डॉ. बाबासाहेब आंबेडकर
* वैयक्तिक जीवन
०१. डॉ. आंबेडकरांचा जन्म लष्करी छावणीत महार कुटुंबात झाला. सुभेदार रामजी सकपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचे ते १४वे अपत्य होते. हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या गावचे. त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते. आंबेडकरावर गौतम बुद्ध, संत कबीर व महात्मा फुले यांचा प्रभाव होता.
०२. इ.स. १८९६ मध्ये भीमरावांच्या आईचे-भीमाबाईंचे मस्तकशूळ या आजाराने निधन झाले. त्यावेळी भीमरावांचा आधार त्यांच्या आत्या मीराबाईं बनल्या.
०३. सुभेदार रामजींनी इ.स. १८९६ च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील ‘कॅम्प स्कूल’ मध्ये आपल्या भीमरावांचे नाव दाखल केले.
०४. रामजींनी इ.स. १८९८ साली दुसरे लग्न केले आणि कुटुंब मुंबईला नेले. तेथे आंबेडकर एलफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतील पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले.इ.स. १९०६ मध्ये बाबासाहेबांचे लग्न दापोलीच्या रमाबाई (वय ९ वर्षे) यांच्याबरोबर झाले.
०५. २ फेब्रुवारी १९१३ रोजी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जुलै १९२६ मध्ये त्यांच्या राजरत्न या मुलाचे निधन झाले. १९२७ मध्ये त्यांचे बंधू बाळासाहेब आंबेडकर यांचे निधन झाले. त्यानंतर २६ मे १९३५ रोजी रमाई भीमराव आंबेडकर यांचे निधन झाले. १५ एप्रिल १९४८ रोजी बाबासाहेबांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. शारदा कबीर यांच्यासोबत नोंदणी पद्धतीने दुसरे लग्न केले.
०६. १५ ऑगस्ट १९४७ च्या पंडित नेहरूंच्या मंत्रीमंडळात ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री झाले. २१ ऑगस्ट १९४७ रोजी घटनेच्या मसुदा समितीची प्रमुख जबाबदारी डॉ. आंबेडकरांवर टाकली गेली. व ती त्यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यामुळेच त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे मानले जाते. ९ एप्रिल १९४८ रोजी त्यांनी ‘हिंदू कोड बिला’ची निर्मिती केली.
०७. त्यांनी ‘अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ची स्थापना केली. १९५२ च्या निवडणुकीत फेडरेशनने २२ जागांपैकी १३ जागा जिंकल्या. फेडरेशनला फार मोठ्या प्रमाणावर यश मिळाले नाही. दुर्दैवाने या निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव झाला. मात्र १९५२ सालीच त्यांची राज्यसभा सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
* शिक्षण
०१. इ.स. १९०७ साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरीत्या पार केली व जानेवारी १९०८ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलफिन्स्टन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
०२. जानेवारी १९०८ पासून गुरुवर्य केळुसकर आणि निर्णय सागर छापखान्याचे मालक दामोदर सावळाराम यंदे यांच्या प्रयत्नांनी कॉलेजच्या शिक्षणासाठी बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांचेकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना रु. २५/- दरमहा शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली होती.
०३. इ.स. १९१२ साली त्यांनी अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांमध्ये पदवी मिळवली. याच वर्षी त्यांचा मुलगा यशवंत याचा जन्म झाला. जानेवारी १९१३ मध्ये त्यांना बी.ए. पदवी (पर्शियन व इंग्रजी विषय) मिळाली. अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी मुंबई विद्यापीठाची बी.ए.ची पदवी संपादन करण्याचा मान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मिळवला.
०४. सयाजीराव महाराज बडोदा संस्थानच्या वतीने काही विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला पाठवण्याच्या विचारात होते. दि. ४ एप्रिल १९१३ रोजी बडोदा संस्थानच्या विद्याधिकाऱ्यानी परदेशात अभ्यास करण्यासाठी फक्त चार विद्यार्थी निवडले, यात भीमराव आंबेडकर एक होते.
०५. या प्रत्येकास दरमहा साडे अकरा पाऊंड शिष्यवृत्ती मंजूर केली. त्यासाठी त्यांना एक करार पत्र लिहून द्यावे लागले. या करारपत्रावर साक्षीदार म्हणून त्रिभुवन जे. व्यास आणि अंताजी गोपाळ जोशी यांनी दिनांक १८ एप्रिल १९१३ रोजी सह्या केल्या. या करारानुसार शिष्यवृत्तीची मुदत एकूण तीन वर्षांची होती.
