचारला असता इंग्रजांनी टाळाटाळ केली. व सिराजच्या प्रतिस्पर्ध्यांना समर्थन जाहीर केले.
०६. इंग्रजांनी नवाबाकडे करभरणाही केला नव्हता. त्याचप्रमाणे नवाबाच्या शत्रूंशी इंग्रजांनी मैत्रीचे संबंध ठेवले. कृष्णदास या श्रीमंत व्यापाऱ्याचे नवाबासोबत खटके उडाल्याने तो इंग्रजांच्या आश्रयास गेला. इंग्रजांनी त्याला परत नवाबाच्या स्वाधीन करण्यास नकार दिला. या घटनेमुळे नवाब इंग्रजांवर भयंकर संतापला. त्याने कासीमबझार व कलकत्ता येथील इंग्रजांच्या वखारींवर हल्ला करून त्या ताब्यात घेतल्या.
०७. त्यानंतर ५०००० फौजेनिशी इंग्रजांच्या फोर्ट विल्यम या किल्ल्यावर हल्ला चढविला. १५ जून १७५६ रोजी फोर्ट विलियमचा वेढा सुरु झाला आणि ५ दिवसानंतर इंग्रजांनी शरणागती पत्करली. गवर्नर रॉजर ड्रेक पळून गेला. कलकत्त्याचा ताबा माणिकचंदकडे सोपवून नवाब आपली राजधानी मुर्शिदाबाद येथे निघून गेला.
०८. कलकत्ता युद्धानंतर काही इंग्रजांना युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले. १४६ युद्धकैद्यांना १८ फुट लांब व १४.१० फुट रुंद खोलीत डांबण्यात आले. परिणामी जून महिन्याच्या गर्मीमुळे व प्राणवायूचा पुरवठा कमी पडल्याने त्यापैकी १२३ कैदी मृत्युमुखी पडले.
०९. ह्याबद्द्ल सिराजला जबाबदार धरण्यात येते. मात्र नवाबाचा दोष एवढाच कि ह्या घटनेत दोषी अधिकाऱ्याविरुध्द कारवाई केली नाही. तसेच जे जिवंत राहिले त्यांच्या प्रति दया दाखविली नाही. मात्र इंग्रज कंपनीने हि घटना उचलून धरली. पुढील ७ वर्षे बंगालच्या नवाबाशी इंग्रजांचा जो संघर्ष चालला त्याच्या मुलाशी हि घटना होती.
प्लासीची लढाई
०१. कलकत्ता पडल्याची बातमी येताच मद्रास येथून एडमिरल चार्ल्स वाटसन व क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली एक सैन्य कलकत्त्याला पोहोचले. डिसेंबर १७५६ ला हे सैन्य कलकत्त्याला पोहोचले. २ जानेवारी १७५७ रोजी माणिकचंदने लाच घेऊन कलकत्त्याचा ताबा इंग्रजांना दिला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हुगळी व सभोवतालच्या प्रदेशात लुटालूटही केली. ही घटना कळताच सिराज ४०००० फौजेनिशी निघाला. पण क्लाइव्ह ने त्याला अचानक हल्ला करून जेरीस आणले.
०२. ह्यानंतर सिराज आणि क्लाइव्ह यांच्यात ९ फेब्रुवारी १७५७ रोजी अलीनगर येथे शांततेचा तह झाला. त्याने इंग्रजांना व्यापारातील जुन्या सवलती परत मिळाल्या व कलकत्त्याची लष्करी सिद्धता करण्याची अनुमती मिळाली. तसेच इंग्रजांचे झालेले नुकसान भरून देण्याचेही नवाबाने कबुल केले. याशिवाय इंग्रजांना आपली नाणी पाडण्याचा व स्वतःचे चलन वापरण्याचा अधिकार देखील मिळाला.
०३. तरीही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांना चंद्रनगर येथील फ्रेंच वसाहती जिंकण्यासाठी नवाबाची संमती हवी होती. पण सिराजने याचे काहीच उत्तर दिले नाही. तरीही मार्च १९५७ मध्ये इंग्रजांनी फ्रेंच वसाहत चंद्रनगर जिंकले. इंग्रजांच्या या कारवाईवर नवाबाने नाराजी व्यक्त केली व फ्रेंचांना संरक्षण दिले.
०४. यामुळे क्लाइव्हने एक कारस्थान रचले. त्यात नवाबाचा मुख्य सेनापती मीर जाफर, खजिनदार राय दुर्लभ, श्रीमंत सावकार जगत
सेठ, व्यापारी अमीनचंद व सेनापती खादीम खान सहभागी झाले. कारस्थानानुसार खादिमखानाने प्लासीकडे कूच करावी, मीर जाफर याने त्यास नवाब पद द्यावे व लढाई जिंकल्यानंतर मीर जाफर यास नवाब बनवावे. या सर्वात अमीनचंद याने ३० लाखाच्या मोबदल्यात मध्यस्थी केली होती. पण शेवटी क्लाइव्हने अमीनचंद यालासुद्धा फसविले.
