इंग्रज सिंध युद्ध
इंग्रज सिंध युद्ध
०१. पेशवाईचा १८१८ मध्ये अस्त झाला आणि बराच मोठा भू प्रदेश इंग्रजांच्या ताब्यात आला. आता पंजाबमधील शीख साम्राज्य, सिंध व बलुचिस्तानचे अमीर ही राज्येच जिंकावयाची राहिली होती. बाकीच्या संपूर्ण भारतीय प्रदेशावर आता कंपनीचा ताबा प्रस्थापित झाला होता.
०२. अॅक्हर्स्टच्या कारकिर्दीतपासून कंपनीचे लक्ष सर्व बाजूंनी भारताच्या भौगोलिक सीमेपर्यत आपले राज्य वाढविण्याकडे केंद्रित झाले होते. जसजसा साम्राज्याविस्तार वाढला तसतशा या साम्राज्याचे संरक्षण करण्याच्या समस्याही निर्माण झाल्या. अॅम्हर्स्ट ते डलहौसी पर्यतच्या सर्वच गव्हर्नरांना या समस्येची उकल करण्याकडे लक्ष द्यावे लागले.
०३. लॉर्ड हेस्टिंग्जनंतर लॉर्ड अॅक्हर्स्ट भारताचा गव्हर्नर जनरल झाला. त्याच्या कारकिर्दीतच पहिले ब्रम्ही युध्द झाले. या युध्दात इंग्रजांनी ब्रम्ही फौजांचा पराभव केला. १८२६ साली यांदेबूच्या तहाने ब्रम्ही सरकारने इंग्रजांना आराकान व तेनासरीम हे प्रांत दिले व आपल्या फौजा असामच्या प्रदेशातुन मागे घेतल्या.
०४. भारतातील आपली सत्ता सुरक्षित करण्यासाठी इंग्रज वायव्य सरहद्दीकडे वळले. अफगाणिस्तानातून रशिया भारतावर आक्रमण करील अशी त्यांना भीती होती. म्हणून अफगाणिस्तानावर प्रभाव प्रस्थापित करण्याचे इंग्रजांनी ठरवले. अफगाणिस्तानकडे जाणारे मार्ग सिंध व पंजाबमधून जात होते. यामुळे सिंधचे महत्व इंग्रजांच्या ध्यानात आले. सिंधच्या प्रदेशावर अमीरांची सत्ता होती. इंग्रजांनी सिंध मध्ये व्यापारासाठी मुगल बादशाहकडून १६३० सालीच परवानगी मिळविली होती.
०५. सिंध प्रांत पूर्वी मोगल साम्राज्याचा एक विभाग होता. या साम्राज्याच्या पतनानंतर अफगाणांनी सिंध काबीज केला. अफगाणिस्तानात जेव्हा यादवी सुरु झाली त्या वेळी १७६८ मध्ये बलुचिस्थानातील तालपूर जातीने तेथे आपली सत्ता स्थापन केली. सिंधमध्ये तीन निरनिराळे सरदार मीरपूर व हैद्राबाद येथे राज्य करीत होते.
०६. १८०९ मध्ये इंग्रजांनी सिंधच्या अमीराशी तह करून फ्रेंचांना सिंधमध्ये येण्यास प्रतिबंध केला. व्यापारी व लष्करीदृष्टया इंग्रजांना सिंध महत्वाचा वाटत होता. त्यामुळे बेंटिकने तेथील अमीरांशी घनिष्ठ संबंध स्थापन करण्याचा प्रयत्न केला . त्यासाठी र्बोड ऑफ कंट्रोलचा अध्यक्ष लॉर्ड एलेनबरो याने सुचविलेल्या योजनेनूसार कार्य करण्याचे त्याने ठरविले.
