लॉर्ड वेलस्ली

लॉर्ड वेलस्ली

लॉर्ड वेलस्ली

वेलस्लीचे भारत आगमन

०१. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती. पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापार्टचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते. १७९८ मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकला. तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता. यावेळी इंग्रजांची एकूण परिस्थिती कठीण होती.

०२. १८०१ मध्ये नेपोलियनने रशियाचा झार पॉल ह्याच्याशी करार करून भारत आक्रमणाची योजना बनविली. नेपोलियनच्या जमिनीवरच्या सामर्थ्याची कल्पना इंग्रजांना होती. त्यामुळे नेपोलीयनची वरील योजना सफल झाली असती तर भारतातील इंग्रजांचा व्यापारही समाप्त झाला असता. अशा परिस्थितीत १७९८ मध्येच लॉर्ड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.

०३. ‘Impossible is a word to be found in the dictionary of fools’ हे नेपोलियनचे आवडते वाक्य वेलस्लीला माहीत होते आणि त्याचा अर्थही तो जाणत होता. टिपू सुलतान नेपोलियनच्या संपर्कात होता आणि भारतातून इंग्रजांचे उच्चाटन करण्याच्या प्रयत्नात होता.

०४. नेपोलीयनची भारत आक्रमणाची योजना म्हणजे टिपूसाठी इंग्रजांना भारतातून नामशेष करण्याची सुवर्णसंधी होती. त्याने श्रीरंगपट्टणमला स्वातंत्र्याचा झेंडा फडकावून फ्रेंचाबरोबर आक्रमक व संरक्षणात्मक तह केला.

०५. १७९५ च्या खर्डा लढाईत मराठ्याकडून पराभूत झाल्याने निजामानेही इंग्रजांची साथ  सोडून दिली. त्यानेही फ्रेंचांशी आक्रमक व संरक्षणात्मक तह केला. फ्रेंच लष्करी अधिकारी रेमंड ह्याच्या मार्गदर्शनाखाली निजामाने आपले १४००० सैन्य प्रशिक्षित केले.

०६. महादजी शिंदेने काउंट डी बॉईन ह्या फ्रेंच अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ८००० घोडेस्वार व ८००० पायदळ तयार केले. पुढे डी बॉईन नंतर ते कार्य पेरॉनकडे आले. त्यात भर म्हणून रणजीतसिंहाने आपल्या पदरी फ्रेंच अधिकारी ठेवले. काबूलचा शासक झमानशाह ह्याच सुमारास भारतावर आक्रमण करण्याची तयारी करीत होता.

वेलस्लीचे प्रयत्न

०१. त्याने बंगालमधील इंग्रजांना युद्धकोषात धन जमा करण्याचे आवाहन केले. त्याने जमा झालेली १२०७८५ पौंड रक्कम इंग्लंडला पाठवली. ह्यावेळी नेपोलियनविरुद्ध युद्धात भाग घेण्याची इच्छा अनेक युरोपियनानी व्यक्त केली.

०२. भारताला नेपोलियनच्या प्रभावापासून वाचविण्याचा उत्कृष्ट मार्ग म्हणजे भारतीय राजामधील भांडणात कंपनीने मध्यस्थता करणे हे वेलस्लीने ओळखले होते. म्हणूनच वेलस्लीने फ्रांसच्या सर्व मित्रांना दडपण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठीच त्याने भारतीय राज्यांना तैनाती फौज स्वीकारण्यास भाग पाडले.

०३. निजामाकडे चौदा हजार व शिंद्याकडे चाळीस हजार फ्रेंच सेना असल्याचा प्रचार करुन त्याने तिचे पारिपत्य करण्यासाठी संचालकांकडून संमती मिळविली. सप्टेंबर १७९८ मध्ये वेलस्लीने सरळसरळ निजामाला धमकी दिली कि त्याने तैनाती फौज ठेवावी अन्यथा युद्धास तयार व्हावे. निजामासाठी हैद्राबादला इंग्रज अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली ६ पलटणी ठेवण्यात आल्या. त्यांचा खर्च निजामाने करावयाचा होता. परिणामी हैद्राबादमधील फ्रेंच प्रभाव समाप्त झाला.

०४. लॉर्ड वेलस्लीने लासवाडी आणि असराईच्या युध्दात दौलतराव शिंद्यांचाही पराभव केला. त्यानंतर वेलस्लीने आपले लक्ष टिपू सुलतानकडे वळविले. टिपूने तैनाती फौज ठेवण्यास नकार देताच वेलस्लीने फेब्रुवारी १७९९ मध्ये टिपूशी युद्ध सुरु केले.

