चालू घडामोडी १ जानेवारी २०१८

चालू घडामोडी १ जानेवारी २०१८

देशात डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती पालिका प्रथम 
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत अ‍ॅपद्वारे तक्रारी नोंदवून प्रतिक्रिया देण्याबाबतच्या डायनॅमिक रँकिंगमध्ये भद्रावती नगर परिषदेने देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. असा मान मिळविणारे महाराष्ट्रातील हे पहिलेच शहर ठरले आहे.


भद्रावती नगरपालिकेच्या या प्रक्रियेमध्ये साडेचार हजार नागरिकांनी अ‍ॅप डाऊनलोड करून घेतले. त्यातील पावणेचार हजार नागरिक दररोज तक्रारी अपलोड करीत असून स्वच्छता अभियानात आपला सहभाग दर्शवीत आहेत. 

भद्रावती शहराची स्पर्धा छत्तीसगढमधील सरायपल्ली या २० हजार लोकसंख्येच्या शहरासोबत होती. १५ दिवसांपासून हे शहर प्रथम क्रमांक टिकवून होते. या काळात सरायपल्ली व भद्रावती शहरातील गुणांचा फरक हा पाच ते १० हजारांच्या दरम्यान होता. 

मात्र तीन दिवसांच्या सलग सुट्यांमध्ये भद्रावतीकरांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने २५ डिसेंबरला हा फरक केवळ १८० गुणांचा राहिला. अखेर त्यावर २७ डिसेंबरला भद्रावती शहराने सरायपल्ली शहरावर दोन हजार गुणांची आघाडी घेत प्रथम क्रमांक पटकाविला.



अटल इनोव्हेशन मिशनच्या दुसर्‍या टप्प्यास सुरुवात
निती आयोगाच्या ‘अटल इनोव्हेशन मिशन’ अंतर्गत सुरू केलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील १५०४ शाळांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये राज्यातील ११६ शाळांचा समावेश असून, निती आयोगाने नुकतीच या संबंधीची घोषणा केली.

निती आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ११ शाळांचा समावेश असून, मुंबई शहर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येकी १० आणि नाशिक जिल्ह्यातील ५ शाळा समाविष्ट आहेत.

सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार असून, विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात गेल्या वर्षी देशातील ९२८ तर, राज्यातील ७५ शाळांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता.



अंदमानाने प्रथम ध्वजारोहणाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा केला
३० डिसेंबर २०१७ रोजी अंदमान व निकोबार बेटे या केंद्रशासित प्रदेशात नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९४३ साली केलेल्या प्रथम ध्वजारोहणाचा ७४ वा वर्धापनदिन साजरा केला गेला.

३० डिसेंबर १९४३ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानच्या मदतीने अंदमान-निकोबार बेटांवर पहिल्यांदा भारताचा तिरंगा फडकवला होता आणि अंदमान-निकोबार द्वीपसमूहांना ब्रिटिश राजवटीपासून मुक्त म्हणू घोषित केले.



विश्वनाथन आनंदने जागतिक रॅपिड बुद्धिबळ स्पर्धा जिंकली
भारतीय विश्वनाथन आनंद हा सौदी अरबच्या रियाध शहरात खेळल्या गेलेल्या ‘जागतिक रॅपिड बुद्धिबळ अजिंक्यपद २०१७’ स्पर्धेचा विजेता ठरला आहे. ते हा किताब जिंकणारे सर्वाधिक वय असलेले (४८ वर्षे) खेळाडू ठरलेले आहेत.

आनंदने यापूर्वी २००३ साली रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचे जागतिक विजेतेपद पटकावले होते. त्याने रशियाच्या व्लादिमिर फेदोसिव्हवर मात करून जागतिक विजेतेपद पटकावले.



विश्वनाथन आनंदने जागतिक ब्लिट्ज बुद्धिबळ स्पर्धेत कांस्यपदक पटकावले
सौदी अरबच्या रियाध शहरात खेळल्या गेलेल्या ‘जागतिक ब्लिट्ज बुद्धिबळ विजेतेपद २०१७’ स्पर्धेत विश्वनाथन आनंदने कांस्यपदक पटकावले आहे.

