चालू घडामोडी ७ जानेवारी २०१९

चालू घडामोडी ७ जानेवारी २०१९

विद्यार्थ्यांनी बनवली देशातील पहिली विनाचालक सौर उर्जेवरील बस 

पंजाबच्या ‘लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी’च्या (एलपीयू) विद्यार्थ्यांनी देशातील पहिली स्मार्टबस बनवली आहे. ही बस केवळ सौर उर्जेवरच धावणार असं नाही तर या बसमध्ये चालकाची गरजच नाहीये.

१०६ व्या ‘इंडियन सायंस काँग्रेस’ मध्ये ही बस सादर करण्यात आली. पूर्णतः प्रदूषणमुक्त असलेल्या या बसची किंमत जवळपास ६ लाख रुपये आहे. 

तसेच चालकाशिवाय ३० किलोमीटर प्रतितास वेगाने ही बस धावू शकते. तसंच चालकासह बस चालवण्याचा पर्यायही यामध्ये आहे. बसच्या मागील आणि पुढील बाजूला सेंसर लावण्यात आले आहेत. त्यामुळे मार्गात काही अडथळा असल्यास ही बस आपोआप थांबेल किंवा १० मीटर आधीच अलर्ट देईल.

एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर या बसने १० ते ३० प्रवाशांसह ७० किमीपर्यंतचा प्रवास करता येईल. नेव्हिगेशनसाठी जीपीएस आणि ब्ल्यूटुथचा वापर केला जातो. १० मीटरच्या परिसरातूनही या बसवर कंट्रोल करता येणं शक्य आहे.


मल्ल्या ठरला पहिला फरार आर्थिक गुन्हेगार
बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज थकवून भारताबाहेर पळालेल्या विजय मल्ल्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग कायद्यान्वये फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केले.

तर या कायद्यांतर्गत फरार घोषित करण्यात आलेला तो पहिला उद्योगपती आहे. आता ईडीला त्याची संपत्ती जप्त करता येईल.

नव्या कायद्यान्वये मल्ल्याला ‘फरार आर्थिक गुन्हेगार’ घोषित करण्यासाठी ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात अर्ज केला होता.



पोलावरम प्रकल्पासाठी आंध्रप्रदेशाला CBIP पुरस्कार मिळाला
पोलावरम प्रकल्पासाठी आंध्रप्रदेशाला ‘केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळ (CBIP) पुरस्कार’ मिळाला आहे.

गोदावरी नदीवर पोलावरम धरण हा बहुउद्देशीय प्रकल्प कमी वेळेत सर्वोत्तम अंमलबजावणी केल्यामुळे आंध्रप्रदेशाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. आंध्रप्रदेश राज्यासाठी पोलावरम प्रकल्प एक जीवनरेखा ठरत आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत ६४% काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत प्रकल्पावर १५३८०.९७ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

केंद्रीय सिंचन आणि वीज मंडळ (Central Board Of Irrigation And Power -CBIP) ही १९२७ साली भारत सरकारद्वारे उभारलेली एक प्रमुख संस्था आहे. ही संस्था वीज, जलस्त्रोत आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रातील संबंधित व्यवसायिक संस्था, अभियंता आणि व्यक्तींना समर्पित सेवा देते.



व्यवसाय सुलभतामध्ये आंध्रप्रदेश अग्रेसर
सिंगापूरच्या एशिया कॉम्पिटिटिव्हिटी इंस्टिट्यूट (ACI) या संस्थेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘इज ऑफ डुइंग बिझनेस निर्देशांक २०१८’ प्रमाणे, व्यवसाय सुलभतेत भारताच्या २१ राज्यांमध्ये आंध्रप्रदेश हे राज्य अग्रेसर ठरले आहे.

या क्रमवारीत आंध्रप्रदेशानंतर महाराष्ट्र आणि दिल्ली यांचा अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक आहे. ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ म्हणजे देशात व्यवसाय करण्यासाठी तयार केले जाणारे अनुकूल वातावरण.

