भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग १

भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास – भाग १

भारतातील मुद्रणकलेचा विकास
०१. भारतामध्ये मुद्रण तंत्र प्रथम १५५६ मध्ये माहीत झाले. पोर्तुगीज लोकांनी गोव्यात एक मुद्रणालय सुरू केले. ते सुरू करण्याचा मुख्य उद्देश येथील लोकांचे धर्मातर करून धर्मप्रसार करण्याचा होता.

०२. १५५७ मध्ये या मुद्रणालयामध्ये जे. बूस्तामांते यांनी सेंट झेव्हिअर यांचे Doutrina Christa हे पहिले पुस्तक छापले. पण त्याची भाषा व लिपी मात्र परकी होती. मुद्रण तंत्राचा प्रसार मात्र तेथून भारताच्या इतर भागांमध्ये कोचीन, पुडीकाईल, अंबलक्कडू, त्रांकेबार वगैरे किनाऱ्यावरील गावी झाला. 

०३. अंबलक्कडू येथे ‘मलबार टाइप’ या नावाने प्रथम जे. गॉनसॅल्‌व्हिस यांनी १५५७ मध्ये खिळे तयार केले. त्यानंतर इग्नेशियस ऐशामोनी यांनी तमिळ लिपीतील खिळे प्रथम लाकडी साचे कोरून तयार केले. त्यांच्यापासून जे खिळे तयार केले, त्यांचा उपयोग तमिळ-पोर्तुगीज भाषांचा शब्दकोश तयार करण्यासाठी केला गेला. 

०४. सतराव्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षाच्या काळापासून पुढे पोर्तुगीज लोकांनी मुद्रण तंत्राविषयी फारसे काही केले नाही आणि त्यात प्रगतीही केली नाही. 

०५. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला डॅनिश धर्मप्रसारकांनी मुद्रणामध्ये पुन्हा काही नवीन गोष्टी करायला सुरुवात केली. बार्थालोमस झिगेनबाल्ग यांनी त्रांकेबार येथे Bibli Danulica हे पुस्तक छापून प्रसिद्ध केले. हे पुस्तक म्हणजे बायबलच्या ‘नव्या करारा’चे तमिळ भाषेमध्ये केलेले भाषांतर होते. 

०६. पूर्व जर्मनीमधील हाल येथे तयार केलेले तमिळ खिळे झिगेनबाल्ग यांनी मिळविले व त्या खिळ्यांनी वरील पुस्तक छापले. नंतर त्रांकेबार येथे मलबारी व तमिळ खिळे तयार करायला सुरुवात केली. त्यानंतर बऱ्याच काळापर्यत मुद्रणाचा व्यवसाय फारसा चालत नव्हता. 

०७. अठराव्या शतकाच्या अखेरच्या काळात मात्र कलकत्ता, मद्रास व मुंबई या सर्व शहरात एकाच वेळी मुद्रणाचे तंत्र इंग्रज लोकांनी सुरु करून त्यात प्रगती करायला सुरुवात केली. 

०८. १७७८ हे वर्ष भारतातील मुद्रण व्यवसायाच्या दृष्टीने ऐतिहासिक महत्त्वाचे आहे. या वर्षी ए ग्रामर ऑफ द बेंगॉली लँग्वेज हे पुस्तक कलकत्त्याजवळील हुगळी येथे अँड्रूज यांच्या छापखान्यात छापले गेले. त्याचे लेखक एन्‌. बी. हॉलहेड हे होते. 

०९. या पुस्तकांचे वैशिष्ट्य असे की, त्यासाठी लागणारे अक्षरांचे सर्व खिळे स्थानिकपणे सर चार्लस विल्किन्झ यांनी तयार केले होते. त्यातही दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हे खिळे तयार करण्यासाठी एक भारतीय कारागीर शिक्षण देऊन तयार केला होता. त्यांचे नाव पंचानन कर्मकार असे होते. त्यांनी पुढे खिळे तयार करण्याची कला इतर भारतीय तंत्रज्ञांना शिकविली. 

१०. नंतर चार्लस विल्किन्झ यांच्यावर कलकत्ता येथील नवीन सरकारी छापखाना सुरू करण्याची जबाबदारी टाकण्यात आली. त्यांनीच नंतर देवनागरी व पर्शियन लिप्यांचे खिळे तयार केले.

