दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे मुंबईत निधन
‘लीडर’, ‘हम हिंदुस्थानी’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शक राम मुखर्जी यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.


त्यांनी ६० च्या दशकात बनवलेले ‘लीडर’ आणि ‘हम हिंदुस्थानी’ हे चित्रपट चांगलेच चर्चेत आले होते. राणी मुखर्जीचा पहिला बंगाली चित्रपट ‘बाईर फुल’ याची निर्मितीही राम मुखर्जी यांनीच केली होती.

मुखर्जी यांनी दिलीपकुमार, वैजयंती माला यांना घेऊन ‘लीडर’ बनवला, तर राणी मुखर्जीला इंडस्ट्रीत ब्रेक देणारा ‘राजा की आयेगी बारात’ हा चित्रपट ही त्यांची निर्मिती होती. 

फिल्मालय स्टुडियोजच्या संस्थापकांपैकी राम मुखर्जी हे एक होते. त्यांनी हिंदीतच नव्हे, तर बंगाली भाषेतही चित्रपटांची निर्मिती केली होती. 



घोघा व दाहेज दरम्यान RO-RO फेरी सेवेच्या प्रथम टप्प्याचे उद्घाटन
पंतप्रधानांच्या हस्ते २२ ऑक्टोबर २०१७ रोजी गुजरातच्या भावनगर जिल्ह्यामधील घोघा (सौराष्ट्र) आणि दाहेज (दक्षिण गुजरात) या दरम्यान ६१५ कोटी रुपयांच्या ‘रोल ऑन, रोल ऑफ (RO-RO)’ फेरी (नौकेद्वारा प्रवास) सेवेच्या प्रथम टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले.

भावनगर आणि वडोदरा शहरांमधील रस्त्यावरील अंतर ३१० किलोमीटर आहे, मात्र या सेवेमुळे हे अंतर आता फक्त ३० किलोमीटर असेल. RO-RO प्रकल्पाची अंमलबजावणी गुजरात समुद्री मंडळाकडून करण्यात आली आहे.

‘रोल ऑन, रोल ऑफ (RO-RO)’ जहाजे कार, ट्रक, सेमी-ट्रेलर ट्रक्स, ट्रेलर आणि रेलरोड कार यासारख्या वाहनांची वाहतूक करण्यासाठी वापरली जातात. ‘लेविएथान’ ही जगातले पहिली आधुनिक ट्रेन (पाण्यावरून तरंगणारी) फेरी होती, जी १८४९ साली बांधण्यात आली.



भारताने आपले तिसरे हॉकी आशिया चषक जिंकले
भारतीय हॉकी संघाने ढाका (बांग्लादेश) मध्ये खेळल्या गेलेल्या ‘हॉकी आशिया चषक २०१७’ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. भारताने ही स्पर्धा तिसर्‍यांदा जिंकलेली आहे. यापूर्वी २००३ आणि २००७ साली ही स्पर्धा जिंकली होती.

स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय संघाने मलेशियावर मात केली. स्पर्धेत कोरियाचा पराभव करत पाकिस्तान संघाने स्पर्धेचे कांस्यपदक मिळवले.


हॉकी आशिया चषक ही आशियाई हॉकी महामंडळाद्वारे आयोजीत केली जाणारी आशियामधील एक आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे. ही स्पर्धा पहिल्यांदा १९८२ साली खेळली गेली. या स्पर्धेत सध्या १६ संघांचा सहभाग असतो.



विराट कोहलीचे ३१ वे शतक करत
टीम इंडियाचा कर्णधार आणि फलंदाज विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय (ODI) सामन्यात आपल्या कारकिर्दीतले ३१ वे शतक पूर्ण करत सर्वाधिक शतकांचा किताब मिळवणार्‍या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले.

यासोबतच कोहलीने पूर्वी दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगला मागे टाकले. रिकी पाँटिंगच्या नावे ३० शतके आहेत. यादीत पहिल्या स्थानी ४९ शतकांसह सचिन तेंडुलकर आहे.

मुंबईत खेळल्या जात असलेल्या भारत-न्यूझीलँड तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या पहिल्याच दिवशी न्यूझीलँडविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी करताना विराटने आपले ३१ वे शतक पूर्ण केले.


जपानमधील निवडणुकीत शिन्जो आबे यांच्या पक्षाचा विजय 
जपानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान शिन्जो आबे यांच्या सत्तारूढ युतीचा विजय झाला आहे. या विजयासोबतच आबे यांना जपानचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवलेले नेते म्हणून हा मान मिळू शकतो.

आबे यांच्या लिबरल डेमॉक्रॅटिक पक्षासह असलेल्या युतीने संसदेच्या कनिष्ठ सभागृहातील ४६५ जागांपैकी दोन तृतीयांश जागांनी बहुमताने आपली आघाडी राखली. 

हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव या सभागृहात चार वर्षासाठी सदस्यांची निवड करण्यासाठी जपानमधील ही ४८ वी सार्वत्रिक निवडणूक होती.

जपान हा आशिया खंडातला चार मोठ्या आणि अनेक छोट्या बेटांचा एक समूह देश आहे. ही बेटे प्रशांत महासागर प्रदेशात आहेत. या देशात बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म आहे. या देशाची राजधानी टोकियो शहर असून या देशाचे चलन जापानी येन हे आहे.



संयुक्त राष्ट्रसंघ दिवस – २४ ऑक्टोबर 
१९४८ पासून दरवर्षी २४ ऑक्टोबरला ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिवस’ (United Nations Day) साजरा केला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाची सनद प्रभावी करण्यात आलेल्या घटनेला आज ७२ वर्षे पूर्ण झाली आहेत.

दरवर्षी UN कडून निरनिराळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. 
यावर्षी, संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत ‘पोटेन्शीयल इन डायवर्सिटी’ या संकल्पनेखाली कॉन्सर्ट आयोजित केले गेले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने १९७१ साली ठराव २७८२ चा अवलंब करीत २४ ऑक्टोबर हा ‘संयुक्त राष्ट्रसंघ दिवस’ म्हणून जाहीर केला. हा दिवस २० ते २६ ऑक्टोबर दरम्यान पळण्यात येणार्‍या संयुक्त राष्ट्रसंघ सप्ताह (United Nations Week) चा एक भाग आहे. 

१९४५ साली UN सनद (UN Charter) (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात आले. याला सुरक्षा परिषदेचे मूळ ५ कायमचे सदस्य (चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका) आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली.

स्थापनेच्या वेळी संयुक्त राष्ट्रसंघाची ५१ सदस्य राष्ट्रे होती. ही संख्या आता १९३ झालेली आहे. 

संघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्काला प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.संयुक्त राष्ट्रसंघ (UN) ही आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देणारी एक आंतरशासकीय संस्था आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद ‘सरचिटणीस’ हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगीज अँटोनियो गुटेरस यांच्याकडे आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या ६ अधिकृत भाषा आहेत (अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश).

संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ :-
०१. UN महासभा (General Assembly)
०२. UN सुरक्षा परिषद (Security Council)
०३. UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC)
०४. UN सचिवालय
०५. UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) 
०६. UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).

संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था:-
जागतिक बँक समूह
जागतिक आरोग्य संघटना (WHO)
द वर्ल्ड फूड प्रोग्राम
संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)
संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (United Nations Children’s Fund –UNICEF)