०५. ह्यानंतर वेलस्लीने उत्तर भारत व मराठ्यांकडे लक्ष दिले. अवधला तैनाती फौज स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले. डिसेंबर १८०२ मध्ये पेशव्यांनी तैनाती फौज स्वीकारली पण हि गोष्ट न आवडल्याने शिंदे व भोसले यांनी इंग्रजांशी युद्ध केले. त्यात ते दोघेही पराभूत झाले. त्यांनी तैनाती फौज स्वीकारून आपल्याराज्यातील राज्यातील महत्वाचे प्रदेश इंग्रजांना दिले.

०६. गोव्याचे रक्षण करण्यासाठी त्याने पोर्तुगिजांच्या संमतीने गोव्यात इंग्रज फौज तैनात केली. इंग्लंड व डेन्मार्क ह्यांचे संबंध चांगले नसल्याने वेलस्लीने त्रीकोंबर व श्रीरामपूर ही डेन्मार्कची बंगालमधील केंद्रे जिंकून घेतली.

०७. गुजरात, मलबार, कटक असा तटीय प्रदेश घेऊन असे संरक्षणात्मक कवच निर्माण करावयाचे जेणेकरून भारतीय राज्यांना फ्रेंच मदत मिळू शकणार नाही. म्हणूनच टिपूशी तह करताना त्याने मलबार देण्याची अट घातली होती. गुजरातचे लष्करी महत्व जाणत असल्यामुळेच त्याने मराठ्यांशी युद्ध करताना भडोच, चंपानेर व पवनगड ही महत्वाची केंद्रे जिंकून घेतली. भडोच बंदरातूनच शिंद्यांना फ्रेंचाकडून सर्व प्रकारची मदत पुरविली जात असे. त्याचप्रमाणे कटक जिंकून वेलस्लीने बंगाल व मद्रास प्रदेश एकमेकांना जोडले आणि नागपूरच्या भोसल्यांचा फ्रेंचांशी संपर्क तोडून टाकला.

०८. १७९९ मध्ये वेलस्लीने मेहदीअलीखान नावाचा दूत इराणच्या शहाच्या दरबारात पाठविला. नोव्हेंबर १८०३ मध्ये जॉन माल्कमला बहुमुल्य भेटींसह इराणची राजधानी तेहरानला पाठविले. परिणामी शाहबरोबर झालेल्या तहात आपल्या देशात फ्रेंचांना येऊ न देण्याचे त्याने मान्य केले.

०९. डच लोक फ्रेंचांचे मित्र असल्यामूळे वेलस्लीने त्यांचा जावा व इतर बेटे जिंकून घेण्याचा आणि मॅारिशसवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. फ्रांसचा नाविक तळ असलेल्या मॉरिशसवर आक्रमण करण्याची वेलस्लीची योजना होती. परंतु इंग्लंडकडून स्पष्ट आदेश मिळाल्याशिवाय कारवाई करणार नाही अशी भूमिका एडमिरल रेनियर ह्याने घेतली. त्यावेळी डच फ्रांसचे मित्र असल्याने डच प्रदेश बटेव्हिया व केप कॉलनीवर आक्रमण करण्याची अनुमती वेलस्लीने मागितली. परंतु इंग्लंडकडून होकार मिळाला नाही.

१०. नेपोलियनविरुद्ध लढण्यासाठी १८०० मध्ये वेलस्लीने जनरल बेअर्डच्या नेतृत्वात एक फौज इजिप्तमध्ये पाठवली. लाल समुद्र पार करून आणि वाळवंट ओलांडून हे सैन्य भूमध्य समुद्राजवळ रोझेटा येथे पोहोचले. पण त्या आधीच फ्रेंच आक्रमण अपयशी ठरले होते. त्यामुळे हि फौज १८०२ मध्ये परतली.

११. नेपोलियन आणि इंग्लंडमधील १८०२ च्या अमिन्सच्या तहानुसार पोन्डिचेरी फ्रेंचाना परत मिळाले. या संधीचा फायदा घेऊन नेपोलियनने शिंद्याकडील फ्रेंच अधिकाऱ्यांच्या मार्फत मुगल सम्राट शाह आलम द्वितीयशी बोलणी सुरु केली. मुगल सम्राटावर फ्रेंच अधिकारी पेरॉनचे नियंत्रण होते.