११. मुंबई शहरातील मुद्रण प्रथम इंग्लंडमधून तयार करून आणलेल्या खिळ्यांच्या साह्याने केले जात होते. मद्रास प्रांतांमध्येही मुद्रण तंत्राने भक्कम पाया रोवला. तेथे तमिळ-इंग्रजी शब्दकोश १७७९ मध्ये व्हेपेरी येथे छापून प्रसिद्ध झाला. 


१२. अठराव्या शतकाच्या शेवटी मुंबई, मद्रास व कलकत्ता या तिन्ही मोठ्या शहरांमध्ये आणखी बरीच मुद्रणालये निघाली व मुद्रण व्यवसायाचा पाया पक्का झाला. एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला मुद्रणव्यवसायातील एक नवा टप्पा सुरू झाला.

१३. १८०० मध्ये कलकत्त्याजवळ सेरामपूर येथे विल्यम कॅरी यांनी स्वतःचा छापखाना चालू केला. त्यांनी पंचानन कर्मकार या प्रसिद्ध कारागिरांना बोलावून घेऊन नोकरी दिली व त्यांच्याकडून येथील विविध भाषांमधील अक्षारांचे साचे कोरून खिळे तयार करण्याचे काम सुरू केले. 

१४. पंचानन कर्मकार व त्यांचे जावई मनोहर यांनी भारतातील बहुतेक सर्व लिप्यांमधील अक्षरे उत्तम प्रकारे तयार केली. शिवाय परदेशी भाषांच्या लिप्यांचे खिळेही त्यांनी तयार केले. चिनी लिपीसुद्धा त्यांनी हस्तगत केली. सेरामपूरची खिळे तयार करण्याची ओतशाळा ही भारतीय लिप्यांचे खिळे सहजपणे मिळण्याचे एकमेव ठिकाण होते व भारतातील छापखान्यांची गरज यशस्वीपणे भागवीत असे.

१५. सेरामपूर येथील मिशनच्या छापखान्याने १८०१–३२ या काळात विविध भारतीय भाषा व परदेशी भाषा मिळून ४० भाषांमधील १२,००० ग्रंथ छापले. 

१६. इंग्रज अधिकाऱ्यांनी फोर्ट विल्यम कॉलेज या शिक्षण संस्थेत भारतीय भाषांच्या शिक्षणासाठी मोठे उत्तेजन दिले व इंग्रज नागरिकांनी येथील भाषा शिकाव्यात म्हणून येथील भाषांमध्ये ग्रंथछपाईसाठी खूप खटपट केली. 

१७. १८१८ मध्ये दिग्दर्शन व समाचार दर्पण नावांची नियतकालिके छापून प्रसिद्ध करण्याचे सर्व श्रेय विल्यम कॅरी व त्यांचा सेरामपूर मिशन छापखाना यांना द्यावे लागेल. 

१८. मात्र त्याआधी १७८० मध्ये बेंगॉल गॅझेट नावाचे दैनंदिन वृत्तपत्र जेम्स ऑगस्टस हिकी यांनी सुरू केले. एकोणीसाव्या शतकात जसजसा साक्षरता व शिक्षण यांचा प्रसार वाढत गेला तसतसा मुद्रणव्यवसाय वाढत गेला व त्याला स्थैर्य येऊन एक भारदस्त परिणाम लाभले.

१९. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात व्यापार व आर्थिक देवाणघेवाण खूपच वाढल्यामुळे मुद्रणव्यवसायाला अतिशय जोरदार चालना मिळून जगभर हा व्यवसाय बराच फोफावला. मात्र भारतात परकीय सत्तेमुळे या व्यवसायाची वाढ फार सावकाश झाली. देशाची पुस्तकांची पुष्कळशी गरज परदेशांतून भागवली जात असे.



भारतातील इंग्रजी वृत्तपत्रे

०१. भारतातील वृत्तपत्र व्यवसायाची सुरुवात इंग्रजी वृत्तपत्रांच्या प्रकाशनाने झाली. ईस्ट इंडिया कंपनीच्या गैरव्यवहारांना वाचा फोडण्याचे काम ही वृत्तपत्रे करीत. त्यांचे चालकत्वही बव्हंशी कंपनीच्या असंतुष्ट कर्मचारी वर्गाकडेच असे.

०२. भारतातील पहिले इंग्रजी वृत्तपत्र कलकत्ता जनरल अॅडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅझेट हे कलकत्ता येथे २९ जानेवारी १७८० रोजी जेम्स ऑगस्टस हिकी या ब्रिटिश व्यक्तिने सुरु केले. ते हिकिज बेंगॉल गॅझेट म्हणूनही ओळखले जाते. 

