चालू घडामोडी २६ मार्च २०१८

चालू घडामोडी २६ मार्च २०१८

भाजपा राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष 
भाजपासाठी २३ मार्च हा दिवस विशेष ठरला आहे. या दिवशी पक्षाने राज्यसभेच्या १२ जागा जिंकल्याआहेत. या विजयामुळे भाजपा आता राज्यसभेतील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. 


राज्यसभेच्या ७ राज्यातील २६ जागांसाठी मतदान झाले होते. यापैकी १२ जागांवर कमळ फुलले आहे. 
आता भाजपाचे राज्यसभेत ७३ खासदार झाले आहेत



काटेरी फणस बनले केरळचे राज्यफळ 
काटेरी आणि अवजड असूनही आतमध्ये गोड रसाळ गरे असणाऱ्या फणसाला नुकतेच केरळच्या राज्यफळाचा मान मिळाला आहे. या राज्यात होणारे फणसाचे उत्पादन आणि निर्यात यावरुन हा मान बहाल करण्यात आला आहे.

राज्याचे कृषिमंत्री व्ही.एस. सुनीलकुमार नुकतीच या गोष्टीची विधानसभेत ही घोषणा केली. ते म्हणाले, केरळमध्ये दरवर्षी ३० ते ६० कोटींहून अधिक फणसांचे उत्पादन होते. हे उत्पादन संपूर्णपणे सेंद्रिय खतांचा वापर करुन कोणतीही कटकनाशके न वापरता केलेले असते.

केरळचा फणस आणि त्यापासून बनविलेल्या उत्पादनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी येत्या काळात विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. या सर्व व्यवहारातून सुमारे १५ हजार कोटी रुपयांची उलाढाल अपेक्षित आहे.

तसेच फणसाबरोबर या राज्यातील केळी आणि अननसही परदेशात मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात. फणसाला राज्याचे फळ म्हणून मान देणारे केरळ हे पहिले राज्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.



तेलंगणामध्ये तेलगू भाषा शालेय शिक्षणात अनिवार्य 
तेलंगणा राज्य विधानसभेत राज्य भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी एक विधेयक मंजूर करण्यात आले आहे, ज्यामधून राज्यातील सर्व शाळांमध्ये तेलगू शिक्षण आणि तेलगू भाषेचा अभ्यासक्रम अनिवार्य करण्यात आला आहे.

‘तेलंगणा (शाळेत तेलगूचे अनिवार्य शिक्षण व शिकवणी) विधेयक-२०१८’ याला सर्व पक्षाच्या सभासदांकडून एकमताने संमत करण्यात आले.

हा कायदा शैक्षणिक सत्र २०१८-१९ पासून राज्यात इयत्ता पहिली ते इयत्ता दहावीपर्यंतच्या शिक्षणात तेलगूचा समावेश करण्यासाठी लागू करण्यात येणार आहे.


क्रेम पुरी: मेघालयात जगातली सर्वात लांब वालूकामिश्रित दगडांची गुहा 
मेघालयात ‘क्रेम पुरी’ नामक २४५८३ मीटर लांबीची जगातली सर्वात लांब वालूकामिश्रित दगडांची गुहाआढळून आली आहे.

२०१६ साली क्रेम पुरीचा शोध घेण्यात आला. या गुहेची मोजणी ५ फेब्रुवारी आणि १ मार्च २०१८ या काळात करण्यात आली. ही भूमिगत गुहा ईदो ज्यूलिया (व्हेनेज्युएला) येथील विक्रमी नोंद असलेल्या ‘क्यूवा डेल समन’ नामक गुहेपेक्षा ६००० मीटर अधिक लांब आहे. 

गुफेत डायनासोरचे जीवाश्म सापडले आहेत, जे ६६-७६ दशलक्ष वर्षांपूर्वी पृथ्वीवर अस्तित्वात होते.

या गुफेचे मोजमाप मेघालय एडव्हेंचरर्स असोसिएशन (MAA) द्वारे केले गेले. ही सामान्य श्रेणीत भारतातली दुसरी सर्वात लांब गुफा ठरली आहे. मेघालयच्या जैंतिया पर्वतांमध्ये भारतातली सर्वात लांब गुहा क्रेम लिएट प्राह-उमीम-लॅबिट प्रणाली आहे.



राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये उद्घाटनात पी. व्ही. सिंधू भारतीय पथकाचे नेतृत्व करणार 
४ एप्रिल २०१८ पासून ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट येथे सुरू होत असलेल्या ‘२०१८ राष्ट्रकुल क्रीडा’ स्पर्धांमध्ये भारतीय पथकाचे नेतृत्व बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू हिच्याकडे देण्यात आले आहे.

उद्घाटन प्रसंगी स्वागत सोहळ्यात सिंधू भारतीय ध्वज हातात घेऊन पथसंचलनात भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहे.



पंकज अडवाणी ‘२०१८ आशियाई बिलियर्ड्स’चा विजेता 
पंकज अडवाणीने अंतिम फेरीत बी. भास्करवर मात करत ‘२०१८ आशियाई बिलियर्ड्स’ अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

म्यानमारच्या यांगोन शहरातील या विजयासह अडवाणीने आपले विजेतेपद यंदाही कायम राखले आहे. हे त्याचे अकरावे विजेतेपद आहे. या विजयामुळे अडवाणी सन २०१७-१८ साठी बिलियर्डमध्ये भारतीय, आशियाई व विश्वविजेता ठरला आहे.


महिलांच्या आशियाई स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अमी कमानीने थायलंडच्या सिरिपापोर्न नुयांथखांजन हिचा पराभव करत विजेतेपद जिंकले.
Scroll to Top