वासुदेव बळवंत फडके
जन्म: ४ नोव्हेंबर १८४५ (शिरढोण, पनवेल तालुका, रायगड जिल्हा)
मृत्यू: फेब्रुवारी १७, १८८३ (एडन तुरुंग, येमेन)
०१. वासुदेव बळवंत फडकेना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
०२. फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांना सुभेदार फडके असे म्हटले जात असे. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.
०४. फडके सुरुवातीला रेल्वे विभागात नोकरीस होते. नंतर ते इंग्रजांच्या लष्करी विभागात कारकून पदावर नियुक्त झाले. आपल्या अंथरुणाला खिळलेल्या मरणासन्न आईला भेटण्यासाठी फडक्यांनी रजा मागितली असता त्यांच्या इंग्रज अधिकाऱ्याने टाळाटाळ केली. फडके रजा मिळून घरी जाईपर्यंत त्यांच्या आईचा स्वर्गवास झालेला होता. संतप्त झालेल्या फडक्यांनी आपली सरकारी नोकरी सोडून दिली व त्यानंतर ब्रिटिश सरकारच्या धोरणांविरुद्ध जाहीर भाषणे देण्यास सुरुवात केली.
०५. फडके यांच्यावर न्यायमूर्ती रानडे व ग.वा. जोशी (सार्वजनिक काका) यांचा प्रभाव होता. १८७३ साली फडकेंनी स्वदेशी वस्तूच्या वापराची प्रतिज्ञा घेतली. समाजात समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी ‘ऐक्यवर्धिनी’ ही संस्था स्थापन केली.१८७४ साली ‘पुना नेटिव्ह इन्स्टीट्युशन’ ही शाळा सुरु करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला. फडके हे दत्तउपासक होते. त्यांनी ‘दत्तमहात्म्य’ हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.
०६. १८७०च्या दशकातील पडलेल्या दुष्काळाकडे सरकारचे दुर्लक्ष पाहून त्यांनी स्वतः दुष्काळग्रस्त भागात जाउन तेथील लोकांना मदत केली व त्याच वेळी सरकार उलथवून देण्याची भाषा करण्यास सुरुवात केली. १८७६ या वर्षी महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. या दुष्काळातही ब्रिटिशांनी जनतेवर करांचे ओझे लादले. या दुष्काळात एकट्या सोलापुरात १०० लोकांचा मृत्यू झाला.
०७. यानंतर त्यानी सरकारविरुद्ध सशस्त्र उठाव करण्याची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्यांनी पुणे, मुंबई व इतर शहरातील सुशिक्षित व धनाढ्य भारतीयांकडे मदतीची मागणी केली परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. फडके अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आशीर्वाद मागण्यासाठी गेले पण त्यांनी ही वेळ नाही. असे सांगून त्यांना निराश केले.
०८. फडक्यांनी मग महाराष्ट्रातील तथाकथित मागासलेल्या जातींमध्ये मदत शोधली. रामोशी, धनगर, कोळी आणि इतर अनेक समाजातून त्यांनी तरुण घेतले व त्यांना शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन आपल्या ‘सैन्यात’ भरती केले. फडकेंनी मुस्लिमांचीही साथ घेतली. दौलती रामोशी नाईक व भवानी रामोशी नाईक हे त्यांचे प्रमुख सोबती होते.
०९. फडकेंनी पहिला दरोडा दौलतराव नाईक याच्या मदतीने ‘धामरी’ गावावर टाकला. दरोड्यात त्यांना फक्त ३००० रुपये मिळाले. त्यावेळी मुंबईचा गवर्नर रिचर्ड टेम्पल होता. त्याने फडकेंना पकडण्याची जबाबदारी मेजर डैनियल या अधिकाऱ्यावर सोपविली. मे १८७९ मध्ये फडकेंनी जाहीरनामा काढला कि, “युरोपियनांची सापडेल तेथे कत्तल करू व १८५७ च्या बंडासारखे दुसरे बंड उभारू.”
१०. अशा काहीशे सैनिकांसह त्यांनी इंग्रज सरकारविरुद्ध अधिकृतरीत्या युद्धाची घोषणा केली. शिरुर आणि खेड तालुक्यातील सरकारी खजिन्यावर धाड टाकून फडक्यांच्या सैन्याने आपला चरितार्थ चालवला. त्यानंतर त्यांनी थेट पुण्यावर चाल केली आणि काही दिवसांकरता शहरावर कब्जा मिळवला. एकाच वेळी अनेक ठिकाणी हल्ला चढवून इंग्रज सरकारचे लक्ष विकेंद्रित करण्याच्या त्यांच्या चालीला यश मिळाले नाही आणि इंग्रज सरकारने भारतातील हा पहिला सशस्त्र उठाव चिरडण्याचा चंग बांधला.