०६. डॉ. आंबेडकर दिनांक २० जुलै १९१३ रोजी न्यूयॉर्क येथे पोहचले. डॉ. आंबेडकर प्रथमतः न्यूयॉर्क शहरातील कोलंबिया युनिव्हर्सिटीत गेले. राज्यशास्त्र शाखेमध्ये त्यांनी १९१३ ते १९१६ या तीन वर्षांसाठी प्रवेश मिळवला.
०७. न्यूयॉर्कमध्ये सुरुवातीस ते कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या हाईले हॉलमध्ये राहिले आणि नंतर रस्ता नं. ११४वरील कॉस्मोपॉलिटन क्लब, न्यूयॉर्क पश्चिम ५६४ इथे राहिले. कारण इथे काही भारतीय विद्यार्थी रहात होते. तसेच सातारा हायस्कूलमधील एक वर्गमित्रसुद्धा तिथेच होता
०८. डॉ. आंबेडकर यांनी विषयांचा सखोल अभ्यास करून कोलंबिया विद्यापीठला १५ मे १९१५ रोजी ‘अॅडमिनिस्ट्रेशन अँड फायनान्स ऑफ ईस्ट इंडिया कंपनी’ हा प्रबंध सादर केला. २ जून १९१५ रोजी या प्रबंधाच्या आधारावर त्यांना एम.ए.ची पदवी मिळाली. दरम्यानच्या काळात कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या ग्रंथालयात पंजाब केसरी लाला लजपतराय यांच्याशी ओळख झाली.
०९. प्राध्यापक एडविन सेलिग्मन जे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पी.एच्.डी. पदवीसाठीचे मार्गदर्शक होते त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गौरवपर उद्गार काढले, ते म्हणाले, “भीमराव आंबेडकर हिंदी विद्यार्थ्यांमध्येच केवळ श्रेष्ठ आहेत असं नाही, तर अमेरिकन विद्यार्थ्यांमध्येसुद्धा ते श्रेष्ठ आहेत.”
१०. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पीएच.डी.साठीचा विषय ‘भारताचा राष्ट्रीय लाभांश : इतिहासात्मक आणि विश्लेषणात्मक अध्ययन’ The National Divident of India : A Historical And Analytical Study. १९१३ ते १९१७ या कालावधित विद्याभ्यासाच्या परिश्रमाने लिहिलेला हा प्रबंध होता.
११. जगभरातील देशांना उपयोगी ठरणारा हा प्रबंध होता. प्रा. सेलिग्मनसारख्या जगप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाने या प्रबंधाचा गौरव केला. हा प्रबंध आठ वर्षांनी म्हणजे १९२५मध्ये ग्रंथरूपाने प्रसिद्ध झाला. आला. ग्रंथाचे नाव ‘ब्रिटिश भारतातील प्रांतिक अर्थव्यवस्थेची उत्क्रांती’ (Evolution of Provincial Finance in British India). हा ग्रंथ त्यांनी सयाजीराव गायकवाड यांना अर्पण केला.
१२. ९ मे १९१६ रोजी कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये समाजशास्त्र प्राध्यापक डॉ. ए. ए. गोल्डनवायझर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित झालेल्या मानववंशशास्त्र या विषयावर चर्चासत्रात आपला शोधलेख वाचण्याची संधी त्यांना मिळाली.
१३. त्यानुसार भारतातील जाती, त्यांची रचना, उत्पत्ती आणि वृद्धी Caste in India. Their Mechanism, Genesis And Development हा शोधनिबंध वाचून समाजशास्त्राच्या साऱ्याच विद्वानांचे लक्ष वेधले होते.
१४. The American Journal of Sociology या समाजशास्त्राच्या नियतकालिकामध्ये डॉ. आंबेडकरांच्या जातीवरील प्रबंधाचा निवडक भाग ‘या महिन्यातले जगातील उत्कृष्ट वाङ्मय’ World’s Best Literature Of The Month या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आला होता.
१५. एम.ए. केल्यानंतर इ.स.१९१७ लंडनहून एम.एस्सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून भारतात परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.