०३. कंपनी सरकारशी संघर्ष सुरु झाल्यावर त्याने वृत्तपत्रस्वातंत्र्याचा पुरस्कार केला व अशा तऱ्हेचे स्वातंत्र्य समाजहिताच्या दृष्टीने आवश्यक आहे, असेही म्हटले. कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या खाजगी भानगडींना वाचा फोडावयाची, हाच हिकीचा प्रमुख खटाटोप होता. त्यातूनच कटकटी निर्माण झाल्या व टपालातून त्याचे साप्ताहिक पाठविण्याची त्याची सवलत रद्द झाली. तसेच एक दोनदा त्यास दंड होऊन शिक्षाही भोगावी लागली.

०४. नोव्हेंबर १७८० मध्ये बी. मेसिन्क व पीटर रीड यांनी इंडिया गॅझेट, (कलकत्ता अॅड्‌व्हर्टायझर) हे साप्ताहिक सुरु केले. हे पत्र ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापार-व्यवहारांशी मुख्यत्वे निगडित होते व ते पुढे जवळपास पन्नास वर्षे चालले. 


०५. त्याच्या प्रकाशनानंतर चार वर्षांनी कलकत्ता गॅझेट प्रत्यक्षपणे सरकारी आश्रयाखाली फेब्रुवारी १७८४ मध्ये सुरु झाले. हेच पत्र पुढे सरकारी राजपत्र (गॅझेट) म्हणून चालू राहिले. 

०६. बेंगॉल जर्नल हे साप्ताहिक फेब्रुवारी १७८५ मध्ये सुरु झाले. त्यानंतर एप्रिल १७८५ मध्ये ओरिएंटल मॅगझिन किंवा कलकत्ता अम्यूझमेंट हे मासिक चालू झाले. १७८६ मध्ये कलकत्ता क्रॉनिकल अवतरले. या सुमारास कलकत्ता येथून चार साप्ताहिके व एक मासिक प्रकाशित होत होते.

०७. मद्रासमधील पहिले इंग्रजी वृत्तपत्र मद्रास कुरिअर हे होय. ते १७८५ साली रिचर्ड जॉन्सन या सरकारी मुद्रकाने सुरु केले. त्यात प्रसिद्ध होणाऱ्या सरकारी जाहिरातींना कायदेशीरपणाचा दर्जा खास हुकुमाने देण्यात आला होता. 


०८. १७९१ मध्ये मद्रास कुरिअरचा संपादक बॉईड याने हुर्कारु हे वृत्तपत्र काढले. पण ते अल्पजीवी ठरले. 

०९. १७९५ मध्ये आर्. विल्यमने मद्रास गॅझेट सुरु केले व नंतर अवघ्या एका महिन्याने हंफ्री नावाच्या गृहस्थाने इंडिया हेरल्डच्या प्रकाशनाला अधिकृतपणे सुरुवात केली. या अपराधाबद्दल सरकारने त्याची इंग्लंडकडे रवानगी केली. परंतु बोटीवरुन तो निसटून गेला.

१०. मुंबईमधील पहिले नियतकालिक बाँबे हेरल्ड १७८९ मध्ये सुरु झाले. 
१७९१ मध्ये बाँबे गॅझेट प्रकाशित झाले. प्रारंभापासून त्याला राजाश्रय मिळाला होता. पुढच्याच वर्षी बाँबे हेरल्ड त्यात विलीन झाले. बाँबे गॅझेट १९१४ पर्यंत चालू होते. 

११. १७९२ साली बाँबे कुरिअरचा जन्म झाला. त्यात देशी भाषांतून जाहिराती प्रसिद्ध होत. मोडी लिपीतही काही जाहिराती प्रकाशित झाल्या.

१२. मद्रास व मुंबई येथील ही वृत्तपत्रे सरकारी आश्रयाखाली असल्याने त्यांचा अधिकाऱ्यांशी संघर्ष झाला नाही. मात्र बंगालमध्ये परिस्थिती निराळी होती. १७९१ मध्ये विल्यम ड्‌वेन याने डिमकीन्कासन याच्या भागीदारीत बेंगॉल जर्नलची मालकी मिळविली. 

