चालू घडामोडी २१ मे २०१८

चालू घडामोडी २१ मे २०१८

किशनगंगा जलविद्युत केंद्र देशाला समर्पित
२० मे २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किशनगंगा जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले आहे.


BHEL ने जम्मू-काश्मिरमध्ये NHPC च्या बंदीपोरा जिल्ह्यातील झेलममध्ये किशनगंगा नदीवरील ३३० मेगावॉट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाला कार्यरत केले आहे.



सोळाव्या वर्षी सर केलं माउंट एव्हरेस्ट 
जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणे कसलेल्या गिर्यारोहकालाही आव्हानात्मक असते. मात्र, अवघ्या १६ वर्षांच्या शिवांगी पाठक हिने जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट सर करुन इतिहास घडवला आहे.

एव्हरेस्ट सर करणाऱ्या सर्वात तरुण महिलांच्या यादीत तिचा समावेश झाला.


दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचं शिवांगीने सांगितलं तर अरुणिमा सिन्हा या माउंट एव्हरेस्टवर तिरंगा फडकावणाऱ्या जगातील पहिल्या दिव्यांग गिर्यारोहक आहेत.



भारताच्या ‘ग्रीन गुड डीड्स’ चळवळीने जागतिक ओळख प्राप्त केली 
भारत सरकारने चालवलेल्या ‘ग्रीन गुड डीड्स’ चळवळीला आता जागतिक ओळख मिळाली आहे आणि वैश्विक समुदायाकडून याला स्वीकारले गेले आहे.

डर्बन (दक्षिण आफ्रिका) येथे झालेल्या ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका (BRICS) देशांच्या पर्यावरण मंत्र्यांच्या परिषदेत सर्वांनी हवामान बदलाविषयी जागृती निर्माण करणार्‍या या चळवळीत भाग घेण्यासाठी त्यांची सहमती दर्शवलेली आहे.


भारत सरकारच्या केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्यावतीने ३ फेब्रुवारी २०१८ रोजी ‘ग्रीन गुड डीड्स (चांगली हरित कार्ये)’ अभियानाचा शुभारंभ केला गेला. 

‘ग्रीन गुड डीड्स’ अभियानांतर्गत लोकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये विशेषताः हवामान बदल आणि वैश्विक तापमानवाढ अश्या विषयावर जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.



रशियाचे ‘एकेडेमिक लोमोनोसोव्ह’ : जगातले सर्वात पहिले तरंगते अणुऊर्जा केंद्र 
रशियाने प्रथमच एक तरंगते अणुऊर्जा निर्मिती केंद्र एका जहाजावर उभे केले आहे आणि हा प्रकल्प जगातला पहिला असा आहे.

या तरंगत्या प्रकल्पाला ‘एकेडेमिक लोमोनोसोव्ह’ हे नाव देण्यात आले आहे. ही अभिनव संकल्पना रशियाच्या ‘रोसेटोम’ या अणुऊर्जा कंपनीने साकारली आहे. याची उभारणी सेंट पीटर्सबर्गमध्ये केली गेली.

या अणुऊर्जा संयंत्राचा आकार १४४ मीटर x ३० मीटर असा असून हा २१००० टन वजनी आहे. यामध्ये ३५ मेगावॉटचे दोन रिएक्टर आहेत, जे २ लक्ष लोकसंख्या असलेल्या शहराला वीज पुरवठा करण्यास सक्षम आहेत. 

दुर्गम भागात वायू व तेल उत्खनन मंचांना वीज दिली जाऊ शकणार. या रिएक्टरच्या मदतीने वर्षाला ५० हजार टन कार्बन-डायऑक्साइडचे उत्सर्जन टाळले जाऊ शकते.


‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ म्हणून विद्यापीठाचा नामविस्तार 
सोलापूर विद्यापीठाचा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

३१ मे २०१८ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाकडून विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात येणार आहे.

अहिल्याबाई होळकर (१७२५-१७९५) या एक उत्तम राजकर्त्या होत्या आणि त्या माळवा राज्याच्या राणी होत्या. त्या राजमाता अहिल्यादेवी होळकर म्हणून लोकप्रिय होत्या आणि त्यांचा जन्म १७२५ साली महाराष्ट्रातील चोंडी गावात झाला



इराकच्या पहिल्या संसदीय निवडणुकीत मौलवी मोक्तदा अल-सद्र विजयी 
डिसेंबर २०१७ मध्ये इस्लामिक स्टेटला पराजित केल्यानंतर इराकमध्ये प्रथमच संसदीय निवडणूक घेतली गेली होती. यात शिया मौलवी मोक्तदा अल-सद्र यांच्या नेतृत्वात असलेल्या युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.

सद्र यांच्या युतीने ५४ जागा जिंकल्या. यामध्ये अल-सद्र यांचा पक्ष इस्तिकामा आणि कम्युनिस्ट पक्षासोबत सहा अन्य समूहांचा समावेश आहे. 

देशाचे वर्तमान पंतप्रधान हैदर अल-अबादी ४२ जागांसह तिसर्‍या क्रमांकावर आहेत. मात्र सद्र या निवडणुकीत उभे नव्हते त्यामुळे ते पंतप्रधान नसतील.



कान्स: ‘शॉपलिफ्टर्स’ या जपानी चित्रपटाला पाल्म डी’ओर सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार 
फ्रांसमध्ये ७१ व्या कान्स चित्रपट महोत्सवात जपानी निर्देशक हिरोकाजू कोर-एडा यांना ‘पाल्म डी’ओर सर्वोत्कृष्ट चित्रपट’ हा कान्सचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे. कोर-एडा यांच्या ‘मैनबिकी काजोकू (शॉपलिफ्टर्स)’ या चित्रपटासाठी हा पुरस्कार दिला गेला आहे.

ग्रां प्री पुरस्कार – स्पाइक ली यांच्या ‘ब्लॅककॅन्समॅन’ या नाट्यचित्रपटासाठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट निर्देशक – पोलंडच्या पावेल पावलिकोवस्की यांना ‘कोल्ड वॉर’ चित्रपटासाठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेता – इटलीचा अभिनेता मार्सेलो फोंते याला ‘डॉगमॅन’ चित्रपटासाठी पुरस्कार

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कजाकिस्तानची अभिनेत्री सामल येस्लियामोवा हिला ‘आइका’ चित्रपटासाठी पुरस्कार
Scroll to Top