हा निर्देशांक तीन घटकांवर आधारित आहे, ते आहेत – गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याची क्षमता, व्यवसायांमधील मित्रत्वाचे संबंध आणि स्पर्धात्मकतेसंबंधी धोरणे.

गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याच्या क्षमतेच्या बाबतीत आंध्रप्रदेश तिसऱ्या क्रमांकावर, तर व्यवसायांमधील मित्रत्वाचे संबंध या बाबतीत प्रथम क्रमांकावर आणि स्पर्धात्मकतेसंबंधी धोरणे या बाबतीत चौथ्या स्थानी आहे.


स्वच्छ भारत मोहीम अंतर्गत सात शहरांना ODF++ प्रमाणित केले
स्वच्छ भारत मोहीम (शहरी) अंतर्गत सात शहरांना ‘ODF++’ म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. ही सात शहरे आहेत – इंदौर, खारगाव, सहगंज, उज्जैन, भिलाई, राजनांदगाव आणि अंबिकापूर.

हागणदारी मुक्त संदर्भात दिल्या जाणार्‍या या प्रमाणीकरणाचा अर्थ असा होतो की, या शहरांमध्ये संपूर्ण मलमूत्र आणि सांडपाणी बाहेर टाकण्यापूर्वी वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते.हागणदारी मुक्त झालेली ही सात शहरे मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधील आहेत. 

ही शहरे ‘ODF++’ प्रमाणित होणारी पहिलीच शहरे आहेत. या शहरांमध्ये १००% मलमूत्र आणि सांडपाणी उपचारात्मक प्रक्रिया करूनच बाहेर टाकले जातात. कमीतकमी २५% समुदायिक आणि सार्वजनिक शौचालये सुस्थितीत आहेत.
सध्या १२ शहरांचे मूल्यांकन केले जात आहे, तर ५३३ शहरांनी हे प्रमाणिकरण मिळविण्यासाठी अर्ज केलेला आहे.



वन-डे सामन्यात ठोकले १३ षटकार मोडला जयसूर्याचा विक्रम 
निर्धारित षटकांच्या सामन्यात चौकार आणि षटकारांच्या माध्यमातून धावा जमवण्याकडे फलंदाजांकडे कल असतो. अशीच तुफानी खेळी श्रीलंकेच्या तिसरा परेराने खेळली. त्याने केवळ ७४ चेंडूंमध्ये १४०  धावा फटकावल्या. 

या खेळीत त्याने तब्बल १३ षटकार लगावले आणि दिग्गज क्रिकेटपटू सनथ जयसूर्या याचा विक्रम मोडीत काढला. जयसूर्याने एका सामन्यात सर्वाधिक ११ षटकार खेचत सर्वाधिक षटकार मारणारा श्रीलंकेचा खेळाडू म्हणून विक्रम केला होता. 



व्हेनेझुएलाच्या संसदेने राष्ट्रपती मदुरोच्या दुसऱ्या कार्यकाळाला अवैध ठरविले 
मे २०१८ मध्ये व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीपदी निकोलस मदुरो यांची पुन्हा एकदा सहा वर्षांसाठी निवड झाली. मात्र त्यांची ही निवड अवैध आहे, असे देशाच्या संसदेने ठरविले आहे. 

मदुरो यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला सुरुवात केली होती. नव्या निर्णयानुसार मदुरो यांच्याकडून १० जानेवारीपर्यंत राष्ट्रपती पदाची सूत्रे काढून घेतली जाणार आणि परिणामतः संसद (राष्ट्रीय सभा) हा लोकांचा एकमात्र वैध प्रतिनिधी आहे.

व्हेनेझुएला हा दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागातला एक देश आहे. काराकास ही देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. या देशाची राष्ट्रीय भाषा स्पॅनिश ही आहे. व्हेनेझुएलन बोलिव्हार हे राष्ट्रीय चलन आहे.
Scroll to Top