चालू घडामोडी २० मे २०१८

चालू घडामोडी २० मे २०१८

अतानु चक्रवर्ती DIPAM चे नवे सचिव 
केंद्र सरकारने IAS अधिकारी अतानु चक्रवर्ती यांची गुंतवणूक व सार्वजनिक संपदा व्यवस्थापन (DIPAM) येथील नवीन सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. 


सध्या चक्रवर्ती पेट्रोलियम मंत्रालयातील हायड्रोकार्बन्स विभागाचे महासंचालक आहेत. ३० एप्रिल रोजी निवृत्त झालेल्या नीरज कुमार गुप्ता यांच्यानंतर चक्रवर्ती पदभार सांभाळणार आहेत.



अनिल कुमार झा कोल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक 
कोल इंडिया लिमिटेडचे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD) पदी अनिल कुमार झा यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अनिल कुमार झा सन २०१५ पासून महानदी कोलफील्ड्स लिमिटेडचे (MCL) CMD आहेत. त्यांची ३१ जानेवारी २०२० रोजी त्यांच्या निवृत्तीपर्यंत या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

कोल इंडिया लिमिटेड ही भारत सरकारची कोळसा खाणीकर्मातली कंपनी आहे आणि जगातली सर्वात मोठी कोळसा उत्पादक कंपनी आणि एक महारत्न कंपनी आहे. कोलकाता (पश्चिम बंगाल) येथे याचे मुख्यालय आहे.



शिवांगी पाठक: एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला 
भारताची शिवांगी पाठक या १६ वर्षीय मुलीने जगातले सर्वात उंच माउंट एवरेस्टचे शिखर (२९००० फुट) सर करून नवा इतिहास रचला आहे. ती एव्हरेस्ट सर करणारी सर्वात तरुण भारतीय महिला बनली आहे. 

हरियाणाच्या शिवांगी पाठकने ‘सेव्हन समिट ट्रेक’ मोहिमेमधून हा यशोमान साध्य केला आहे.

‘सेव्हन समिट’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या मोहिमेत दक्षिण अमेरिकाचे अकांकागुवा, आफ्रिकेचे किलिमंजारो, ऑस्ट्रेलियाचे कार्सटेंसज पिरामिड, यूरोपचे एल्ब्रस, उत्तर अमेरिकेचे डेनाली आणि नेपाळचे एव्हरेस्ट ही सात पर्वतशिखरे सर केली जातात.



कावेरी व्यवस्थापन योजनेच्या मसुद्याला सर्वोच्च न्यायालयाची मंजूरी 
सर्वोच्च न्यायालयाने कावेरी नदीच्या तीरावर वसलेल्या कर्नाटक, तामिळनाडू, केरळ आणि पुदूचेरी यांच्यात न्यायपूर्ण पाणी वाटपासाठी कावेरी व्यवस्थापन योजनेसाठी केंद्र शासनाच्या मसुद्याला मंजूरी देण्यात आली आहे.

भारताचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही मंजूरी दिली. आता न्यायालयाच्या १६ फेब्रुवारीच्या निर्णयानुसार ६ आठवड्यांच्या आत कावेरी व्यवस्थापन योजना तयार करावी लागणार, ज्यामध्ये कावेरी व्यवस्थापन मंडळ देखील समाविष्ट असेल.

कर्नाटकातील तळकावेरीत उगम पावणारी कावेरी नदी ३२२ किलोमीटर प्रवास करून तमिळनाडूत प्रवेश करते. तमिळनाडूत ४८३ किलोमीटर अंतर प्रवास करून बंगालच्या उपसागरास मिळते. कावेरी नदी कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांसाठी पाण्याची पूर्तता करण्यासाठी एक प्रमुख स्त्रोत आहे.


केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाकडून व्यापार उपाय महासंचालनालयाची स्थापना 
वाणिज्य विभागाने वाणिज्य व उद्योग मंत्रालयात व्यापार उपाय महासंचालनालयाच्या (Directorate General of Trade Remedies -DGTR) स्थापनेसाठी अधिसूचना जाहीर केली आहे.