१६. १९१७ साली मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी बडोदा संस्थानाची नोकरी स्वीकारली. तथापि या नोकरीत त्यांना इतरांकडून अतिशय मानहानीची वागणूक मिळाली. महाराजांच्या निदर्शनास या गोष्टी आणून दिल्या तरी त्यात बदल न झाल्याने डॉ. आंबेडकरांनी ही नोकरी सोडली. त्यानंतर त्यांना नोव्हेंबर १९१८ सिडनहँम महाविद्यालयात राजकीय अर्थशास्ञ या विषयाचे प्राध्यापक पदावर रुजू.
१७. १९२० मध्ये डॉक्टर पुन्हा इंग्लंडला गेले. जून १९२१ मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना एम.एस्सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.मार्च १९२३ मध्ये लंडन विद्यापीठाने त्यांना रुपयाची समस्या हा प्रबंध मान्य करून डी.एस्सी.(अर्थशास्त्र) ही पदवी प्रदान केली. डी.एस्सी. ही पदवी प्राप्त करणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. १९२३ याचवर्षी त्यांना डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी आणि डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल करण्यात आली.
१८. १९२३ मध्ये जर्मनीच्या बॉर्न विद्यापीठातून बैरीस्टरच्या परीक्षेतही ते उत्तीर्ण झाले. १९२४ मध्ये मुंबईत परत आल्यानंतर त्यांनी हायकोर्टात काही काळ वकिली केली. त्यानंतर १९२७ मध्ये कोलंबिया विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली. १९२८ साली ते मुंबईच्या गवर्नमेंट लॉ कॉलेजात प्राध्यापक म्हणून रुजू झाले. पुढे १९३५ साली ते गवर्नमेंट लॉ कॉलेजचे प्राचार्यही बनले. १९३८ साली त्यांनी प्राचार्य पदाचा राजीनामा दिला.
* अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष
०१. १९१८ मध्ये बाबासाहेबांनी ‘गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट, १९१९’ बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली.
०२. ३१ जून १९२० रोजी त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. शाहू महाराजांनी यासाठी २५०० रुपयांची मदत केली. याचे संपादक देवराज नाईक होते. मूकनायकाच्या शिरोभागी संत तुकारामांची वचने होती. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली.
०३. २१ मार्च १९२० रोजी कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला.
०४. २१ मार्च १९२० रोजी माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्ग परिषद, ३० मे ते १ जून १९२० मध्ये झालेली नागपूर येथील अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद, २६ डिसेंबर १९२३ रोजी पारसी व्यक्ती रावबहादूर कुपर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेली मुंबई इलाखा अस्पृश्यता निवारण परिषद आणि १३ ते १६ फेब्रुवारी १९२२ मध्ये गणेश अक्काई गवई यांनी स्थापन केलेली शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे झालेली अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद यांना बाबासाहेबांनी हजेरी लावली.
०५. ९ मार्च १९२४ रोजी दामोदर ठाकरसी सभागृह परळ येथे दलित नेत्यांची सभा बोलविली. सभेतील ठरावानुसार २० जुलै १९२४ रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली. या सभेचे घोषवाक्य होते – “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा.” या संस्थेच्या वतीने वाचनालये प्रौढांसाठी रात्रीच्या शाळा सुरु केल्या. या संस्थेचे अध्यक्ष सर चिमणलाल हरीलाल सेटलवाड बनले. १९२५ मध्ये या सभेने सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरु केले.
०६. ४ ऑगस्ट १९२३ रोजी विधिमंडळात ब्राह्मणेतर नेते सी.के. बोले यांच्या प्रयत्नामुळे झालेल्या कायदेवजा ठरावानुसार महाडच्या म्युनिसिपालटीने सार्वजनिक पाणवठे, विद्यालये, धर्मशाळा इत्यादी ठिकाणी मुक्त संचारला मान्यता देणारा ठराव पास केला. तथापि अस्पृश्यांनी स्पृश्यांच्या भीतीने या तळ्यावर जाऊन पाणी भरण्याचे धाडस केले नव्हते. त्यामुळेच २० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेबांनी आपल्या बहुसंख्य अनुयायासह चवदार तळ्याचे पाणी प्राशन केले.
