०१. महाराष्ट्रातील प्रबोधनयुगाचा विचार करता चार मुख्य वृत्तपत्रीय प्रवाह दर्शवले जातात. सुधारणावादी प्रवाह, ख्रिस्ती धर्मप्रचारकांचा प्रवाह, धर्म-परंपराभिमानी प्रवाह आणि अब्राह्मणी (बहुजनवादी) प्रवाह हे ते चार प्रवाह आहेत.
०२. सुरुवातीच्या काळातील वृत्तपत्रे ही मतपत्रे म्हणून ओळखली जातात. पहिल्या महायुद्धानंतर वृत्तपत्रीय स्वरूपात बदल होऊन व्यावसायिक पत्रकारितेचा उदय झालेला दिसून येतो. हा प्रवाह स्वातंत्र्योत्तर काळात मोठ्या प्रमाणात विकसित झाला आहे.
०३. सुधारणावादी वृत्तपत्रे सुधारणावादी वृत्तपत्रांनी एकप्रकारे आत्मटीकेचे कार्य पार पाडले. ही सुधारणावादी पत्रे मुख्यतः उच्चविद्याविभूषित भारतीयांनी सुरू केली होती. यांचे ध्येय पाश्चात्त्य ज्ञानाच्या आधारे स्वकियांचे प्रबोधन करणे हेच होते.
०४. मराठीतील पहिले वृत्तपत्र ‘दर्पण’ ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून सुरु केले. त्यापूर्वी मुंबापूर वर्तमान नावाचे वृत्तपत्र (२० जुलै १८२८) निघाल्याची नोंद आढळते.
०५. दर्पण प्रारंभी पाक्षिक होते. ४ मे १८३२ पासून ते साप्ताहिक झाले. या पत्रात इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांत मजकूर छापला जात . रघुनाथ हरिश्चंद्रजी आणि जनार्दन वासुदेवजी हे दोन श्रीमंत गृहस्थ या पत्राचे चालक होते.
०६. जांभेकर यांना संपादनाच्या कार्यात भाऊ महाजन (ऊर्फ गोविंद विठ्ठल कुंटे) यांचे सहकार्य लाभत असे. स्वतः जांभेकर इंग्रजी मजकुराचे मराठीत भाषांतर करीत.
०७. जांभेकर विद्वान होते. दर्पणमध्ये त्यांनी कोणताही विषय वर्ज्य मानला नाही. हिंदू विधवांचा पुनर्विवाह, धंदेशिक्षणाची आवश्यकता, बंगाली रंगभूमी, रहदारी- जकात असे नानाविध विषय दर्पणमध्ये आले आहेत. दर्पणचा खप वर्षभरात तीनेशे प्रतींवर गेला होता.
०८. एका बदनामीच्या खटल्यात जांभेकर यांना आठशे रुपये दंड झाला. बेअदबी प्रकरणाची झळ लागून दर्पण बंद पडले (१८४०). ते बंद पडल्यावर त्याच्या चालकांनी युनायटेड सर्व्हिस गॅझेट अँड लिटररी क्रॉनिकल हे नियतकालिक सुरु केले.
०९. जांभेकरांनी १८४० च्या मे महिन्यात ‘दिग्दर्शन’ हे मराठी नियतकालिक सुरु केले. ते साहित्य, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांना वाहिलेले भारदस्त मासिक होते.
१०. पूर्णपणे मराठी भाषेतील मजकुराचे वृत्तपत्र म्हणून मुंबई अखबारचा निर्देश करावा लागेल. ४ जुलै १८४० रोजी त्याचा पहिला अंक प्रसिध्द झाला. ते दर शनिवारी प्रसिध्द होई. दर्पण बंद करुन त्याच्याच चालकांनी हे वृत्तपत्र सुरु केले.
११. याच सुमारास जून १८४२ मध्ये अहमदनगर येथे ख्रिस्ति मिशनऱ्यांनी ज्ञानोदय हे मासिक सुरु केले. १८७३ मध्ये ज्ञानोदय साप्ताहिक झाले. इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून प्रसिध्द होणाऱ्या या साप्ताहिकाचे रेव्हरंड हेन्री बॅलंटाइन हे पहिले संपादक होते. मराठी विभागाचे संपादन शाहूराव कुकडे करीत असत.ज्ञानोदयच्या संपादकांमध्ये कवी रेव्हरंड ना. वा. टिळक, देवदत्त नारायण टिळक, रेव्हरंड दि. शं. सावरकर यांच्या नावांचा उल्लेख करावा लागतो.
