Homeupsczqdhsoftlinkmainmpscsitewp Contentuploads202006blogspotomaticcurrent Affairs.jpg5ef3663d7548a.jpg

चालू घडामोडी १७ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२०

खासगीरीत्या निर्मित पिनाका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी

19 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय भुदलाने पोखरणच्या चाचणी क्षेत्रात खाजगी क्षेत्रातल्या कंपनीने देशातच तयार केलेल्या सहा ‘पिनाका’ क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेतली.

भारतात पहिल्यांदाच, इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड (EEL) या खासगी कंपनीने ‘पिनाका’ क्षेपणास्त्र तयार केले आहे.

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत संरक्षण संशोधन विकास संस्थेनी (DRDO) कंपनीला पिनाका क्षेपणास्त्राच्या निर्मितीचे कंत्राट दिले होते.

आता शस्त्रास्त्रे आणि क्षेपणास्त्रांच्या निर्मितीसाठी संरक्षण दलाला आयुध निर्मिती मंडळ (ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड) या संस्थेवर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली ही संरक्षण संशोधन विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेली स्वदेशी बनावटीचे ‘मल्टी बॅरेल’ क्षेपणास्त्र प्रणाली आहे.

हे जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे गाइडेड क्षेपणास्त्र आहे.

‘पिनाका मार्क 1’ची मारक क्षमता 40 किलोमीटर, तर ‘पिनाका मार्क 2’ची मारक क्षमता 75 किलोमीटरपर्यंत आहे.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताचे सलग तीन विजय

भारताने ‘फिडे’ ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत पहिल्या दिवशी झिम्बाब्वे, व्हिएतनाम आणि उझबेकिस्तान यांना नमवत सलग तीन विजयांची नोंद केली.

भारताने पहिल्या लढतीत झिम्बाब्वेला 6-0 असे सहज हरवले.

मग व्हिएतनामवर 4-2 असा आणि उझबेकिस्तानवर 5.5-0.5 असा विजय मिळवला.

सलग तीन विजयांमुळे भारत आणि चीन यांनी प्रत्येकी सहा गुण कमावले आहेत.

‘हरित पथ’ ॲप: राष्ट्रीय महामार्गांवर वृक्षारोपणावर लक्ष ठेवण्यासाठी NHAIचे मोबाइल ॲप

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) ‘हरित पथ’ या नावाचे एक मोबाइल ॲप तयार केले आहे.

सर्व वृक्षारोपण प्रकल्पाच्या अंतर्गत प्रत्येक झाडाची जागा, वाढ, प्रजाती तपशील, देखभाल कार्ये, लक्ष्य आणि त्याच्या प्रत्येक कार्यक्षेत्राच्‍या कामगिरीचे निरीक्षण याविषयी माहिती साठविण्यासाठी या ॲपचा वापर करण्‍यात येणार आहे.

भारतातील तीन विमानतळं अदानी समूहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाने जयपूर, गुवहाटी आणि तिरुअनंतपुरम विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे कंत्राट अदानी उद्योग समुहाला देण्याच्या निर्णयाला मंजूरी दिली आहे.

सध्या भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे चालविल्या जाणाऱ्या देशातील या तिन्ही विमानतळांच्या देखभालीचा हक्क खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्वावर अदानी समुहाला देण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे.

मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजूरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्याचे फायनॅन्शीयल एक्सप्रेसने आपल्या वृत्तात म्हटलं आहे.

स्वच्छ सर्वेक्षण 2020

‘स्वच्छ भारत मिशन-शहरी’ या मोहिमेच्या अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’ या केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कल्याण मंत्रालयाने केलेल्या शहरी स्वच्छताविषयक पाचव्या वार्षिक सर्वेक्षण उपक्रमाच्या विजेत्यांना ‘स्वच्छ महोत्सव’ नावाच्या आभासी कार्यक्रमात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’मध्ये 4242 शहरांचे, 62 कटक मंडळांचे आणि 97 गंगाकाठी शहरांचे सर्वेक्षण केले गेले आणि यामध्ये 1.87 कोटी नागरिकांचा अभूतपूर्व सहभाग होता.

हे सर्वेक्षण अतिशय व्यापक स्तरावर राबवण्यात आले.

सर्वेक्षणाच्या पथकांनी 58,000 निवासी आणि 20,000 पेक्षा जास्त व्यावसायिक भागांना भेटी दिल्या.

इंदूर (मध्यप्रदेश) शहराने भारतातले सर्वात जास्त स्वच्छ शहर (दहा लक्षाहून जास्त लोकसंख्येच्या श्रेणीत) हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे.

मंत्रालयाच्यावतीने एकूण 129 पुरस्कारांचे वाटप करण्यात आले आहे.