०७. पुढील काळात महाड नगरपालिकेने हा ठराव रद्द केला. तळ्याचे शुद्धीकरण केले गेले. त्यामुळेच डॉ. बाबासाहेबांनी २५ व २६ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे सत्याग्रह परिषद घेण्याचे ठरविले. या परिषदेतच हिंदू समाजाचा धर्मग्रंथ असलेल्या मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय घेतला गेला याबाबतचा ठराव बापूसाहेब सहस्रबुद्धे यांनी मांडला होता. २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.
०८. ३ एप्रिल १९२७ रोजी ‘बहिष्कृत भारत’ नावाचे पाक्षिक सुरू केले. या पाक्षिकाच्या शिरोभागी संत ज्ञानेश्वराची वचने होती. संपादकाची जबाबदारी त्यांनी स्वतःच स्वीकारली. सप्टेबर १९२७ मध्ये श्रीधरपंत टिळक यांच्या समवेत ‘समाज समता संघ’ स्थापन केला.
०९. ४ जून १९२९ रोजी जळगाव येथील १२ महारांनी मुस्लिम धर्माचा स्वीकार केला तेव्हा आंबेडकरांनी त्यांचे समर्थन केले. १९२९ साली दामोदर सभागृह येथे गिरणी कामगारांच्या सभेत डॉक्टरांचे भाषण झाले. १९२९ याच वर्षी मुंबई विधानमंडळात त्यांनी अस्पृश्यांसाठी ३३% आरक्षण देण्याबाबत भाषण केले होते. १९२९ साली टांग्यातून फेकले गेल्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली.
१०. १३ नोव्हेंबर १९२७ रोजी अमरावती येथील अंबादेवीच्या प्राचीन मंदिरात प्रवेश मिळवण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सत्यागृह सुरु झाला. १३ ऑक्टोबर १९२९ रोजी पुणे येथील पार्वती मंदिर सत्यागृह सुरु झाला. १९३३ साली संयुक्त समितीच्या कामासाठी आंबेडकर लंडनला गेले.
११. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मुक्कामी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाची घोषणा केली. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अंगात नवचैतन्य संचारले.
१२. २ मार्च १९३० ही सत्याग्रहाची तारीख निश्चित झाली. सत्याग्रही कमिटीचे अध्यक्ष म्हणून केशव नारायण वर्धेकर ऊर्फ बुवा यांची निवड केली होती. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सचिव होते, तर नाशिकचे शंकरराव गायकवाड हे सभासद म्हणून समाविष्ट झाले होते.
१३. शंकरराव गायकवाड ऊर्फ बेलमास्तर मूळचे निफाड तालुक्यातील, पण नाशिकला मोठा राजवाडा परिसरात स्थायिक झाले होते.रामकुंडात उडी घेऊन सत्याग्रह यशस्वी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. सत्याग्रहींचा जोश व दृढ निश्चय पाहून ब्रिटीश जिल्हाधिकारी गोर्डन यांनी रामकुंड व राममंदिर जनतेसाठी खुले करण्याचे आश्वासन दिले.
१४. १९२६ ते १९३६ पर्यंत आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य होते. १९२८ मध्ये बाँबे प्रेसिडेन्सी कमिटीवर आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी सायमन कमिशनाबरोबर काम केले. निवडणुकींमधील सुधारणांसाठी त्यांनी काही नवीन मुद्दे सुचवले. १९३०, १९३१ व १९३२ या तीनही वर्षात भारतातील अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून सरकारने बाबासाहेबांची निवड केली. १९४२ ते १९४६ पर्यंत त्यांची इंग्रजांच्या कार्यकारी मंडळावर मजूरमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. कोकणातील खोती पद्धत नष्ट करण्यासाठी मुंबई विधिमंडळात बाबासाहेबांनी बिल मांडले.
१५. पुणे करारानंतर महात्मा गांधींनी ‘हरिजन सेवक संघ’ ही अखिल भारतीय पातळीवरील संस्था स्थापन केली व त्या संस्थेचे सभासदत्व बाबासाहेबांनाही दिले होते. परंतु त्यांनी या संस्थेच्या सभासदत्वाचा राजीनामा दिला.
१६. १५ ऑगस्ट १९३६ रोजी डॉ. आंबेडकरानी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. १९३७ साली झालेल्या निवडणुकीत स्वतंत्र मजूर पक्षाने अस्पृश्यांसाठी राखीव असलेल्या १३ जागा जिंकल्या होत्या. डॉ. बाबासाहेबदेखील निवडून आले होते. जुलै १९५१ मध्ये ‘भारतीय बुद्ध जनसंघ’ या संस्थेची स्थापना केली तर २५ डिसेंबर १९५५ रोजी देहूरोड पुणे येथे बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना केली. १९३६ साली प्रकृती स्वास्थ्यासाठी ते युरोपला निघून गेले.