१२. दर्पणच्या परंपरेतील प्रभाकर हे वृत्तपत्र २४ ऑक्टोबर १८४१ रोजी सुरु झाले. भाऊ महाजन हे प्रभाकरचे संपादक होते. प्रभाकरमध्ये इंग्रजी बातम्यांचे भाषांतर व संकलन असे. प्रभाकरचे मुख्य वैशिष्टय़ म्हणजे त्यात प्रसिध्द झालेली शतपत्रे. ही शतपत्रे गोपाळ हरी देशमुख ऊर्फ लोकहितवादी लिहीत असत.
१३. मिशनऱ्यांच्या धार्मिक आक्रमणावर आणि एतद्देशीय समाजाच्या अनिष्ट रुढींवर भाऊ महाजन हल्ला चढवीत. महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीत प्रभाकरची कामगिरी महत्त्वाची आहे. हे साप्ताहिक १८६५ साली बंद पडले.
१४. विरेश्वर छत्रे यांनी १८४२ साली मुंबई येथे ज्ञानसिंधु साप्ताहिकाची सुरुवात केली. अनेक सामाजिक प्रश्नांवर ज्ञानसिंधुमधून जांभेकरांच्या दर्पणमधील मतांचाच पाठपुरावा केला जात असे. मात्र दीर्घकाळ हे वृत्तपत्र चालू शकले नाही. त्यानंतर मित्रोदय, १८४४ अरुणोदय, १८४८ अशी अनेक वृत्तपत्रे काढण्याचे प्रयत्न छत्र्यांनी केले. पण त्यातील एकही वृत्तपत्र दीर्घकाळ चालवण्यात त्यांना यश आले नाही.
१५. मुंबईनंतर पुण्यातून वृत्तपत्रे निघू लागली. पुण्यातून निघालेले पहिले मराठी वृत्तपत्र म्हणजे मित्रोदय. ते १८४४ मध्ये निघाले. पण लवकरच बंद पडले.
१६. ज्ञानप्रकाशपासून पुण्यातील वृत्तपत्र व्यवसायाला व पत्रकारितेला खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. १२ फेब्रुवारी १८४९ रोजी ज्ञानप्रकाश सुरु झाले. १९०९ मध्ये ‘भारत सेवक समाजा’ने हे वृत्तपत्र चालविण्यास घेतले.ज्ञानप्रकाशचे पहिले संपादक होण्याचा मान विख्यात मराठी कादंबरीकार हरी नारायण आपटे यांना मिळाला.
१७. जानेवारी १८६२ पासून इंदुप्रकाश हे वृत्तपत्र साप्ताहिकरुपात मुंबईहून प्रसिद्ध होऊ लागले. ते काढण्यात लोकहितवादींचाच पुढाकार होता. इंदुप्रकाश इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषांतून प्रसिद्ध होई. इंग्रजी विभागाचे संपादक न्यायमूर्ती रानडे होते, तर मराठी विभागाचे संपादक म्हणून जनार्दन सखाराम गाडगीळ काम पाहत.
१८. १९०२ साली त्याचे दैनिकात रुपांतर झाले. विष्णु परशुरामशास्त्री पंडित हे १८६४ मध्ये इंदुप्रकाशचे संपादक झाले. १९०४ मध्ये इंदुप्रकाशचे प्रकाशन स्थगित झाले.
१९. संस्कृत व इंग्रजीतले ज्ञान मराठी भाषिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने १८६७ साली ‘विविध ज्ञान विस्तार’ या मासिकाची सुरुवात झाली. विविध ज्ञान विस्ताराने स्वभाषेची अवहेलना करणा-यांची हजेरी घेतली
२०. सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. १८७३मध्ये या पत्राची सुरुवात झाली. समाज व धर्मासंबंधी सुधारणाविषयक चर्चा या पत्रातून झासी. प्रार्थना समाजाचे धर्मासंबंधीचे विचार प्रसारित करणे आणि त्यावरील आक्षेपांना उत्तर देणे हा यामागील हेतू होता. न्या. रानडे, डॉ. भांडारकर, सर नारायण चंदावरकर, मामा परमानंत यांनी यातून लेखन केले. प्रार्थना समाजाच्या संस्थात्मक आधारामुळे हे पत्र दीर्घकाळ चालले.
२१. केसरीच्या पाठोपाठ महाराष्ट्रात जी काही वृत्तपत्रे निघाली, त्यांत सुधारक, काळ आणि संदेश या वृत्तपत्रांची कामगिरी मोलाची आहे. १५ ऑक्टोबर १८८८ रोजी सुधारकचा साप्ताहिकरुपात पहिला अंक निघाला. सुरुवातीच्या काळात सुधारक वृत्तपत्रात इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांमधून मजकूर प्रसिध्द होई.