विश्वनाथन आनंदने कांस्यपदकासाठी फ्रान्सच्या मॅक्सिम वाचियर लाग्रेव याचा पराभव केला. या स्पर्धेचे सुवर्णपदक नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसन याने तर रौप्यपदक रशियाच्या सरगेई कारजाकिन याने पटकावले.


जितू रायने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात राष्ट्रीय विजेतेपद पटकावले
केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये आयोजित ६१ व्या ‘राष्ट्रीय नेमबाजी विजेतेपद’ स्पर्धेच्या पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारचे विजेतेपद जितू रायने पटकावले आहे.

जितू रायने यात २३३ गुणांचा नवा राष्ट्रीय विक्रम स्थापन केला आहे. त्यापाठोपाठ ओमकार सिंहने रौप्य तर जय सिंहने कांस्यपदक पटकावले.


लष्कर संघात जितू राय, जय सिंह आणि ओमप्रकाश मिथेर्वाल यांनी १६५८ गुणांसह सुवर्णपदक जिंकले. त्यापाठोपाठ वायुदलाने रौप्य तर पंजाब संघाने कांस्यपदक जिंकले.



नेपाळची एव्हरेस्टवर एकट्याने चढाई करण्यास बंदी
नेपाळने पर्वतारोहींना एव्हरेस्ट आणि अन्य शिखरांवर एकट्याने चढाई करण्यावर बंदी आणलेली आहे.

शिवाय, दोन्ही पायांनी अधु आणि अंध पर्वतारोहींना चढाई करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे. पर्वतारोहण सुरक्षित बनविण्यासाठी आणि चढाई दरम्यान होणारे मृत्यू कमी करण्याकरिता नियमांमध्ये ही दुरूस्ती करण्यात आली.



संशोधक प्रतिभा गई यांना ब्रिटनचा ‘डेमहुड’ सन्मान
यॉर्क विद्यापीठामधील इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप विभागाच्या प्रमुख प्रा. प्रतिभा लक्ष्मण गई यांना रसायनशास्त्र व तंत्रज्ञान क्षेत्रातल्या त्यांच्या सेवेसाठी ब्रिटनची महाराणी एलिजाबेथ यांच्या हस्ते ‘डेमहुड’ सन्मानाने गौरविण्यात येणार आहे. 

प्रा. प्रतिभा लक्ष्मण गई यांनी एक असा मायक्रोस्कोप तयार केला आहे, ज्यामध्ये आण्विक पातळीवर रासायनिक प्रतिक्रियांना पाहता येते.

‘क्वीन्स न्यू इयर्स ऑनर्स लिस्ट २०१८’ या यादीत भारतीय वंशाच्या ३३ व्यक्तींचा समावेश आहे. यात ९ जणांना ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एंपायर’, १६ जणांना ‘मेंबर्स ऑफ द ब्रिटिश एंपायर’ आणि ७ जणांना ‘ब्रिटिश एंपायर मेडल’ तसेच कुलदीप सिंह भामरा यांना ‘क्वीन्स अॅम्बुलन्स सर्व्हिस मेडल’ जाहीर झाला आहे. ब्रिटनला दिलेल्या त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ हा गौरव देण्यात आला आहे. 

हे सर्व पुरस्कार २०१८ सालच्या वर्षभरात रॉयल कुटुंबाकडून दिले जातील. 

१९१७ साली स्थापन झाल्यापासून आतापर्यंत चार भारतीय वंशाच्या महिलांना ‘डेमहुड’ सन्मान देण्यात आला आहे. अन्य तीन मध्ये धारच्या महाराणी लक्ष्मी देवी (१९३१), शिक्षणतज्ज्ञ आशा खेमका (२०१४) आणि वैद्यकीय शिक्षक परवीण कुमार (२०१७) यांचा समावेश आहे.
Scroll to Top