लहूजी साळवे
जन्म : १४ नोव्हेंबर १७९४ (पेठ, पुरंदर गड, पुणे)
मृत्यू : १७ फेब्रुवारी १८८१ (संगमपूर, पुणे)जीवनकार्य
०१. लहूजी साळवे यांना आद्यक्रांतिवीर, क्रांतीगुरू, वस्ताद साळवे, लहूजीबुवा मांग असेही संबोधले जाते. ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके आणि लोकमान्य टिळक यांचे गुरु होत.
०२. लहुजींचे साळवे हे मातंग घराणे पुण्याजवळच्या पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या पेठ या गावचे होते. शिवाजी महाराजांनी या घराण्याला ‘राउत’ या पदवीने गौरविले होते. लहुजींच्या वडिलांचे नाव राघोजी साळवे (राऊत) व आईचे नाव विठाबाई होते. लहुजींचे वडील राघोजी पेशव्यांच्या शिकारखान्याच्या प्रमुखपदी होते.
०३. खडकी येथे ५ नोव्हेंबर १८१७ ला पेशव्यांचे इंग्रजांसोबत भयानक युद्ध झाले. १२ दिवस राघोजी व सळसळत्या तरुण रक्ताच्या २३ वर्षे वयाच्या लहुजी साळवेंनी आपल्या मावळ्यांना सोबत घेऊन इंग्रजांविरुद्ध प्रखर लढा दिला. राघोजी साळवे या स्वातंत्र्य संग्रामात इंग्रजांच्या हातून लहुजींच्या समोर शहीद झाले. पेशव्यांचा पराभव झाला. १७ नोव्हेंबर १८१७ रोजी पुणे ब्रिटीशांच्या तावडीत गेले.
०४. हिंदवी स्वराज्याचे निशाण शनिवारवाड्यावरून हटवून इंग्रजांचा युनियन जॅक फडकला. आणि तेथेच लहुजींनी इंग्रजांना भारतातून हाकलून लावण्याची शपथ घेतली. लहुजींनी १७ नोव्हेंबर १८१७ ला आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पण करीत ‘मरेन तर देशासाठी आणि जगेन तर देशासाठी’ अशी क्रांतिकारी प्रतिज्ञा करून आपल्या वडिलांची समाधी (थडगे) उभारली. ही समाधी अजूनही ‘वाकडेवाडी’ येथे आहे.
०५. त्यांनी तरुणांना तलवार, दांडपट्टा चालविण्याचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या मते जर लोक युद्धकलेत प्रशिक्षित झाले तरच इंग्रजांना येथून हाकलून लावण्यात येऊ शकते. त्यासाठी पुण्यातील गंजपेठेत १८२२ साली आखाडा सुरु करण्यात आला. त्यांच्या आखाड्याचे उद्घाटन पेशव्यांचे एक सरदार रास्ते यांनी केले होते.
०६. त्यामुळेच ते ‘लहूजी वस्ताद’ म्हणून ओळखले जात होते. आखाड्याजवळच त्यांनी एक विहीर खोदली आणि आपल्या सर्व अस्पृश्य बांधवांना ती खुली केली. ही एक मोठी समाजक्रांतीच होती. लहुजींचे काम पाहून जोतीबा फुले अत्यंत प्रभावित झाले होते. १८४७ पासून जोतीबा लहुजींच्या आखाड्यात जाऊ लागले. महात्मा फुले लहुजींना गुरुस्थानी मानत असत.
०७. १८४८ हे वर्ष अत्यंत क्रांतीकारी मानले जाते. ‘कम्युनिस्ट मैनीफ़ैस्टो’ याचवर्षी जाहीर झाला. तसेच फुले आणि त्यांच्या पत्नी यांनी भारतात स्त्रीशिक्षण व अस्पृश्य उद्धार यांची मुहूर्तमेढ रोवली. त्यावेळी दांपत्यांचा जीवही धोक्यात आला. अशा प्रसंगी लहुजींनी आपल्या आखाड्यातील चार-पाच मातंग सैनिकांना फुलेंच्या रक्षणासाठी तैनात केले. १८४८ साली लहुजींच्या तालमीतच सावित्रीबाई फुले यांची मुलींची शाळा भरत असे.
०८. लहुजींचा आखाडा म्हणजे एक क्रांतीकारी विद्यापीठ होते. १८५७ च्या उठावात त्यांच्या शिष्यांनी मोठीच कामगिरी बजावली होती. महात्मा फुले यांचे गुरु म्हणून त्यांनी क्रांतीचे रणशिंग फुंकले होते. असे हे ‘सशस्त्र क्रांतीचे पहिले गुरु’ आजन्म अविवाहित राहिले.
०९. महात्मा फुले यांनी अस्पृश्यांनाही शाळेत प्रवेश देण्यास सुरुवात केले हे लक्षात येताच लहुजींनी मातंग वस्तीमध्ये जाऊन तेथील मुलांना फुलेंच्या शाळेत पाठविण्यासही प्रयत्न सुरु केले. अस्पृश्य समाजासाठी शैक्षणिक कार्य केल्याबद्दल शिक्षण खात्याने १६ नोव्हेंबर १८५२ रोजी फुलेंचा सत्कार केला, त्या समारंभास लहूजी वस्ताद जातीने हजर होते.