०५. कारस्थानानुसार क्लाइव्हने सिराज वर आरोप केला कि त्याने फ्रेंचांना सोबत घेऊन इंग्रजांना फसविले. यासोबतच त्याने सिराजसमोर काही अशक्य मागण्या ठेवल्या. त्या मागण्या सिराजने फेटाळल्या. यानंतर क्लाइव्ह आपल्या ८००० सैन्यासह मुर्शिदाबाद्कडे निघाला. सिराज ५०००० सैन्य घेऊन मुर्शिदाबाद येथे तयार होता. इंग्रज व सिराज २३ जून १९५७ रोजी मुर्शिदाबाद्च्या दक्षिणेला २२ मैलावर असलेल्या हुगळी (भगीरथी) नदी काठावरील प्लासी (पलास) गावात एकमेकांसमोर आले.
०६. इंग्रज सैन्यात ९५० युरोपियन पायदळ, आठ तोफा व १०० युरोपियन तोफ्ची, ५० इंग्रज नाविक आणि २१०० भारतीय सैनिक होते. नवाबाजवळ ५०००० सैन्य होते व त्याचे नेतृत्व राय दुर्लभ व मीर जाफरकडे होते. यासोबतच सिराजकडे ५३ मोठ्या तोफा आणि सेंट फ्रेअसच्या हाताखाली फ्रेंचांचा तोफखाना होता.
०७. क्लाइव्हने १९ जून रोजी काटवाचा किल्ला घेऊन मुर्शिदाबादकडे कूच केली. पुढे लष्करी मंडळाचा निर्णय धुडकावून २१ जून रोजीच तो पूर आलेली भागीरथी पार करून प्लासीकडे गेला. २२ जून रोजी तो आपल्या सैन्यासह प्लासीजवळच्या आंबराईत तळ ठोकून होता. दुसरे दिवशी युद्धास प्रारंभ झाला
०८. लढाई सुरु होताच मीर मदान व मोहनलाल यांच्या तुकडीने एकदम हल्ला करून क्लाइव्हला मागे जाण्यास बाध्य केले. पण अकस्मात एका गोळीने मीर मदान मारला गेला. कारस्थानानुसार दोन्ही सेनापतींनी युद्धात काहीच हालचाल केली नाही. मीर जाफर तठस्थपणे सर्वकाही पाहत होता.
०९. नवाबाकडील फ्रेंच तुकडीशौर्याने लढली पण पराभूत झाली. तेव्हा मीर जाफरने सिराजला सल्ला दिला कि त्याने युद्धकार्य अधिकाऱ्यांकडे सोपवावे व स्वतः युद्धभूमी सोडून निघून जावे. त्याप्रमाणे नवाब २००० घोडेस्वरासह मुर्शिदाबादला निघून गेला. परंतु त्याला राजमहाल येथे पकडले. मीर जाफरच्या हुकुमावरून जाफरचा मुलगा मिरान याने सिराजला ठार मारण्याची आज्ञा दिली. त्याप्रमाणे मोहम्मद अली बेगने २ जुलै १७५७ रोजी सिराजचा ‘नमक हराम देवढी’ येथे वध केला.
१०. अखेर क्लाइव्हच्या विजयाबद्दल मीर जाफरने त्याचे अभिनंदन केले. २३ जून १७५७ ला प्लासिजवळ इंग्रजांनी सिराजचा पराभव केला. या लढाईत सिराजचे ५००० सैनिक मारले गेले तर कंपनीचे फक्त २९ सैनिक मारले गेले. नंतर मीर जाफरला मुर्शिदाबाद येथे बंगालचा नवाब घोषित करण्यात आले.
११. इंग्रजांच्या मदतीबद्दल मीर जाफरने मागील रकमेच्या ऐवजी कंपनीला २४ परगणा जिल्ह्याचा प्रदेश दिला. इंग्रजांना नवाबाच्या दरबारात वकील नेमण्याची परवानगी मिळाली. स्वतः क्लाइव्हला २३४००० पौंड भेट देण्यात आली. इतर अधिकाऱ्यांना ५० लक्ष रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले. बंगालमधील सर्व फ्रेंच वसाहती इंग्रजांना देण्यात आल्या. भविष्यात इंग्रज अधिकाऱ्यांना व व्यापाऱ्यांना खाजगी व्यापारावर कोणताही कर लागणार नाही असे ठरविण्यात आले.
१२. प्लासीचे युध्द हे इंग्रजांच्या दृष्टीने भारतातील विजयाचे पहिले प्रतीक ठरले. या युध्दाने इंग्रजी सत्तेचा पाया घातला गेला. प्लासीच्या युध्दाने जरी भारत हातात आला नसला तरी तो हातात आणण्याची गुरुकिल्ली इंग्रजांना मिळाली. इस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापारी कंपनी राहिली नाही तर राजकीयदृष्ट्या भारतात सत्ता प्राप्त करणारी सर्वोच्च अधिकारी संघटना झाली. त्याचवर्षी कंपनीने कलकत्त्यात नाण्याची टाकसाळ सुरु केली.
* या विषयीचे व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
* या विषयी भारत सरकारची अधिप्रमाणित मुव्ही पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Please Share This Article………………