१७. १९२० साली आंबेडकरांनी ‘मूकनायक’ हे वृत्तपत्र सुरु केले. १९२७ मध्ये ‘बहिष्कृत भारत’ हे पाक्षिक सुरु केले.४ सप्टेंबर १९२८ रोजी समता संघातर्फे ‘समता’ हे पत्र सुरु केले. याशिवाय डॉ. आंबेडकरांनी २४ नोव्हेंबर १९३० रोजी ‘जनता’ व १९२८ मध्ये ‘प्रबुद्ध भारत’ ही वृत्तपत्रे चालविली. ही वृत्तपत्रे दीर्घकाळ चालली नाहीत.
१८. १८ व १९ जुलै १९४२ रोजी नागपूर येथे ‘ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस पॉलीटिकल कॉन्फरन्स, मद्रास’चे आमदार रावबहादूर एन. शिवराज यांच्या अध्यक्षतेखाली एक परिषद आयोजित करण्यात आली होती. याच परिषदेत ‘ऑल इंडिया शेड्युल्ड कास्ट फेडरेशन’ची स्थापना करण्यात आली. १९४२ ते १९५२ पर्यंत याचे अध्यक्ष एन. शिवराज हे होते. तर जनक व सूत्रधार डॉ. आंबेडकर होते. यामागील प्रेरणा अण्णा दुराई यांची होती.
१९. १९३८ साली पंढरपूर मातंग परिषदेकडून त्यांना मानपत्र प्रदान करण्यात आले. त्याच वर्षी मनमाड येथील रेल्वे अस्पृश्य कामगार परिषदेला उपस्थिती लावली आणि औरंगाबाद येथील अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. १९३८ साली त्यांनी औद्योगिक काळाचे विधेयक मुंबई विधिमंडळात मांडले. १९ जुलै १९४२ रोजी नागपूर येथील भारतीय दलित वर्ग परिषदेला हजेरी लावली. १९४० साली मुंबई येथे सुभाष चंद्र बोस यांच्यासमवेत मुलाखत झाली.
* पुणे करार
०१. १९३२ साली राव बहाद्दूर राजा यांनी दोन उजव्या विचारसरणीच्या काँग्रेस नेते बी. एस. मुंजे व जाधव यांबरोबर एक करार केला. या करारानुसार मुंज्यांनी राजांना पाठिंब्याच्या बदल्यात काही आरक्षित जागा अनुसूचित जातीमधील लोकांना देण्याचे ठरविले. या घटनेमुळे आंबेडकरांनी संपूर्ण भारतात दलितांसाठी विभक्त मतदारसंघांची मागणी केली.
०२. आंबेडकरांचे महत्त्व आणि दलितांमधील जनाधार वाढला आणि त्यांना १९३० मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेत अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून बोलविण्यात आले त्यात त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली. १९३१ साली लंडन येथील दुसऱ्या गोलमेज परिषदेचेही निमंत्रण आले. या परिषदेत त्यांचे गांधीजींबरोबर विभक्त दलित मतदारसंघावरून मतभेद झाले. गांधीजींना धार्मिक वा जातीय आधारावर विभक्त मतदारसंघ मान्य नव्हते, त्यांना यामुळे भविष्यात हिंदू समाज दुभंगण्याची भीती वाटत होती. २६ नोव्हेंबर १९१३ रोजी गांधी, आंबेडकर व पंचम जॉर्ज यांची भेट झाली.
०३. १९३२ साली तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान रैम्से मैकडोनाल्ड याने जातीय निवाडा मान्य करून जेव्हा आंबेडकरांची मागणी मान्य केली, तेव्हा गांधीजींनी येरवडा तुरुंगात उपोषण सुरू केले. सनातनी हिंदू समाजाला अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यास सांगून हिंदूंमध्ये राजकीय आणि सामाजिक एकी आणण्याचे आव्हान केले.