०७. १८३० मध्ये लेफटनंट रॉर्बट बर्न याला काही घोडे व अन्य वस्तू रणजीतसिंगला भेट देण्यासाठी सिंधमार्गे पंजाबला पाठविण्यात आले. बर्नला असा गुप्त आदेश देण्यात आला होता. की त्याने प्रवासात सिंधच्या राजकीय व लष्करी स्थितीची पाहाणी करावी. जमल्यास अमीराशी व्यापारी करार करावा आणि आपला अहवाल गव्हर्नर जनरलकडे पाठवावा. परंतु त्याने फारसा फरक पडला नाही.
०८. बर्नच्या योजनेमूळे अमीरासोबतच रणजितसिंगच्या मनातही इंग्रजांच्या हेतुबदल शंका निर्माण झाली. कारण सिंध जिंकून घेण्याची त्याचीही इच्छा होती. पंरतु रणजितसिंगने सिंधवर आपले वर्चस्व प्रस्थापित करावे ही गोष्ट इंग्रजांना मान्य नव्हती.
०९. रणजीतसिंहाने सिंधवर स्वारी करण्याची धमकी दिली होती. सिंधचे अमीरसुध्दा रणजितसिंगच्या संभाव्य आक्रमणाबदल भयभीत होते. सिंधच्या अमीरने अफगाणिस्तानच्या अमीराकडे संरक्षण मागितले. पण अफगाणिस्तानच्या आमीरने काहीच प्रतिसाद दिला नाही.
१०. बेंटिंकने त्यांच्या भीतीचा फायदा घेऊन कच्छचा इंग्रज रेसिडेंट कर्नल पॉटीजर याला अमीराशी बोलणे करण्यासाठी पाठविले. त्याने १८३२ मध्ये अमीराला कंपनीशी व्यापारी तह करण्यास भाग पाडले. या तहानुसार इंग्रज सिंधमध्ये व्यापार करू शकत होते. अमीराला कंपनीने असे आश्वासन दिले होते, की कंपनी आपल्या फौजा सिंधमधुन कधीही नेणार नाही.
११. या तहाने इंग्रजांनी सिंधमध्ये व्यापारासाठी काही सवलती मिळविल्या. त्याचप्रमाणे अन्य कोणत्याही सत्तेने सिंधमध्ये येउ नये अशी अटही घातली. तहामुळे इंग्रजांनी रणजीतसिंहास सिंधमध्ये येण्यास मनाई केली. इंग्रज रेसिडेंटला सिंधचे संरक्षण करण्याची परवानगी अमीराने दिली.
१२. त्यानंतर लॉर्ड ऑकलंड गवर्नर जनरल असताना त्याने अफगाणिस्तानचा अमीर, रणजीतसिंह व इंग्रज यांच्यात एक त्रिपक्षीय तह घडवून आणला व सिंध कब्जात आणण्याची चाल खेळली. रणजितसिंह व अफगाणिस्तानचा अमीर यांच्या दबावापुढे झुकून सिंधच्या अमीराने डिसेंबर १८३८ मध्ये इंग्रजांशी तह केला. या करारानुसार अमीरांनी हैद्राबाद येथे इंग्रज रेसिडेंट ठेवून घेण्याचे मान्य केले.
१३. पहिल्या इंग्रज अफगाण युध्दाला सुरुवात झाल्यावर इंग्रज सेनेला रणजितसिंगने आपल्या प्रदेशातून जाऊ दिले नाही. त्यामूळे ऑकलंडने १८३२ चा अमीरांशी झालेला करार मोडून इंग्रज सैन्य सिंधमधुन अफगाणिस्तानाकडे पाठविले. एवढेच नव्हे तर युध्दाच्या खर्चासाठी त्याने सिंधच्या अमीरांकडून २१ लक्ष रु वसूल केले.
१४. त्यांनंतर १८३९ मध्ये ऑकलंडने अमीरांशी पुन्हा एक नवीन तह केला. या तहानुसार इंग्रजांना कराची बंदर मिळाले. आमिरच्या संरक्षणासाठी ५०० सैनिकांची तुकडी ३ लाख रुपयाच्या मोबदल्यात दिली गेली. याचबरोबर इंग्रज-अफगाण युद्धात सिंधच्या आमीरने इंग्रजांना मदत केली.