१३. मराठ्यांबरोबरच्या लढाईच्या काही वार्ता प्रसिद्ध केल्याबद्दल त्याच्यावर सरकारचा रोष झाला व त्याला हद्दपार करण्याचेही ठरले. परंतु त्या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही व ड्‌वेन याने स्वतःचे इंडियन वर्ल्ड हे वृत्तपत्र सुरु केले. 

१४. त्या पत्रातील मजकुराबद्दल ड्‌वेनवर राज्यकर्त्यांची इतराजी झाली व त्याला इंग्लंडला धाडण्यात आले. भारतातील त्याच्या तीस हजार रुपयांच्या मिळकतीबद्दल त्याला भरपाईदेखील मिळाली नाही. १७९८ मध्ये डॉ. 

१५. चार्ल्‌स मॅक्लीन याने बेंगॉल हुर्कारु सुरु केले. परंतु प्रारंभापासूनच मॅक्लीनच्या सरकारशी कटकटी सुरु झाल्या व त्याचे पर्यवसान त्याच्या हद्दपारीत झाले.

१६. हिंदुस्थानातील प्रारंभीची वृत्तपत्रे ईस्ट इंडिया कंपनीच्या असंतुष्ट नोकरांनी सुरु केली. त्यांत वैयक्तिक हेवेदावे व भानगडी यांच्यावरच भर दिला जाई. देशातील यूरोपीय समाज डोळ्यासमोर ठेवून ती चालविली जात. त्यांचा खप अगदी मर्यादित असे. वृत्तपत्रांसाठी खास कायदे नसले, तरी त्यांच्यावर अनेकदा राज्यकर्त्यांची अवकृपा होई व प्रकाशनपूर्व नियंत्रणेही लादली जात.


१७. भारतातील वृत्तपत्रांच्या भरभराटीला पोषक ठरलेली एक महत्त्वाची घटना म्हणजे, सर चार्ल्स मेटकाफ या हंगामी गव्हर्नर जनरलने भारतात वृत्तपत्रांना बहाल केलेले स्वातंत्र्य होय. त्या आधीच्या हंगामी गव्हर्नर जनरल जॉन अॅडम याने कडक नियम करुन वर्तमानपत्रांच्या प्रकाशनावर नियंत्रणे लादली होती. कारण, कलकत्ता जर्नलचा संपादक जेम्स सिल्क बकिंगहॅम हा सरकारी कारभारावर टीका करीत असे. 


१८. पुढे मेटकाफने आपल्या कारकीर्दीत १८३५ मध्ये वर्तमानपत्रांवरील हे निर्बंध रद्द करुन त्यांना स्वातंत्र्य देऊ केले. भारतातील वृत्तपत्रांच्या वाढीस व प्रसारास ह्यातूनच चालना मिळाली. 

१९. जेम्स सिल्क बकिंगहॅम याने कलकत्ता जर्नल हे आपले वृत्तपत्र निर्भयपणे व व्यापक दृष्टीने चालवले. वृत्तपत्रावरील सरकारी बंधनांना त्याचा सक्त विरोध होता. हिंदी लोकांविषयी त्याला आपुलकी वाटे. राजा राममोहन रॉय व बकिंगहॅम यांचा गाढ स्नेह हे त्याचेच द्योतक आहे. त्याचा स्वतंत्र बाणा कंपनी सरकारला मानवला नाही व १८२३ साली त्याची सक्तीने इंग्लंडला रवानगी करण्यात आली.






१८५७ च्या उठावानंतर भारतात वृत्तपत्रांचा विकास
०१. ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार १८५७ च्या उठावानंतर ब्रिटिश सरकारने स्वतःकडे घेतला व भारतातील राजकीय परिस्थितीही बदलू लागली. देशाच्या निरनिराळ्या भागांत भारतीय भाषांतील वृत्तपत्रे निघू लागली व राज्यकारभारावरची त्यांची टीका राज्यकर्त्यांना झोंबू लागली. 

०२. त्यातूनच त्या वृत्तपत्रांवर अधिक कडक नियंत्रण ठेवण्यासाठी १८७८ साली ‘व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट’ जारी झाला. हा कायदा मंजूर करताना तत्कालीन राज्यकर्त्यांनी, इंग्रजी वृत्तपत्रांची प्रशंसा केली. ही प्रशंसा ब्रिटिश मालकीच्या इंग्रजी वृत्तपत्रांना उद्देशून होती, हे उघड आहे. भारतामधील अशा वृत्तपत्रांना ‘अँग्लो इंडियन प्रेस’ अशी संज्ञा प्राप्त झाली.