०४. गांधीजींच्या उपोषणाला लोकांकडून मोठा पाठिंबा मिळाला आणि हिंदू नेत्यांनी आंबेडकरांबरोबर येरवडा येथे बैठका घेतल्या. गांधीजींच्या मृत्यूनंतर दलित समाजाविरुद्ध दंगली होऊन विनाकारण त्रास होईल असे वाटून आंबेडकरांनी स्वतंत्र मतदारसंघाऐवजी आरक्षित मतदारसंघांसाठी मान्यता दिली. यातून ‘पुणे करार’ झाला.
०५. यामुळे स्वतंत्र मतदारसंघ मिळाले नसले, तरी दलितांना जास्त जागा मिळाल्या. दलितांच्या राजकीय अधिकारांना बगल देण्यासाठी गांधीजींनी खेळलेली राजकीय चाल असे आंबेडकरांनी या उपोषणाचे नंतर वर्णन केले. पुणे कराराचा मसुदा तयार झाला. त्यावर सह्या करण्यात आल्या.
०६. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबानी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवीय यांनी सही केली. इतर सर्व सभासदांनीही सह्या केल्या. अन तिकडे तुरुंगांतही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यांनी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.
०७. पुणे करारानुसार आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदार संघाऐवजी संयुक्त मतदार संघाचा स्वीकार केला. हरिजनांसाठी १४८ जागा राखीव ठेवण्यात आल्या (केंद्रात १८%). हरिजन हिंदू धर्माचा अविभाज्य भाग असल्याचे आंबेडकरांनी मान्य केले, आणि अस्पृश्यांसाठी प्रयत्न करण्याचे गांधीजींनी मान्य केले.
०८. तथापि, गांधीजीबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असताना केवळ त्यांचे प्राण वाचविण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली. आणि पुणे ‘करारा’ वर सही केली.
०९. ‘पुणे करारा’वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे व अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबडकरांनी ‘पुणे करारा’ वर सही केली तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा कॉग्रेसने मात्र आंबेडकरांशी दाखवला नाही.
१०. २६ सप्टे १९३२ रोजी ब्रिटिश मंत्रिमंडळाने पुणे करार मंजूर करून घेतला. त्यावर मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले.
* आंबेडकरांचे शैक्षणिक विचार
०१. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणाऱ्यांनी ध्यानी घ्यावे.
०२. आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापन १९४६ साली करुन त्यांनी २० जून १९४६ रोजी मुंबईला सिद्धार्थ कॉलेज व १९ जून १९५० रोजी औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरू केले. राष्ट्रहित व समाजहिताचे भान ठेवणारेच खरे शिक्षण होय असे ते मानीत.
* धर्मांतर
०१. “मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.” ही घोषणा १३ ऑक्टोबर १९३५ रोजी बाबासाहेबांनी यावल येथे केली.
०२. धर्मांतरापूर्वी म्हणूनच मुंबईत १९४५ मध्ये स्थापन केलेल्या महाविद्यालयास त्यांनी सिद्धार्थ, तर औरंगाबादेत १९५० मध्ये काढलेल्या महाविद्यालयास मिलिंद आणि परिसरास नागसेनवन अशी नावे दिली. मुंबईतील दादर येथील आपल्या निवासस्थानालाही त्यांनी ‘राजगृह’ असे नाव दिले. १९५४ साली रंगून येथे भरलेल्या ‘जागतिक बौद्ध धम्म’ परिषदेसही बाबासाहेब हजर होते.
०३. बाबासाहेबांना अखेर बुद्धाचा जीवनमार्ग लोककल्याण, सदाचार, समता, स्वातंत्र्य, बंधुतेचा वाटला म्हणून त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे पत्नी डॉ. सविता कबीर (शारदा) आणि आपल्या अनुयायांसह महास्थीवीर चंद्रमणी यांच्या हस्ते बौद्ध धम्म स्वीकारला. नागपूर येथे नागवंशाचे लोक होते आणि १९५६ साली गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाण दिनास २५०० वर्ष पूर्ण झाले होते. म्हणून धर्मांतरासाठी बाबासाहेबांनी हे वर्ष व ठिकाण निवडले.
* सन्मान
०१. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातील विधी विद्यालयात अध्यासन स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय भारत सरकारच्या सहाय्याने शिष्यवृत्तीही जाहिर करण्यात आली आहे. डॉ. आंबेडकर हे या विद्यापीठाचे माजी विद्यार्थी होते.
०२. डॉ. आंबेडकरांच्या थोर सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सत्कार केला. पुढे १९९५ मध्ये बुद्धिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड किंगडमतर्फे लेहमन ग्रंथालयाला आंबेडकरांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला.
