शिवाजीराव पाटील यांचे निधन
माजी मंत्री व शिरपूर साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पद्मभूषण शिवाजीराव गिरधर पाटील (वय ९२) यांचे शनिवारी पहाटे मुंबई येथील लीलावती रुग्णालयामध्ये निधन झाले. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे ते वडील होत.


शिवाजीराव पाटील यांचा जन्म डांगरी (ता. अमळनेर, जि. जळगाव) येथे झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले होते. ज्येष्ठ बंधू उत्तमराव पाटील, वहिनी लीलाताई पाटील यांच्यासह विविध क्रांतिकार्यात ते सहभागी झाले. त्यांनी तुरुंगवासही भोगला. 

स्वातंत्र्यानंतर ते प्रजा समाजवादी पक्षात काम करू लागले. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या आग्रहाने ते कॉंग्रेसमध्ये गेले. शिरपूर तालुक्‍याचे दोनदा आमदार, वीज, पाटबंधारे व राजशिष्टाचार राज्यमंत्री, सहकारमंत्री, राज्यसभा सदस्य, अशी विविध पदे त्यांनी भूषवली. 

1982 मध्ये शिरपूर साखर कारखान्याची स्थापना त्यांनी केली. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय सल्लागार म्हणून ते ओळखले जात. पद्मभूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. 

12 वर्षे मंत्रिपद भूषविलेले शिवाजीराव पाटील 1960 ते 1967 या काळात विधान परिषदेचे सदस्य होते. 1967 ते 1980 या काळात ते विधानसभेवर निवडून गेले. 1992 ते 1998 या काळात ते राज्यसभेवरही गेले होते.



ज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर. राव यांचे निधन
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अवकाश संशोधक व भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष यू.आर. राव यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. 

भौतिक संशोधनातील सर्वोच्च संस्था असलेल्या इस्रोच्या शासकीय समितीचे अध्यक्ष म्हणून राव कार्यरत होते. तसेच, ते तिरुअनंतपुरम येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कुलगुरूही होते. 

विदेशी विद्यापीठांमध्येही त्यांनी काम केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहा पुरस्कार आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 



इस्त्रोकडून 29 नॅनो उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण :
भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या अँट्रीक्सने 14 देशांच्या 29 नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून 61 लाख युरोंची कमाई केली आहे. मागच्या चारवर्षात अँट्रीक्सने परदेशी उपग्रहाच्या प्रक्षेपणातून 1 कोटी 57 लाख युरोची कमाई केली आहे. 


2017 सालच्या पहिल्या सहा महिन्यात इस्त्रोने 130 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. इस्त्रोने जे परदेशी उपग्रह प्रक्षेपित केले ते आकाराने छोटे होते. 

सध्या भारतीय उपग्रहांचे प्रक्षेपण ही इस्त्रोची पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे प्रक्षेपकांमध्ये जी अतिरिक्त जागा उरते ती परदेशी उपग्रहांसाठी राखून ठेवली जाते. याच अतिरिक्त जागेतून अँट्रीक्स नफा कमवत आहे. 

इस्त्रोने अलीकडे कार्टोसॅट-2 उपग्रहाचे प्रक्षेपण केले. यावेळी प्रक्षेपकामध्ये कार्टोसॅट मुख्य प्रवाशी तर, अन्य परदेशी उपग्रह सहप्रवासी होते. 
ऑस्ट्रीया, चिली, बेल्जियम, फ्रान्स, फिनलँड, झेक प्रजासत्ताक, जर्मनी, इटली, अमेरिका, लाटीवा, स्लोव्हाकिया आणि यूके या देशांचे नॅनो उपग्रह होते.

पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेइकलच्या (पीएसएलव्ही) माध्यमातून एकाचवेळी 28 देशांचे 209 उपग्रह अवकाशात सोडण्याचा विक्रम इस्रोच्या नावावर आहे.  इस्रोने 23 जून रोजी पीएसएलव्ही सी 38 च्या मदतीने कार्टोसेट-2 मालिकेतील उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. 