०३. अँग्लो-इंडियन वृत्तपत्रे प्रांतांच्या राजधान्यांतून प्रसिद्ध होत. स्टेट्स्‌मन (कलकत्ता), मद्रास मेल (मद्रास), टाइम्स ऑफ इंडिया (मुंबई), पायोनिअर (अलाहाबाद), सिव्हिल अँड मिलिटरी गॅझेट (लाहोर) इ. त्या काळातील प्रमुख अँग्लो-इंडियन वृत्तपत्रे होती. 


०४. स्टेट्स्‌मन हे वृत्तपत्र रॉबर्ट नाइट याने कलकत्ता (नवी दिल्लीच्या आवृत्तीसह) १८७५ पासून सुरु केले. अलाहाबाद येथे पायोनिअर १८६५ पासून चालू झाले. ह्या वृत्तपत्रांतील काही थोडीच उदारमतवादी व बाकीची बहुतेक कट्टर भारताविरोधी होती. भारतात प्रखर होत चाललेल्या राजकीय आंदोलनांना विरोध करावयाचा व राज्यकर्त्यांची बाजू उचलून धरावयाची, हे त्यांचे अंगीकृत कार्य ती नीटपणे पार पाडीत असत. 

०५. १९३७ साली प्रांतिक स्वायत्तता अंमलात आल्यावर या वृत्तपत्रांनी आपले धोरण बदलण्यास सुरुवात केली व ती विद्यमान सरकारला पाठिंबा देऊ लागली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ब्रिटिश मालकांनी ती देशातील धनिकांना विकून टाकली आणि भारतामधील अँग्लो-इंडियन वृत्तपत्रांचा अवतार समाप्त झाला.

०६. भारतात ब्रिटनचा अंमल स्थिरपद झाल्यानंतर भारतीयांच्या मालकीची इंग्रजी वृत्तपत्रे हळुहळू निघू लागली. बंगालमधील बंगाली व अमृतबझार-पत्रिका ही त्यांपैकी अग्रेसर होती. त्यांच्या मागोमाग फॉर्वर्ड, लिबर्टी, अॅड्व्हान्स ही दैनिके त्या प्रांतात निघाली. कलकत्त्याला हिंदुस्थान स्टँडर्ड हे दैनिक सुरु झाले. 

०७. या प्रकारच्या दैनिकांत मद्रासच्या हिंदूचे स्थान महत्त्वाचे आहे. २० सप्टेंबर १८७८ रोजी हिंदू साप्ताहिक रुपात सुरु झाले. जी. सुब्रह्मण्यम् अय्यर हे त्याचे संस्थापक होत. कालांतराने हिंदूचे कार्यालय मद्रासच्या राजकीय कार्याचे केंद्र बनले. १८८९ पासून हिंदू हे दैनिक रुपात प्रसिद्ध होऊ लागले. त्यावेळी कस्तुरी रंगा आयंगार हिंदूचे कायदेशीर सल्लागार होते. नंतर त्यांनीच ते दैनिक मार्च १९१२ मध्ये विकत घेतले. सध्या त्याची मालकी त्यांच्या कुटुंबाकडे आहे.

०८. मुंबई प्रांतातील इंग्रजी वृत्तपत्रांत बाँबे क्रॉनिकल, अॅडव्होकेट ऑफ इंडिया, फ्री प्रेस जर्नल इ. दैनिकांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. बाँबे क्रॉनिकल हे राष्ट्रीय बाण्याचे पहिले इंग्रजी वृत्तपत्र फिरोजशहा मेहतांनी १९१३ च्या मार्चमध्ये सुरु केले. त्यांचे संपादक म्हणून बी. जी. हॉर्निमन व सय्यद अब्दुल्ला ब्रेलवी यांनी लौकिक संपादला. लक्ष्मण गणेश खरे हे त्याचे सहसंपादक होते. 


०९. एस्. सदानंद यांनी फ्री प्रेस जर्नल १९२७ साली सुरु केले. पत्रकारितेचे आणि देशभक्तीचे संस्कार लाभलेले एस्. सदानंद यांनी ‘फ्री प्रेस ऑफ इंडिया न्यूज एजन्सी’ ही वृत्तसंस्था १९२७ साली स्थापन केली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य चळवळीसंबंधीच्या बातम्या विस्तृतपणे व यथार्थ रुपात भारतीयांच्या दृष्टिकोणातून लोकांपुढे आणणे, ही त्या काळाची गरज होती व ती भागविण्यासाठीच या देशी वृत्तसंस्थेचा जन्म झाला. 

