चालू घडामोडी २९ जानेवारी २०१८

चालू घडामोडी २९ जानेवारी २०१८

शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक 
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित संचलनात महाराष्ट्राने सादर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला. 


प्रा. नरेंद्र विचारे यांची संकल्पना व कलादिग्दर्शक नितीन सरदेसाई यांनी साकारलेल्या या चित्ररथाने संचलनावेळी सर्वांची मने जिंकली होती. 

वर्ष २०१५ मध्ये महाराष्ट्राने सादर केलेल्या पंढरीची वारी या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला होता. आता दोन वर्षांनंतर महाराष्ट्राला पुन्हा एकदा हा सन्मान मिळाला. 
राजपथावर १४ राज्यांसह केंद्र सरकारच्या ७ खात्यांचे आणि भारत-आशियान राष्ट्रांचे संबंध दाखवणारे २ चित्ररथ असे एकूण २३  चित्ररथ सादर करण्यात आले होते.

चित्ररथाच्या सुरुवातीला किल्ल्याची प्रतिकृती होती त्यावर मधोमध शिवरायांची अश्वारुढ प्रतिकृती दर्शवण्यात आली होत. तर मध्यभागी रायगडाची प्रतिकृती व त्या ठिकाणच्या मेघडंबरीत सिंहासनावर छत्रपती शिवराय विराजमान झालेले दाखवले होते. 

या ठिकाणी आभूषण देणारा दरबारी, त्याच्या शेजारी गागाभट्ट, तर या राज्याभिषेकासाठी उपस्थित असलेला इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिजन दाखवण्यात आले होते. दरबारात छत्रपती शिवरायांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजे दाखवण्यात आले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शवण्यात आल्या होत्या. 

प्रथम क्रमांक पटकावण्याची हॅटट्रिक करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
यापूर्वी १९९२ ते १९९५ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला होता. 



आध्यात्मिक गुरु सिद्धेश्वर स्वामींनी नाकारला ‘पद्मश्री’
कर्नाटकातील विजयपूर येथील ‘ज्ञान योगाश्रम’ चे आध्यात्मिक गुरु सिद्धेश्वर स्वामी यांना जाहीर झालेला यंदाचा ‘पद्मश्री’ किताब त्यांनी नाकारला आहे. 

यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले असून आपण सन्यासी असल्याने हा प्रतिष्ठित पुरस्कार स्विकारता येणार नाही असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, २०१५ मध्ये बॉलिवूडचे प्रसिद्ध लेखक सलीम खान यांनी पद्मश्री पुरस्कार नाकारला होता. 



जागतिक नारळ उत्पादन आणि उत्पादन क्षमतेत भारत आघाडीवर
जगात नारळाचे उत्पादन घेणारा आणि उत्पादन क्षमतेत भारत आघाडीवर असून प्रथम क्रमांकावर आहे.

देशात वार्षिक नारळाचे उत्पादन २०.८२ लक्ष हेक्टरमध्ये २३९५ कोटी नारळ आहे आणि उत्पादन क्षमता प्रति हेक्टर ११५०५ नारळ आहे. देशाच्या सकल देशांतर्गत उत्पन्नात नारळाचे योगदान सुमारे २७९०० कोटी रुपये आहे. वर्ष २०१६-१७ मध्ये देशामधून २०८४ कोटी रुपये किंमतीच्या नारळासंबंधी उत्पादनांची निर्यात केली गेली.

केंद्रीय कृषी मंत्रालय बिहारमध्ये नारळ विकास मंडळाच्या प्रमुख योजनांमधून नारळाचे उत्पादन, उत्पादन क्षमता, त्यावर प्रक्रिया, मूल्यवर्धन, विपणन व निर्यात वाढविण्यावर भर देत आहे.



दिल्ली संघाने क्रिकेटमधील सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकला
दिल्ली संघाने राजस्थान संघाचा पराभव करत राष्ट्रीय क्रिकेट जगतातला प्रथमच सय्यद मुश्ताक अली करंडक जिंकलेला आहे.