१५. हैद्राबादच्या इंग्रज रेसिडेंटने २ अमीरांबदल इंग्रजांना तक्रार केली. त्यामुळे त्यांची चौकशी करण्याकरीता लॉर्ड एलनबरोने सर चार्ल्स नेपियरला सैन्यासह सिंधमध्ये पाठवले. ९ सप्टेंबर १८४२ रोजी तो कराचीत येऊन दाखल झाला. त्याने अमीराविरुध्द पुरावे गोळा केले व त्याच आधारावर अमीरांनी कंपनीशी केलेला करार पाळला नाही ही सबब पुढे केली. नोव्हेंबर १८४२ मध्ये त्यांच्यापूढे नेपियरने एक नवीन करार ठेवला.
१६. त्यात अमीरांनी आपली स्वतंत्र नाणी पाडू नयेत, सिंधमधील शिकारपूर, सख्खर, भक्कर, ही महत्वाची ठिकाणे कंपनीच्या ताब्यात द्यावीत, सख्खरच्या उत्तरेकडील प्रदेश बहावलपूरच्या नबाबाला द्यावा, सिंधू नदीतून मुक्त संचार करण्याची इंग्रजांना परवानगी द्यावी, अमीरांनी कंपनीशी एकनिष्ठ राहावे इत्यादी अटी अमीरासमोर ठेवल्या. या कराराच्या मोबदल्यात अमीरांना तैनाती फौजेच्या खर्चासाठी जे ३ लक्ष रु द्यावे लागत होते ते माफ करण्यात आले. या तहातील ‘सिंधमध्ये इंग्रजांना नाणी पाडण्याचा हक्क’ देऊन अमीराने आपले सार्वभौमत्व गमावले.
१७. हैद्राबादच्या परिषदेत अमीरांनी इच्छा नव्हती तरी या करारावर सहया केल्या. या सहया म्हणजे जूलूम जबरदस्तीच होती. इंग्रजांपूढे अशी शरणागती पत्करण्यास काही अमीर तयार नव्हते. १५ फेब्रुवारी १८४३ राजी सायंकाळी पुष्कळशा बलूची लोकांनी रेसिडेंट औट्रमच्या बंगल्यावर हल्ला चढवला, पण हल्ला होताच औट्रम पळून गेल्यामुळे वाचला.
१८. हैद्राबादच्या उत्तरेस सुमारे १० मैलांवर मियानी येथे २०,००० बलूची सैन्य गोळा झाले होते. १७ फेब्रूवारी १८४३ रोजी नेपियर हैद्राबादहून सैन्यासह निघाला आणि त्याने बलूची सैन्यावर हल्ला चढवला. मियानी येथे घनघोर युध्द होऊन त्यात अमीरांचा पराभव झाला. हैद्राबाद शहर इंग्रजांच्या ताब्यात आले.
१९. काही दिवसांनंतर पुन्हा अमीर हैद्राबादवर चालून आले. हे वर्तमान कळताच २४ मार्च १८४३ रोजी नेपियरने एकदम हल्ला करुन त्यांना पराभूत केले. २७ मार्च १८४३ रोजी इंग्रज सेनेने मीरपूर जिंकून घेतले. १४ जून १८४३ रोजी अमीरांचा नेता शेर मोहम्मद याचाही पाडाव करुन नेपियरने सर्व सिंध इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला. ऑगस्ट १८४३ मध्ये एलनबरोने सिंधचे विलीनीकरण ब्रिटिश साम्राज्यात झाल्याची घोषणा केली. सिंधवर विजय मिळवून देणाऱ्या नेपियरलाच तेथे गव्हर्नर म्हणून नेमण्यात आले.