१२. म्हणून वेलस्लीच्या आदेशानुसार १८०३ मध्ये जनरल लेकने दिल्ली व आग्रा जिंकून मुगल सम्राटाला आपल्या ताब्यात घेतले. मुगल सम्राट कंपनीच्या नियंत्रणात आल्याने त्याला काही पेन्शनही देण्यात आले.

१३. यानंतर होळकराने इंग्रजांशी युध्द सुरु केले. हे युध्द सुरु असतानाच वेलस्लीचा मायदेशीच्या सरकारशी मतभेद झाल्यामुळे त्याने १८०५ मध्ये आपल्या पदाचा राजीनामा दिला व तो मायदेशी निघून गेला. त्याच्या काळात इंग्रज सत्ता सर्वश्रेष्ठ सत्ता म्हणून भारतात उदयास आली होती.

वेलस्लीची कामगिरी

०१. १७९९ मधील चौथ्या इंग्रज मैसूर युद्धानंतर वेलस्लीने दक्षिण कॅनरा तटीय प्रदेश, वायनाड, कोइम्ब्तुर, दारूपुरम व श्रीरंगपट्टम जिंकून घेतले.

०२. १२ ऑक्टोबर १८०० रोजी निजामाशी झालेल्या संशोधित तैनाती फौज तहानुसार निजामाकडून कंपनीला बेल्लारी व कडप्पा जिल्ह्यांचा प्रदेश मिळाला.

०३. १० नोव्हेंबर १८०१ रोजी कंपनीने अवधच्या नवाबाला तैनाती फौज स्वीकारण्यास भाग पाडले. त्यावेळी झालेल्या तहानुसार कंपनीला रोहिलखंड, फर्रुखाबाद, मैनपूरी, इटावा, कानपूर, फतेहगड, अलाहाबाद, आजमगड, बस्ती आणि गोरखपूर जिल्ह्यांचा प्रदेश मिळाला.

०४. १८०३ मध्ये झालेल्या दुसऱ्या इंग्रज मराठा युद्धात कंपनीला उत्तर दोआबचा प्रदेश (गंगा व यमुनेच्या मधला प्रदेश), भडोच, अहमदनगरचा किल्ला आणि पूर्व तटावरील कटक ह्यांची प्राप्ती झाली.

०५. तंजावर (२५ ऑक्टोबर १७९९), सुरत (मार्च १८००) आणि कर्नाटक (३१ जुलै १८०१) ह्यांचे शासन वेलस्लीने आपल्या हाती घेतले.

लॉर्ड वेलस्लीचे धोरण

०१. नोकरांची कार्यक्षमता ही वेतनाप्रमाणेच प्रशिक्षणावरही अवलंबून असते. भारतात आलेल्या अनेक प्रशिक्षित युवकांची भरती कंपनीच्या प्रशासनात होत असे. अशा नोकरवर्गाच्या प्रशिक्षणासाठी लॉर्ड वेलस्लीने १८०४ मध्ये कॉलेज ऑफ फ़ोर्ट विल्यम नावाची संस्था कलकत्ता येथे स्थापन केली.

०२. कंपनीच्या वरिष्ठ जागेवर नियुक्ती होण्यापूर्वी इंग्रज तरुणांना या कॉलेजमध्ये तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत असे. कारण ब्रिटिश लोकांना भारतातील हिंदीभाषा, कायदे व इतिहास या विषयाची माहिती व्हावी.
०३. लॉर्ड वेलस्लीची ही योंजना संचालकांना पसंत पडली नाही. त्यामुळे ही संस्था बंद पडली. मात्र कंपनी संचालकांना नंतर लॉर्ड वेलस्लीच्या प्रशिक्षणाच्या योजनेचे महत्व समजल्याने कलकत्त्याऐवजी इंग्लडमधील हेलिबरी येथे १८०६ मध्ये ईस्ट इंडियन कॉलेज स्थापन केले.

 

०४. या कॉलेजमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा बोर्ड ऑफ कंट्रोल या मंडळाची शिफारस लागत असे. कंपनीच्या प्रशासनातील भरतीसाठी या कॉलेजमधील अभ्यासक्रम पूर्ण करणे सक्तीचे बनवले. यावेळी कंपनीच्या नोकरभरतीचा अधिकार कंपनी संचालकांकडे होता.

Scroll to Top