तर 2013 ते 2015 या कालावधीत इस्रोने 600 कोटींची कमाई केली आहे



झेलियांग यांनी नागालँड विधानसभेत विश्वासमत मिळवले
नागालँडचे नवे मुख्यमंत्री टी. आर. झेलियांग यांनी नागालँड विधानसभेत विश्वासमत मिळवले आहे. 60 सदस्यांच्या सभागृहात झेलियांग यांनी 47 मते जिंकली. ते नागा पीपल्स फ्रंट (NPF) पक्षाचे नेते आहेत.



अनिवार्य शिक्षण (सुधारणा) विधेयक, 2017 लोकसभेत मंजूर
अनिवार्य शिक्षण (सुधारणा) विधेयक, 2017 लोकसभेत मंजूर करण्यात आला आहे.

विधेयकानुसार, शिक्षणाचा अधिकार (RTE) कायदा लागू झाल्यानंतर नेमणुका करण्यात आलेल्या 8.5 लाख अपात्र शिक्षकांना पदवी प्राप्त करण्यासाठी मार्च 2019 पर्यंतची अंतिम मुदत निश्चित केली आहे. या मुदतीनंतर त्यांच्या नेमणुका रद्द करण्यात येतील.

2010 साली शिक्षणाचा अधिकार (RTE) कायदा देशात लागू झाला. कायद्यानुसार पदवी असणे ही प्रशिक्षित शिक्षकांच्या पात्रतेची अट ठेवण्यात आली आहे. त्यावेळी ही अट पूर्ण करण्यासाठी 5 वर्षांची मुदत दिली गेली होती. 

देशात सध्या खाजगी शाळेत 6 लाख शिक्षक आणि शासकीय शाळांमध्ये 2.5 लाख शिक्षक अपात्र आहेत.



महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताला उपविजेतेपद
मिताली राजच्या भारतीय महिला संघास इतिहास घडवण्यात आज अपयश आले. भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

मोक्‍याच्या वेळी  झूलन गोस्वामीने रचलेल्या पायावर मुंबईकर पूनम राऊतची कामगिरी भारतास विजयपथावर नेणार असेच वाटत होते. पण पूनमसह भारताच्या अखेरच्या सात फलंदाज २८ धावांत बाद झाल्या आणि भारतीय महिलांचा लॉर्डसवर स्वप्नभंग झाला.

इंग्लंडने खराब सुरवातीनंतर संयमाने खेळ केला. प्रथम फलंदाजी करताना त्यांना ५० षटकांत ७ बाद २२८ धावांची मजल शक्‍य झाली. 

भारताच्या डावाची खराब सुरवात करणाऱ्या श्रुबसोले हिने भारताच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिसकावून घेतला आणि भारतास नऊ धावांनी हार पत्करण्यास भाग पाडले. भारताच्या डावाला तिनेच २१९ धावांवर पूर्णविराम दिला



भारत ‘ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस 2017’ आयोजित करणार
नवी दिल्लीत 23-24 नोव्हेंबर 2017 रोजी पाचवी ‘ग्लोबल कॉन्फरन्स ऑन सायबर स्पेस 2017’ आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद ‘सायबर4ऑल: अॅन इंक्लूजिव, सस्टेनेबल, डेवलपमेंटल, सेफ अँड सिक्युअर सायबरस्पेस’ या संकल्पनेखाली भरवली जाईल.

ही प्रथमच GCCS ही आर्थिक सहकार आणि विकास संघटना (OECD) समूहातील देशांच्या बाहेर आणि भारतात घेतली जात आहे.

सायबर स्पेस विषयावरील जगातली सर्वात मोठ्या परिषदांमधील एक आहे. 2011 साली लंडनमध्ये प्रथम GCCS भरविण्यात आली होती.

 OECD ची स्थापना 1948 झाली असून त्याचे मुख्यालय पॅरिस, फ्रान्स येथे आहे आणि या समूहाचे 35 सदस्य राष्ट्रे आहेत.