०३. या अतुलनीय कार्याची पावती कोलंबिया युनिव्हर्सिटीने घेऊन आपल्या द्विशतकसांवत्सरिक उत्सवाप्रसंगी डॉ. आंबेडकरांना ‘एल.एल.डी.- डॉक्टर ऑफ लॉज्’ ही बहुमानाची उपाधी देण्याचं जाहीर केले. कोलंबिया विद्यापीठात दिनांक ५ जून १९५२ रोजी पदवीदान समारंभ झाला.
०४. १९५३ साली उस्मानिया विद्यापीठाने आंबेडकराना एल.आय.डी. पदवी देऊन सम्मानित केले.
०५. ‘भारतीय घटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक, एक महान सुधारक आणि मानवी हक्काचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष’ असं कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे.
०६. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.
०७. १९५८ साली औरंगाबाद येथे मराठवाडा विद्यापीठ स्थापन करण्यात आले. १४ जानेवारी १९९४ रोजी या विद्यापीठाला डॉ. आंबेडकरांचे नाव देण्यात आले.
* वर्णन
०१. “आंबेडकरांत तुम्हाला तुमचा उद्धारकर्ता लाभला आहे.” – शाहू
०२. “महाराष्ट्राचे तेजस्वी ज्ञानयोगी” – आचार्य अत्रे
०३. “आंबेडकरांच्या तोंडून बाहेर पडणारे शब्द म्हणजे पिस्तुलातून बाहेर पडणारे बार होते” – बेव्हरल निकोलस
०४. “आंबेडकर हे हिंदू समाजातील दमणशील प्रवृत्तीच्या विरोधातील बंडखोरांचे प्रतीक होय” – पंडित नेहरू
* प्रसिद्ध वाक्ये
०१. “भाकरीपेक्षा इज्जत प्यारी”
०२. “जर माझ्या मनात द्वेष असता, तर मी या देशाचे पाच वर्षात वाटोळे केले असते.”
०३. “मला जर देश आणि माझा विचार करायचा असेल तर मी प्रथम देशाचा विचार करीन”
०४. “देशकार्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढले पाहिजे.”
०५. “गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो आपोआप बंड करून उठेल.”
०६. “आम्हाला भीक नको, झगडून हक्क हवेत.”
०७. “प्रोटेस्ट हिंदू म्हणा, नॉन-कन्फ़र्मिस्ट हिंदू म्हणा पण नुसते हिंदू म्हणू नका.”
* छंद
०१. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना चित्रकलेत विशेष रुची होती. चित्रे पाहायला त्यांना आवडत आणि आपल्यालाही सुंदर सुंदर चित्रे निर्माण करता यावीत, असे त्यांना मनापासून वाटे.
०२. बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. चित्रकलेचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके विकत घेतली होती. चित्रे काढण्यात आणि रंगविण्यात ते तल्लीन होऊन जात असत.
०३. “पेंटिंग अॅज अ पास्ट टाइम’ या चर्चिलच्या पुस्तकाने त्यांना आवड निर्माण केली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समग्र आयुष्य हे अंतहीन महायुद्धासारखे होते. बाबासाहेब व्हायोलिन ही वाजवत असत. त्यांच्या प्रिंटींग प्रेसचे नाव “भारत भूषण” आहे.
* बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तके
01. Castes in India: Their Mechanism,
02. Genesis and Development and 11 Other Essays,
03. Philosophy of Hinduism,
04. India and the Pre-requisites of Communism,
05. Revolution and Counter-revolution,
06. Buddha or Karl Marx,
07. Riddles in Hinduism,
08. Essays on Untouchables and Untouchability,
09. The Evolution of Provincial Finance in British India
10. Who Were the Shudras?, (1946)
11. The Untouchables : Who Were They And Why They Became Untouchables ?,
12. The Annihilation of Caste (1936),
13. Pakistan or the Partition of India,
14. What Congress and Gandhi have done to the Untouchables (1945)
15. Mr. Gandhi and the Emancipation of the Untouchables,
16. The Buddha and his Dhamma,
17. Ancient Indian Commerce,
18. Waiting for a Visa,
19. The Pali Grammar,
20. Ambedkar and his Egalitarian Revolution.
21. Thoughts On Pakistan (1940)
22. Gandhi, Ranade And Jinah
23. Federation Vs. Freedom
24. States And Minorities