सय्यद मुश्ताक अली करंडक ही भारतामधली ट्वेंटी-२० क्रिकेट देशांतर्गत स्पर्धा आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) द्वारे आयोजित ही स्पर्धा रणजी करंडकमधून आलेल्या विजेत्या संघांमध्ये खेळली जाते. 

२००८-०९ हंगामात ही स्पर्धा पहिल्यांदा खेळली गेली. या स्पर्धेचे नाव प्रसिद्ध भारतीय क्रिकेटर सय्यद मुश्ताक अली यांच्या नावावरून ठेवले गेले आहे.


भारत आणि कंबोडिया यांच्यात चार करार
भारत आणि कंबोडिया यांच्या दरम्यान चार सामंजस्य करारांवर स्वाक्षर्‍या करण्यात आल्या.

भारतीय EXIM बँक आणि कंबोडिया सरकार यांच्या दरम्यान ‘स्टंग स्व हाब जलस्त्रोत विकास प्रकल्प’ ला $369.2 लक्ष ची आर्थिक मदत करण्याकरिता पतमर्यादेसाठी (Line of Credit) करार

दोन्ही देशांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदानाला वाढविण्यास आणि मैत्री संबंधनना भक्कम करण्यासाठी लक्षित वर्ष २०१८-२०२२ या कालावधीसाठी एक सांस्कृतिक आदानप्रदान कार्यक्रमासाठी करार

दोन्ही देशांमध्ये फौजदारी प्रकरणांमध्ये परस्पर विधी संदर्भात सहकार्य करार

मानवी तस्करीला प्रतिबंध करण्यासाठी सहकार्यासाठी सामंजस्य करार

कंबोडियाचे पंतप्रधान हुन सेन भारत-ASEAN शिखर परिषदेसाठी भारत दौर्‍यावर असताना हे करार करण्यात आले.

कंबोडिया (पूर्वीचे कंपूचिया) हा दक्षिण पूर्व आशियातला एक प्रमुख देश आहे. नामपेन्ह हे देशाचे राजधानी शहर आहे आणि कंबोडियन रिएल हे देशाचे चलन आहे.



जुआन ऑरलँडो हर्नांडेज होंडुरास देशाचे नवे राष्ट्रपती
जुआन ऑरलँडो हर्नांडेज यांनी होंडुरास देशाच्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे.

४९ वर्षीय हर्नांडेज यांचा राष्ट्रपती पदावरचा दुसरा कार्यकाळ आहे. ते वकील आहेत आणि पुन्हा निवडून येणारे ते होंडुरासचे पहिले राष्ट्रपती आहेत.

देशाच्या १९८२ सालच्या संविधानाने राष्ट्रपतीच्या नव्या कार्यकाळासाठी प्रतिबंधित केलेले आहे. रूढीवादी राजकारण्यांनी २००९ साली याबाबत हर्नांडेजचा विरोध केला होता, परंतु २०१५ साली देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने हर्नांडेझ यांच्या बाजूने निर्णय दिला.

होंडुरास हा मध्य अमेरिका खंडात स्थित एक देश आहे, ज्याला उत्तरेस कॅरिबियन समुद्राची आणि दक्षिणेस प्रशांत महासागराची किनारपट्टी लाभलेली आहे. टेगुसिगल्पा हे देशाचे राजधानी शहर आहे आणि होंडुरन लंपिरा हे देशाचे चलन आहे.



ख्यातनाम कृषी वैज्ञानिक गुरुचरन सिंह कालकट यांचे निधन
पंजाबचे ख्यातनाम कृषी वैज्ञानिक डॉ. गुरुचरन सिंह कालकट यांचे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.

डॉ. कालकट १९५० आणि १९६० च्या दशकात पंजाबमधील हरित क्रांतीचे जनक तर होतेच शिवाय अन्नधान्यच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. 

ते पंजाब राज्य शेतकरी आयोगाचे संस्थापक अध्यक्ष आणि पंजाब कृषी विद्यापीठ (लुधियाना) चे माजी उपकुलगुरू होते. 

त्यांना १९८१ साली पद्म श्री तर २००७ साली पद्म भूषण ने सन्मानित करण्यात आले. त्यांनी जागतिक बँकमध्ये एक ज्येष्ठ कृषितज्ञ म्हणून काम केले होते.
Scroll to Top