१०. १० सप्टेंबर १८५३ रोजी ‘द सोसायटी फॉर प्रोमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार, मांग इटीसी.’ या संस्थेची स्थापना झाली. त्यामागे लहुजींचे सुद्धा प्रयत्न होते. फुले यांच्या शाळेतील अस्पृश्य मातंग समाजातील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे ही लहुजींचे थोरले भाऊ शिवजी साळवे यांची मुलगी होती. तिने अस्पृश्यांच्या पिळवणूकीविरुद्ध लिहिलेला एक निबंध अजरामर ठरला. त्याचे इंग्रजीत भाषांतर करून तो निबंध इंग्लंडच्या राणीकडे सुद्धा पाठविण्यात आला.
११. १८५१ साली फुलेंनी अस्पृश्यांसाठी सुरु केलेल्या शाळेतील दोन अस्पृश्य शिक्षक लहुजींचेच शिष्य होते. त्यापैकी एक बाराखडी शिकविणारे चांभार शिक्षक धुराजी अप्पाजी होते तर दुसरे पाढे पाठ करून घेणारे मांग शिक्षक गणू शिवजी होते. लहूजी स्वतः निरक्षर असले तरी अस्पृश्यांच्या वस्तीत फिरून, तेथील मुलांना शाळेत पाठवून देण्याचा आग्रह करीत असत , या कामात राणोजी महार त्यांना साथ देत होता.
१२. इंग्रज-रामोशी यांच्या बंडात लहुजींनी किंगमेकर च्या भूमिकेत १८२६ मध्ये उमाजी नाईक यास राजा म्हणून घोषित केले. १८५७ च्या उठावात भाग घेण्यासाठी लहुजींनी आपले बहाद्दर शिष्य पाठवले होते. त्याचप्रमाणे शास्त्रांची मदतही पाठवली होती. म्हणून लहुजींना ‘सशस्त्र क्रांतीचे आद्य प्रवर्तक’ असे म्हटले जाते.
१३. साताऱ्याचे छत्रपती प्रतापसिंह यांना १८३९ मध्ये ब्रिटीश सरकारने पदच्युत केले. यांचा वचपा काढण्यासाठी नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांनी उत्तरेत तर रंगोबापू यांनी लहूजींच्या मदतीने साताऱ्यात ब्रिटीशांविरुध्द बंड करण्याचे ठरविले. १२ जून १८५७ ही तारीखही बंडासाठी निश्चित करण्यात आली. मात्र हा कट उधळला गेला. लहूजींचे ३०-३५ क्रांतिकारक ब्रिटीशांनी पकडले. उरलेल्या सैनिकांनी चिडून पुरंदरच्या मामलेदाराला ठार मारले. यामुळे ४ ऑगस्ट १८५७ रोजी कनय्या मांग, धर्मा मांग यांना तोफेच्या तोंडी देण्यात आले. हे दोघेही लहूजींचे सैनिक होते. तसेच बाकीच्या साथीदारांना फाशी देण्यात आली.
१४. ब्रिटीशांना या सर्व बंडकारांना लहूजींकडूनच प्रशिक्षण मिळत असावे असा संशय आल्याने लहूजींनी पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी पुणे सोडले. लहूजी बैराग्याच्या वेशात, तर त्यांचे सैनिक पोतराज, फकीर, ज्योतिषी बनले. व पोलिस चौकीसमोर बसून हालहवाल देऊ लागले. पुण्याबाहेर पडल्यानंतर लहूजींनी कृष्णाखोरे, वारणा खोरे, पालीचा डोंगर , सातारा, पन्हाळा या दुर्गम भागात प्रशिक्षण केंद्रे उभारली. लहूजींना फिरंग्याची राजवट उलटून टाकलेली पाहायचे होते.
१५. वासुदेव बळवंत फडके यांच्या १८८० च्या बंडात त्यांना लहुजींची महत्वपूर्ण साथ मिळाली. लहुजींनीच रामोशी टोळ्यांची आणि वासुदेव बळवंत फडके यांची गाठ घालून दिली. फडके यांनी लहुजींच्या आखाड्याची एक शाखा सदाशिव पेठेतील ब्राह्मण वस्तीत सुरु केली. पुण्यातील नरसोबा देवळाच्या आवारात चालणाऱ्या तलवार – दांडपट्ट्याच्या आखाड्यात टिळकही आपल्या विद्यार्थी दशेत जात. या सर्व ठिकाणी लहुजीच मार्गदर्शन करीत असत.
१६. लहुजींच्या प्रशिक्षण केंद्रात सर्वच समाजांतील युवक तालीम घेण्यासाठी येऊ होते. यात प्रामुख्याने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, चापेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतिवीर नाना दरबारे, रावबहाद्दूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतिवीर मोरो विठ्ठल बाळवेकर, क्रांतिवीर नाना छत्रे, उमाजी नाईक, फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे हेदेखील लहुजी साळवे यांच्या आखाड्यात शिकले.