२२. नामदार गोपाळ कृष्ण गोखले आगरकरांना सहकार्य करीत व इंग्रजीतून लेखन करीत. आगरकारांनी मृत्युपर्यंत (१८९५) सुधारक स्वतः चालविले. आगरकरांच्या पश्चात सीतारामपंत देवधर यांनी सुधारक चालविले. त्यांना वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी सहाय्य केले. ३ जुलै १९१६ रोजी सुधारक बंद पडले.
२३. टिळक यांच्या निधनानंतर १९२१ मध्ये मुंबईहून लोकमान्य दैनिक सुरु झाले. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे त्याचे पहिले संपादक होते. मात्र १९२३ साली मतभेदामुळे खाडिलकरांनी संपादकपद सोडले. १९२५ मध्ये ते बंद पडले. १९३५ मध्ये पुन्हा लोकमान्य सुरु झाले. पां. वा. गाडगीळ त्याचे काही काळ संपादक होते.
२४. खाडिलकर यांनी लोकमान्य सोडल्यावर स्वतःचे नवाकाळ हे दैनिक मुंबईतून ७ मार्च १९२३ रोजी सुरु केले. या वृत्तपत्रातील लेखनाबद्दल १९२९ साली संपादक या नात्याने खाडिलकर यांच्याविरुध्द राजद्रोहाचा खटला होऊन त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली.
२५. तरुण भारत हे दैनिक मुळात साप्ताहिकरुपात २० जानेवारी १९२६ रोजी नागपूर येथून सुरु झाले. नागपूरचे ज्येष्ठ राजकीय नेते मोरोपंत अभ्यंकर यांच्या प्रेरणेने हे सुरु झाले.
२६. समकालीन वृत्तपत्रांचा सखोल अभ्यास करुन डॉ. ना. भि. ऊर्फ नानासाहेब परुळेकर यांनी १ जानेवारी १९३२ पासून पुण्यात दैनिक सकाळ हे वृत्तपत्र सुरु केले. १९३५ ते १९५० या काळात पुण्यातून लोकमत, लोकहित, नवभारत, अग्रणी यांसारखी दैनिके प्रसिद्ध होत होती.
२७. मराठवाड्यातील मराठी पत्रकारितेचा हैदराबादच्या मुक्तिसंग्रामाशी निकटचा संबंध आहे. मराठवाड्यातील पत्रकारितेवर निजामी राजवटीचे दडपण दीर्घकाळ होते. अमरज्योती, निजाम विजय आणि मराठवाडा यांसारखी मोजकी वृत्तपत्रे साप्ताहिक रुपात प्रसिद्ध होत होती.
२८. आनंद कृष्ण वाघमारे यांनी १० फेब्रुवारी १९३८ रोजी मराठवाडा साप्ताहिक रुपात सुरु केले. १९३९ मध्ये निजाम सरकारने वाघमारे यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला. त्यात वाघमारे यांना दीड वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यामुळे मराठवाडाचे प्रकाशन स्थगित झाले.
२९. वाघमारे हैदराबादच्या स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय होते. लढ्यासाठी वृत्तपत्राची गरज होती, म्हणून त्यांनी १३ मार्च १९४८ रोजी पुन्हा नव्या स्वरुपात मराठवाडा साप्ताहिक सुरु केले. सुरुवातीला पुण्याहून व मग मुंबईहून मराठवाडा छापून मराठवाड्यात पाठविला जाई. निजामाची राजवट संपुष्टात आल्यावर १ एप्रिल १९४९ पासून मराठवाडा अर्धसाप्ताहिक म्हणून हैदराबादहून प्रसिद्ध होऊ लागले.
ख्रिस्ती मिशनऱ्यांची वृत्तपत्रे
०१. ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या वृत्तपत्रांनीदेखील सामाजिक सुधारणांच्या बाबतीत सुधारणावादी वृत्तपत्राचीच भूमिका घेतली. म्हणून या वृत्तपत्रांनी भारतीय प्रथा, परंपरांच्या बाबतीत बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकाच घेतल्याचे दिसून येते. मात्र यांचा मुख्य उद्देश हा सुधारणावाद नसून धर्मप्रसार करणे हा होता. हा महत्त्वाचा फरक या प्रवाहात दिसून येतो.
०२. १९४१ साली ज्ञानोदय मासिकाची सुरुवात झाली. हे पत्र अहमदनगर येथून छापले जात असे. या मासिकाची सुरुवात ख्रिस्ती मिशन-यांनी केली. यांचा मुख्य हेतू धर्मप्रसाराचा होता असे म्हटले जाते. याचे पहिले संपादक रेव्ह. महाराष्ट्राच्या सामाजिक-धार्मिक सुधारणेच्या क्षेत्रातील समर्थक पक्ष म्हणून याचे महत्त्व होते. १८७३ सालापासून याचे साप्ताहिकात रूपांतर करण्यात आले.