१०. या संस्थेच्या बातम्या प्रसृत करण्यासाठीच सदानंद यांनी पुढे स्वतःचे फ्री प्रेस जर्नल हे दैनिक वृत्तपत्र जर्नल सुरु केले. या इंग्रजी दैनिकाने आम जनतेसाठी वृत्तपत्र चालवण्याचा नवा पायंडा निर्माण केला. 

११. दिल्लीतील वृत्तपत्रांत हिंदुस्थान टाइम्स अग्रेसर आहे. स्टेट्स्‌मनही तेथून प्रकाशित होते. हिंदुस्थान टाइम्सचा प्रारंभ शिखांचे (अकाली) मुखपत्र म्हणून १९२३ साली झाला. पुढे त्याची मालकी पंडित मदनमोहन मालवीय यांच्याकडे आली. त्यांचे संपादक म्हणून सरदार पण्णीकर, जयराम दास दौलतराम, पोथॅन जोसेफ, देवदास गांधी प्रभृतींनी काम केले. आता ते बिर्ला-गटा’ च्या मालकीचे आहे. 

१२. लीडर हे उत्तर प्रदेशातील एक जुने इंग्रजी वृत्तपत्र मदनमोहन मालवीय यांनी १९०९ च्या ऑक्टोबर महिन्यात सुरु केले. ते देशातील उदार पक्षाच्या धोरणाला पाठिंबा देई. सी. वाय्. चिंतामणी हे त्याचे प्रथितयश संपादक होते. 

१३. पंडित नेहरुंच्या पुरस्काराने लखनौला नॅशनल हेरल्ड हे पत्र १९३८ च्या ऑगस्टमध्ये चालू झाले. के रामराव हे त्याचे पहिले संपादक होत. त्यांच्यानंतर नॅशनल हेरल्डची संपादकीय सुत्रे १९४६ मध्ये चलपती राव यांच्याकडे आली. १९४२ च्या आंदोलनाच्या वेळी नॅशनल हेरल्डला सरकारी छळ सोसावा लागला व ते काही काळ बंदही राहिले. विवेचक व अभ्यासपूर्ण संपादकीय लेखन हे या पत्राचे वैशिष्ट्य होय. 

१४. लाहोरचे ट्रिब्यून १८८१ साली सुरु झाले. सरदार दयालसिंग मजिथिया हे त्याचे संस्थापक होते. त्यांनी त्यासाठी सार्वजनिक न्यास स्थापन केला. कालिनाथ रे यांच्या संपादकत्वाखाली (१९१७-४३) ट्रिब्यूनला स्वतंत्र बाण्याचे दैनिक म्हणून प्रतिष्ठा प्राप्त झाली. 

१५. नागपूरचा हितवाद १९१३ साली ‘भारत सेवक समाज’ च्या मालकीचा झाला व १९३९ साली त्याचे दैनिकात रुपांतर करण्यात आले. १९१४ नंतर डॉ. अॅनी बेझंट यांनी होमरुल लीगच्या प्रचारासाठी मद्रासला न्यू इंडिया हे दैनिक चालू केले. त्याच्या संपादनात डॉ. सी. पी. रामस्वामी अय्यर, डॉ. अॅरंडेल यांच्यासारखी मातब्बर मंडळी सहभागी होती. 

१६. त्याच सुमारास मद्रासच्या ‘जस्टीस पक्षा’ ने जस्टिस या नावाचे दैनिक १९१७ साली चालू केले. पुढे त्याचा वारसा लिबरेटरने १९४२ ते १९५३ पर्यंत चालविला.

१७. इंग्रजी वृत्तपत्रसृष्टीत साप्ताहिकांनी मोठी कामगिरी बजावली आहे. देशातील राजकीय व सामाजिक चळवळींचे पुढारीपण करणारे नामवंत कार्यकर्ते त्यांचे संपादन करीत असत. 


१८. अशा इंग्रजी साप्ताहिकांत लो. टिळकांचे मराठा, म. गांधींचे यंग इंडिया व हरिजन, लाला लजपतराय यांचे पीपल, राजगोपालाचारींचे नियमितपणे लेखन चालू असलेले स्वराज्य, के. नटराजन्‌ यांचे सोशल रिफॉर्मर, भारत सेवक समाजाचे सर्व्हंट ऑफ इंडिया इत्यादींचा समावेश होतो.

Scroll to Top