10 लक्षाहून जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (प्रथम दहा): इंदूर, सूरत, नवी मुंबई, विजयवाडा, अहमदाबाद, राजकोट, भोपाळ, चंदीगड, जीव्हीएमसी विशाखापट्टनम, वडोदरा

1-10 लक्ष लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये (प्रथम पाच): अंबिकापूर, म्हैसूर, नवी दिल्ली, चंद्रपूर (एमएस), खारगोन

100 हून अधिक शहर संख्या असलेल्या राज्यांमध्ये (प्रथम तीन): छत्तीसगड, महाराष्ट्र, मध्यप्रदेश

100 हून कमी शहर संख्या असलेल्या राज्यांमध्ये (प्रथम तीन): झारखंड, हरयाणा, उत्तराखंड

गंगा नदी काठचे सर्वात स्वच्छ शहर – वाराणसी

भारतातली सर्वात स्वच्छ राजधानी – नवी दिल्ली

भारतातली सर्वात स्वच्छ छावणी – जालंधर छावणी मंडळ

भारतातले 40 लक्ष लोकसंख्या असलेले सर्वात स्वच्छ शहर – अहमदाबाद, गुजरात

पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन

पद्मविभूषण पंडित जसराज यांचं निधन. न्यू जर्सी येथे त्यांचं निधन झालं.

वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पंडित जसराज भारतीय शास्त्रीय संगीत पद्धतीतील मेवाती घराण्याचे गायक होते.

भारत सरकारने 2000 मध्ये संगीत क्षेत्रातल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौवरले होते.

पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला होता.

पंडित जसराज हे गेल्या 80 वर्षांपासून जास्त काळ संगीत क्षेत्रात कार्यरत होते.

राष्ट्रीय भरती संस्थेची स्थापना करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय भरती संस्था (NRA) याची स्थापना करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

केंद्रीय सरकारमधील पदांच्या भरती प्रक्रियेला एकात्मिक करण्यासाठी हा पुढाकार घेतला गेला आहे.

राष्ट्रीय भरती संस्थेची स्थापना संस्था नोंदणी कायद्याच्या अंतर्गत असणार आहे.

केंद्र सरकारमधले सचिव दर्जाचे अधिकारी संस्थेचे अध्यक्ष असणार.

या संस्थेत रेल्वे मंत्रालय, अर्थमंत्रालय / वित्तसेवा विभाग, कर्मचारी निवड आयोग, क्षेत्रीय ग्रामीण बँक आणि बँकिंग कार्मिक निवड संस्था (IBPS) यांचे प्रतिनिधी असणार.

सरकारने राष्ट्रीय भरती संस्थेसाठी (NRA) 1517.57 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तीन वर्षांमध्ये हा खर्च करण्यात येणार.

सामाईक पात्रता परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाणार.पदवी, 12 वी उत्तीर्ण आणि दहावी उत्तीर्ण अशा पातळ्यांसाठी वेगवेगळ्या सामाईक पात्रता परीक्षा असणार, जेणेकरुन विविध पातळ्यांवर वेगवेगळी भरती प्रक्रिया करता येणार.

नव्या राष्ट्रीय भरती संस्था (NRA) मार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मिळणाऱ्या गुणांच्या आधारावर सरकारी नोकरी देण्याची घोषणा मध्यप्रदेश सरकारने केली आहे. असा निर्णय घेणारा हा देशातला पहिला राज्य ठरला.

सत्यपाल मलिक: मेघालय राज्याचे नवे राज्यपाल

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सत्यपाल मलिक यांची मेघालय राज्याचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तिपूर्वी सत्यपाल मलिक गोव्याचे राज्यपाल होते.

मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’

भारतीय रेल्वे मणीपूरमध्ये इजाई नदीवर जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल’ बांधत आहे.

नोनी जिल्ह्यातल्या मारंगचिंग गावाजवळ डोंगराळ भागात इजाई नदीवर हा पूल बांधण्यात येत आहे.

पूलाची उंची 141 मीटर आहे, जी युरोपातल्या 139 मीटर उंचीच्या माला-रिजेका पूलापेक्षा अधिक आहे.

हा प्रकल्प जिरीबाम-तुपुल-इंफाळ BG लाइन प्रकल्पाचा एक भाग आहे, ज्याची एकूण लांबी 703 मीटर असणार.

केरळ प्रथमच ‘चतुर’ महोत्सव साजरा करणार

केरळ राज्यात प्रथमच ‘चतुर’ (ड्रॅगनफ्लाय नावाचा कीटक) महोत्सव साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाला ‘थंबिमहोत्सवम् 2020’ असे नाव देण्यात आले आहे.

हा कार्यक्रम सप्टेंबर 2020 या महिन्यात आरंभ होण्याचे नियोजित आहे. जानेवारी 2021 या महिन्यात होणाऱ्या ‘राज्य चतुर शिखर परिषदेत या कार्यक्रमाची सांगता होणार.

या काळात समाजातल्या विविध घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी कार्यक्रमांची मालिका सादर केली जाणार आहे. लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि त्यांचे निरीक्षण कौशल्य सुधारण्यासाठी ‘ड्रॅगनफ्लाय बॅकयार्ड वॉच’ नावाचा एक कार्यक्रम देखील जाहीर करण्यात आला आहे.

सोसायटी फॉर ओडोनेट स्टडीज आणि थंबिपुरनम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने WWF-इंडिया या संस्थेच्या केरळ शाखेच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

हा कार्यक्रम राष्ट्रीय जैवविविधता मंडळ, संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम, संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रम आणि IUCN-CEC या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने WWF इंडिया, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि इंडियन ड्रॅगनफ्लाय सोसायटी या संस्थांच्यावतीने संयुक्तपणे आयोजित केल्या जाणाऱ्या ‘राष्ट्रीय चतुर महोत्सव’चा एक भाग आहे.

Scroll to Top