०३. ज्ञानोदयाशिवाय सत्यदीपिका हे पत्रही बाबा पद्मनजी (ख्रिस्ती मिशनरी) यांनी सुरू केले. यातून महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या कार्याप्रती सहमती दर्शविली जायची.
धर्माभिमान्यांची वृत्तपत्रे
०१. सुधारणावाद म्हणजे ब्रिटिशांचा अनुनय होय. आपली प्रथा, परंपरा या गौरववादी आहेत असे समजण-यांचा एक प्रवाह होता. हा पूर्वगौरववादी विचार मुख्यतः ख्रिस्ती मिशन-यांच्या हिंदू धर्मपरंपरांच्या चिकित्सेला प्रतिक्रिया म्हणून उदयाला आला आहे.
०२. १८६४मध्ये रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी हे वृत्तपत्र काढले. इंग्रजीतून निघालेल्या या वृत्तपत्रात मराठी भाषिकांसाठी मराठी मजकूर दिला जाऊ लागला. या पत्राची संपादकीय जबाबदारी नारायण महादेव ऊर्फ मामा परमानंद यांच्याकडे होती.
०३. विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी १८७४ साली निबंधमालेची सुरुवात केली. यातून त्यांनी हिंदू धर्मातील प्रथा, परंपरा, रूढी यांचे पुनरुज्जीवन करणारे लेखन केले. या लेखनातून ख्रिस्ती मिशन-यांबरोबरच इंग्रजांचे गुण गाणाऱ्या एतद्देशियांवरही टीका केली.
०४. केसरी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ शी संबंधित असलेल्या सहा तरुणांनी (त्यात प्रामुख्याने चिपळूणकरांसह लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर यांनी) विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या निबंधमालेतून स्फूर्ती घेऊन मराठा व केसरी ही इंग्रजी व मराठी वृत्तपत्रे अनुक्रमे २ जानेवारी व ४ जानेवारी १८८१ रोजी पुण्यातून प्रकाशित करण्यास सुरुवात केली. लोकमान्य टिळक हे मराठाचे पहिले संपादक, तर गोपाळ गणेश आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते.
०५. ‘शिवाजीचे उद्गार’ या १५ जून १८९७ रोजी प्रसिध्द झालेल्या कवितेमुळे लोकमान्य टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली दीड वर्ष कारावासाची शिक्षा झाली. १९०४ मध्ये राष्ट्रीय चळवळीचा जोर वाढत गेल्यावर टिळकांचे लेखनही अधिक आक्रमक व जहाल बनले.
०६. २४ जून १९०८ रोजी टिळकांना राजद्रोहाच्या आरोपाखाली पुन्हा शिक्षा झाली. ही शिक्षा सहा वर्षांची होती. ती मंडाले येथे भोगावी लागली. केसरीत प्रसिध्द झालेले हे लेखन कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे होते. परंतु टिळकांनी त्याची जबाबदारी संपादक या नात्याने स्वतःकडे घेतली.
०७. शिवराम महादेव परांजपे यांनी २५ मार्च १८९८ रोजी काळ हे साप्ताहिक सुरु केले. १५ मे १९०८ च्या काळच्या अंकातील लेखन राजद्रोही ठरवून परांजपे यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यात त्यांना एकोणीस महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. शिक्षा झाल्यावर परांजपे यांच्या निबंधांचे संग्रह जप्त करण्यात आले. तुरुंगातून सुटून आल्यावर सरकारने काळकडे जामीन मागितला. त्यामुळे १९१० साली परांजपे यांना काळ बंद करावे लागले.
०८. १४ जानेवारी १९१५ रोजी अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी मुंबईतून संदेश दैनिक सुरू केले. यामधून टिळकांच्या राजकारणाचा आणि विचाराचा पुरस्कार केला जात असे.मराठी वृत्तपत्रात संदेशमुळे एक नाविन्य आले. १९२१ साली ते बंद पडले.
०९. हिंदुपंच, किरण, उपदेशचंद्रिका, विचारलहरी, सद्धर्मदीपिका, ज्ञानचंद्रोदय, सर्वसंग्रह, स्वराज्य, विश्ववृत्त, भाला, मुमुक्षू, देशसेवक, राष्ट्रमत ही राष्ट्रीय वृत्तीची धर्मविषयक पत्रे होती. न. चिं. केळकर याच परंपरेत येतात.