११. फडक्यांनी सात जिल्ह्यांत धुमाकूळ घातला होता. घानूर गावाजवळ झालेल्या हातोहातच्या लढाईनंतर भारतीयांत फितुरी लावण्यासाठी सरकारने फडक्यांना पकडून देण्याबद्दल ५००० रुपये इनाम जाहीर केले. याला प्रत्युत्तर म्हणून फडक्यांनी मुंबईच्या गव्हर्नरलचे डोके कापून देणाऱ्यास त्याहून मोठे १०००० रुपये इनाम जाहीर केले. यानंतर फडक्यांनी रायगड, श्रीशैल्य, गाणगापूर, विजापूर असा प्रवास सुरु केला.
१२. इंग्रजांचा ससेमिरा चुकविण्यासाठी फडके पुण्यास येणार होते. परंतु ते येण्याअगोदरच पुण्यातील विश्रामबाग वाडा व बुधवार पेठ येथे आगी लावण्यात आल्या. या आगीत ब्रिटिशांचे प्रचंड नुकसान झाले. ब्रिटिशांनी या आगीचा संशय न्यायमूर्ती रानडे यांच्यावर घेतला. कारण रानडेंनी वृत्तपत्रातून फडकेंचे जाहीर समर्थन केले होते. म्हणून ब्रिटिशांनी रानडेंची बदली पुण्यावरून धुळे येथे केली. प्रत्यक्षात ही आग कृष्णाजी रानडे व त्यांच्या मुलाने लावली होती. ही बाब कळताच तब्बल १ वर्षाने रानडेंची परत पुणे येथे बदली करण्यात आली.
१३. या लढाईनंतर फडके अरब व रोहिल्यांकडून मदत मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात गेले. तेथील निजामाच्या सेवेत असलेल्या अब्दुल हक आणि मेजर हेन्री विल्यम डॅनियेल या अधिकाऱ्यांनी फडक्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यांना परत महाराष्ट्रात पळून येण्यास भाग पाडले.
१५. २३ जुलै १८७९ रोजी पंढरपूरकडे जात असताना विजापूर जवळ देऊळ नावडगी या गावाबाहेरीलएका बौद्ध विहारात फडके बेशुद्ध अवस्थेत असताना डॅनियलने त्यांना पकडले व पुण्याच्या तुरुंगात ठेवले. तेथे त्याच्यावर २२ ऑक्टोबर १८७९ पासून न्यायाधीश आल्फ्रेड केसर यांच्यासमोर खटला चालवण्यात आला. न्यायाधीशांनी इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारण्याचा कट केल्याचा आरोप फडकेंवर ठेवला.
१९. “भाकरीसाठी चाकरी करणार नाही”, “शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशातून जाणार नाहीत”, जनतेला राष्ट्रीय शिक्षणातून व वृत्तपत्रांच्या तर्खडबाजीतून जागृत करण्यापेक्षा सशस्त्र क्रांतीचा लढा समजावून सांगण्याची गरज आहे.” हे फडकेंचे प्रसिद्ध वाक्य व विचार होते.
२०. नोव्हेंबर १८७९ च्या लेखात बंगालच्या अमृतबझार या वृत्तपत्राने फडकेंचे वर्णन ‘देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष’ असा केला.
२१. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ कादंबरीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्धचे फडक्यांचे अनेक कारनामे वापरले आहेत. यावर सरकारने आक्षेप घेउन कादंबरी प्रकाशित न होऊ दिल्यामुळे चट्टोपाध्यायनी पाचवेळा बदल केल्यावर मगच त्याचे प्रकाशन झाले.
२२. पुण्यात चाललेल्या खटल्यादरम्यान फडक्यांना संगमपुलाजवळ एका कोठडीत ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर तेथे महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर खात्याने त्यांचे स्मारक उभारले आहे. १९८४ साली भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले ५० पैशांचे तिकीट प्रकाशित केले. मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळच्या चौकाला वासुदेव बळवंत फडक्यांचे नाव दिलेले आहे.
२३. वासुदेव बळवंत फडके यांचे चित्र भारताच्या संसदेमध्ये ३ डिसेंबर, २००४ रोजी लावण्यात आले. हे संसदेत लावण्यात येणारे शेवटचे व्यक्तिचित्र असेल असे ठरविण्यात आले. पी.व्ही. आपट्यांच्या प्रयत्नाने हे चित्र लावण्याची संमती मिळाले. हे तैलचित्र सुहास बहुलकर यांनी रंगवले आहे.
२४. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नावाचा विश्राम बेडेकर दिग्दर्शित चित्रपट १९५० साली प्रदर्शित झाला. वासुदेव बळवंत फडके नावाचा मराठी चित्रपट डिसेंबर २००७मध्ये प्रदर्शित झाला.