NSD वर्ल्ड थिएटर ऑलंपिक २०१८ आयोजित करणार सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय नाट्य विद्यालय (NSD) च्या नेतृत्वात २०१८ साली देशातल्या अनेक शहरांमध्ये ‘वर्ल्ड थिएटर ऑलंपिक’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.


या स्पर्धेची ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना असेल. १५ दिवस चालणार्‍या या कार्यक्रमात विविध नाट्य प्रकारांचे प्रदर्शन करण्यासाठी ५० हून जास्त देशांना आमंत्रण देण्यात येईल.



वाराणसीत ISARC च्या स्थापनेस मंजूरी मिळाली
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील राष्ट्रीय बियाणे संशोधन व प्रशिक्षण केंद्र (NSRTC) च्या परिसरात आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था (IRRI), दक्षिण आशिया प्रादेशिक केंद्र (ISARC) ची स्थापना करण्यास मान्यता दिली गेली आहे. यासाठी DAC&FW, IRRI आणि फिलिपीन्स यांच्या दरम्यान करार केला जाईल.

प्रस्तावाअंतर्गत, वाराणसीत सेंटर ऑफ एक्सलन्स इन राइस व्हॅल्यू अॅडीशन (CERVA) स्थापन करण्यात येईल. 

या केंद्रांमधून पूर्व भारतात तसेच दक्षिण आशियाई व आफ्रिकन देशांमध्ये अन्नधान्य उत्पादन आणि कौशल्य यामध्ये विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 

ISARC हे IRRI संचालक मंडळाच्या संचालनाखाली कार्य करेल आणि यामधील संचालक हा पात्र IRRI कर्मचारी सदस्य असणार. यासाठीची समन्वय समिती IRRI चे महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार.



नवे आर्थिक व्यवहार सचिवपदी एस. सी. गर्ग यांची निवडवरिष्ठ प्रशासकीय अधिकारी सुभाष चंद्रा गर्ग यांची वित्तमंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागाच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

त्यांनी ३१ जून २०१७ रोजी निवृत्त झालेले शक्तीकांत दास यांच्या जागेवर पदभार घेतला.

राजस्थान संवर्गाचे १९८३ सालचे IAS अधिकारी गर्ग याआधी बांग्लादेश, भूटान, भारत आणि श्रीलंका देशांसाठी जागतिक बँकेचे कार्यकारी संचालक होते.



देशात मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना (२०१७-२२) जाहीर
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जय प्रकाश नड्डा यांनी मलेरियाच्या निर्मूलनासाठी राष्ट्रीय धोरणात्मक योजना जाहीर केली आहे.

ईशान्य भारतामधील यशस्वी मोहिमेनंतर आता झारखंड, ओडिसा, छत्तीसगढ, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांवर लक्ष केन्द्रित केले गेले आहे.

योजनेमध्ये आगामी ५ वर्षासाठी देशाच्या विभिन्न भागांमध्ये मलेरियाच्या स्थितीनुसार त्याच्या निर्मूलनाचे लक्ष्य निर्धारित केले गेले आहे. 

योजनेअंतर्गत मलेरियाची निगरानी, जलद निदान प्रक्रियेची स्थापना आणि मलेरियाचा फैलाव रोखणे, मच्छरदानीच्या वापराची जाहिरात, घरगुती स्प्रेचा वापर आणि प्रभावी कार्यासाठी मनुष्यबळ व क्षमतेचा प्रभावी वापर अश्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.

मलेरिया हा प्लॅज्मोडिअम प्रकाराशी संबंधित परजीवी प्रोटोजोआ द्वारे मानवांना आणि इतर प्राण्यांना मच्छरामुळे होणारा एक संक्रामक रोग आहे. सामान्यतः संसर्गग्रस्त मादी अॅनोफेलस मच्छरामुळे हा रोग पसरतो. जागतिक स्तरावर भारत हा तिसरा सर्वाधिक प्रमाणात मलेरियाने ग्रसित देश आहे.



भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री
बीसीसीआयने ११ जुलै रोजी रात्री रवी शास्त्री यांच्याकडे टीम इंडियाच्या मुख्य कोचपदाची जबाबदारी सोपविली. 