DGTR अॅंटी-डंपिंग, प्रतिवाद शुल्क आणि सुरक्षा उपाययोजना सहित व्यापारासंबंधी समस्यांना सोडविण्यासाठी सर्व उपायांना लागू करण्याचे सर्वोच्च राष्ट्रीय प्राधिकरण असणार. 

अॅंटी-डंपिंग व संबंधित शुल्क महासंचालनालय (DGAD), सुरक्षा महासंचालनालय (DGS) आणि DGFT च्या सुरक्षा क्रियाकलाप (QR) ला मिळून राष्ट्रीय प्राधिकरण DGTR अंतर्गत आणले जाणार.

भारत सरकार (व्यापार वाटप) नियम-१९६१ मध्ये करण्यात आलेल्या दुरुस्तीनंतर वाणिज्य विभागात DGTRची स्थापना करण्यात आली आहे. DGTR भारतामधील उद्योग आणि निर्यातकांना दुसर्‍या देशांद्वारे त्यांच्या विरोधात तपासांच्या वाढत्या घटनांना सामोरे जाण्यामध्ये व्यापार सुरक्षा मदत देखील उपलब्ध करून देणार.



पार्सल कार्गो एक्सप्रेस ईशान्य क्षेत्राला पश्चिमेशी जोडणारी मालवाहू ट्रेन 
ईशान्य सीमावर्ती रेल्वेने ईशान्य क्षेत्रातल्या उद्योगांना सशक्त बनविण्यासाठी आणि तेथील उत्पादनांना पश्चिमेकडे पोहचविण्यासाठी विशेष पार्सल कार्गो एक्सप्रेस सुरू करण्यात आली आहे.

ही ट्रेन एका महिन्यात दोनदा धावणार. ६ वर्षांच्या करारावर ही ट्रेन आसामच्या न्यू गुवाहाटीपासून ते महाराष्ट्रच्या कल्याण या दरम्यान धावणार आहे.

या ट्रेनच्या माध्यमातून शेतकरी चहा, सुपारी, अननस, ज्यूट, बागायती उत्पादने आणि बेताचे फर्निचर यासारख्या उत्पादनांना मुंबई, बेंगळुरू, नागपूर आणि पुणे आदी येथील किरकोळ बाजारपेठांमध्ये विकू शकणार. अश्याप्रकारची एकच ट्रेन ५२ ट्रकांच्या समरूप मालाची ने-आण करू शकते.



जीना हास्पेल यांची सीआयएच्या संचालकपदी नियुक्ती
अमेरिकेतील गुप्तचर संस्था सीआयएच्या संचालकपदी प्रथमच जीना हास्पेल या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे. वादग्रस्त पार्श्वभूमी असतानाही हास्पेल यांची निवड करण्यात आली आहे.

९/११ च्या अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर कैद्यांच्या चौकशीसाठी सीआयएकडून वॉटरबोर्डिंगसारख्या अतिशय क्रूर पद्धती वापरण्यात आल्या होत्या, त्यातील सहभागामुळे हास्पेल या वादग्रस्त ठरला आहेत.

सीआयएच्या संचालकपदावर हास्पेल यांच्या नियुक्तीवर सिनेटने १७ मे रोजी ५४  विरुद्ध ४५ मतांनी शिक्कामोर्तब केले.

मानवाधिकारांसाठी काम करणाऱ्या संस्था आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या संसद सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला विरोध केला होता. मात्र, मतदानावेळी सहा डेमोक्रॅटिक सदस्यांनी हास्पेल यांच्या नियुक्तीला पाठिंबा दिला.

हास्पेल यांच्या नियुक्तीनंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे ट्विटरवर अभिनंदन केले आहे. सीआयएच्या ७० वर्षांच्या इतिहासात संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती होणाऱ्या हास्पेल या पहिल्याच महिला आहेत.
Scroll to Top