माजी वेगवान गोलंदाज झहीर खान हे संघाचे गोलंदाजी कोच असतील. याशिवाय राहुल द्रविड यांच्याकडे विशिष्ट परदेश दौऱ्यासाठी फलंदाजी सल्लागाराची नवी जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

राहुल द्रविड हे भारतीय ‘अ’ आणि १९ वर्षांखालील मुलांच्या संघाचेसुद्धा मुख्य मार्गदर्शक आहेत.

बीसीसीआयचे काळजीवाहू अध्यक्ष सी.के. खन्ना यांनी या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करताना सांगितले, की क्रिकेट सल्लागार समितीच्या (सीएसी) शिफारशींवर आम्ही शास्त्री यांना मुख्य कोच नेमण्याचा निर्णय घेतला. झहीर खान हे पुढील दोन वर्षांसाठी गोलंदाजी कोच असतील

भारताकडून २०१४ मध्ये अखेरचा सामना खेळणारा झहीर खान हा भारताचा सर्वोत्कृष्ट स्विंग गोलंदाज मानला जातो.



भारतीय महिला क्रिकेट कर्णधार मिताली राजचा विक्रम
भारतीय महिला क्रिकेट टीमची कर्णधार मिताली राज हिने महिला वनडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे. 

इंग्लंडमध्ये सध्या महिला वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध मिताली ब्रिस्टलच्या मैदानावर उतरली त्यावेळी वर्ल्ड रेकॉर्डपासून मिताली केवळ ४१ धावा दूर होती. या सामन्यात ११४ चेंडूंमध्ये ६९ धावा फटकावून मिताली बाद झाली, पण त्याआधी तिने ६००० धावांचा टप्पा ओलांडला. 

१८३ एकदिवसीय सामन्यांमध्ये मितालीने हा विक्रम केला. यापुर्वी इंग्लंडची खेळाडू शार्ले एडवर्डच्या नावावर हा विक्रम होता. शार्ले एडवर्डने १९१ सामन्यांमध्ये ५९९२ धावा बनवल्या होत्या.



पृथ्वीजवळ असणाऱ्या ‘सरस्वती’ दीर्घिका समूहाचा शोध
पृथ्वीपासून सुमारे ४ अब्ज प्रकाशवर्षं दूर असणाऱ्या ‘सरस्वती’ या दीर्घिकांच्या एका प्रचंड मोठ्या समूहाचा (सुपरक्‍लस्टर) शोध लावण्यात पुण्यातील ‘आयुका’ आणि ‘आयसर’ या संशोधन संस्थांतील शास्त्रज्ञांच्या टीमला यश आले आहे. ‘स्लोअन डिजिटल स्काय सर्वे’च्या आधारे हा शोध लावण्यात आला.

सरस्वती या दीर्घिका समूहात एकाच वेळी हजारो दीर्घिकांच्या समावेश आहे. त्यातील कित्येक आपल्या आकाशगंगेच्या आकाराहून प्रचंड मोठ्यादेखील आहेत. रेवती नक्षत्राच्या दिशेने हा समूह स्थित आहे. 

भारतीय शास्त्रज्ञांचे पथक गेली पंधरा वर्षे या दीर्घिका समूहाविषयी माहिती मिळवीत होते. अखेरीस या समूहाचे स्थान, त्याची रचना आणि पृथ्वीपासूनचे अंतर निश्‍चित झाल्यावर हा शोध जाहीर करण्यात आला. 

विश्वात अशा प्रकारच्या प्रचंड आकाराच्या खगोलीय रचनेचा शोध ही एक दुर्मिळ खगोलीय घटना असून, भारतातर्फे असा शोध प्रथमच लावण्यात आला आहे.

आयुका आणि आयसर सोबतच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (जमशेदपूर) आणि न्यूमन कॉलेज (केरळ) येथील शास्त्रज्ञ या शोधात सहभागी आहेत. 

अमेरिकन अस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या ‘द अस्ट्रॉफीजिकल जर्नल’ या मानाच्या नियतकालिकाच्या येत्या अंकात हा संशोधन प्रबंध छापून येणार आहे. आयुकाचे शास्त्रज्ञ जॉयदीप बागची हे त्याचे प्रमुख लेखक असणार आहेत.