०१. १७५६ मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रांसमध्ये परत युद्ध सुरु झाले ते सप्तवर्षीय युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. यूरोपातील युद्धाची बातमी येताच क्लाइव्ह व वॉट्सन यांनी फ्रेंचांचे चंद्रनगर ठाणे घेतले. फ्रेंच सरकारने ताबडतोब काउंट लाली यास भारतात पाठवले. तो जवळजवळ १ वर्ष प्रवास करत एप्रिल १७५८ मध्ये भारतात येउन पोहोचला.
०२. त्याने १७५८ मध्ये पोंडीचेरीजवळील सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला. त्यानंतर मद्रास वगळता सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला. त्यानंतर त्याने तंजावर आक्रमणाचा आदेश दिला. कारण त्यापासून ५६ लक्ष रुपये देणे होते. परंतु ह्या मोहिमेत अपयश आल्याने फ्रेंच प्रतिष्ठेला धक्का पोहोचला.
०३. म्हणून लालीने मद्रासला वेढा घातला. परंतु इंग्रजांचे शक्तिशाली आरमार आल्याने त्याने हा वेढा उठविला. त्यानंतर लालीने बुसीला हैद्राबादहून बोलावून घेतले. पण हि त्याची चूक ठरली. त्यामुळे हैद्राबादला फ्रेंचांची स्थिती कमजोर झाली. फ्रेंच गवर्नर हैदराबादेत नसल्याचा फायदा घेऊन इंग्रजांनी उत्तर सरकारचा (कर्नाटकाचा काही प्रदेश) जिंकून घेतला. निजामही इंग्रजांना मिळाला.
०४. दुसऱ्या बाजूला पोकॉकच्या नेतृत्वात इंग्रज आरमारी तुकडीने डी एश च्या नेतृत्वाखालील फ्रेंच आरमारी तुकडीला तीन वेळा पराजित करून त्यांना भारतीय सागरातून जाण्यास बाध्य केले.
०५. १७६० मध्ये इंग्रज सेनानी सर आयरकुटने वान्दिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला. खुद्द बुसीला युद्धकैदी म्हणून पकडण्यात आले. युद्धातील या पराजयामुळे फ्रेंच पोंडीचेरीला परतले. पण इंग्रजांनी पोंडीचेरीलाच वेढा घातला. अखेर ८ महिन्यानंतर फ्रेंचांनी पोंडीचेरी इंग्रजांच्या स्वाधीन केले.
०६. लौकरच महत्वाचे माहे बंदर आणि १७६० मध्ये जिंजीचा किल्ला फ्रेंचांच्या हातून गेले. अशा प्रकारे कर्नाटकच्या तिसऱ्या युद्धात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाला. १७६३ च्या पैरिस तहाने सप्तवर्षीय युद्ध थांबल्यावर भारतातील संघर्षही समाप्त झाला. ह्या तहानुसार पोंडीचेरी व काही प्रदेश फ्रेंचाना परत मिळाला असला तरी त्याची किल्लाबंदी फ्रेंचाना करता येत नव्हती.
०७. तिसऱ्या युध्दात इंग्रजांना उत्तर सरकार प्रांतातील (तामिळनाडू, आंध्र व ओडीसा) मसुलिपट्टम व राज्समुन्द्री हि ठिकाणे घेता येउन निजामाशी स्वताच्या फायद्याचा तह करता आला.
फ्रेंचांच्या पराभवाची कारणे
०१. फ्रेंचांची युरोपातील महत्वाकांक्षा : फ्रेंच अधिपत्याखालील भारत व उत्तर अमेरिकेत कितीतरी जास्त प्रदेश होता. तरीही फ्रेंच सम्राटानी युरोप खंडात अधिक रुची दाखविली. परिणामी फ्रेंचाना भारत व उत्तर अमेरिकेतील प्रदेशांना मुकावे लागेल.
०२. दोन्ही देशातील प्रशासकीय फरक : फ्रेंच इतिहासकारांनी आपल्याच दोषपूर्ण शासन प्रणालीला जबाबदार धरले आहे. फ्रेंच सरकार पूर्णतः सम्राटाच्या व्यक्तीमत्वावर अवलंबून होते. उलट इंग्लंडमध्ये ह्यावेळी एक जागरूक अल्पतंत्र शासन करत होते. एकप्रकारे राजेशाही गणतंत्र नावारूपास येत होते.
०३. दोन्ही कंपन्यांची संघटनभिन्नता : फ्रेंच इस्ट इंडिया कंपनी म्हणजे फ्रेंच सरकारचा एक विभागच होता. कंपनीच्या एकूण भांडवलापैकी जवळजवळ ६०% भांडवल सम्राटाने लावले होते. कंपनीचे संचालक सम्राटतर्फे नियुक्त केले जात. याउलट इंग्रज इस्ट इंडिया एक खाजगी व्यापारी कंपनी होती. कंपनीच्या कारभारात विशेष असा हस्तक्षेप नव्हता. कंपनीच्या उत्कर्षात प्रशासनही रुची दाखवीत असे. १७३६ ते १७६५ या काळात फ्रेंच कंपनीने ११४.५ लक्ष पौंडचा माल विकला तर इंग्रज कंपनीने ४१२ लक्ष पौन्डचा माल विकला.
०४. आरमाराची भूमिका : युद्ध सुरु होताच (१७४६) फ्रेंच कंपनीला प्रारंभी सागरावर आणि नंतर जमिनीवर यश मिळाले. अर्थात इंग्रज आरमार निष्क्रिय होते तोपर्यंत डूप्लेला यश मिळाले. मात्र सप्तवर्षीय युद्धाच्या काळात इंग्रज आरमार एकदम सक्रिय झाले त्यामुळेच काउंट लालीला डूप्लेइतके यश मिळू शकले नाही.
०५. बंगालमधील इंग्रजांच्या यशाचा प्रभाव पडला. समृद्ध प्रदेश ताब्यात असल्याने त्यांना कर्नाटक युद्धप्रसंगी सर्व प्रकारची रसद मिळवणे सोपे झाले होते. याच्या उलट फ्रेंचांची अवस्था होती.
०६. नेतृत्वाची तुलना : व्यक्तिगत दृष्टीने पाहता डूप्ले व बुसी कमी नव्हते क्लाइव्ह, सोन्डर्स, लॉरेन्स पेक्षा. पण त्यांना क्लाइव्हप्रमाणे सैनिकांमध्ये जोश उत्पन्न करता आला नाही. काउंट लाली उग्र स्वभावाचा होता. ह्याउलट इंग्रजांकडे उत्कृष्ट लष्करी नेते होते व त्याचे सहकारीही कार्यकुशल होते.
०७. डूप्लेची जबाबदारी : नेतृत्वाचे गुण असूनही डूप्ले फ्रेंचांच्या पराभवाला जबाबदार ठरला. राजकीय कारस्थानामध्ये अधिक रुची दाखविल्याने ह्या युद्धातील अनेक बारकाव्याकडे डूप्लेचे दुर्लक्ष झाले. कंपनीच्या व्यापाराकडे व आर्थिक व्यवस्थेकडे त्याने पाहिजे तेवढे महत्वपूर्ण लक्ष दिले नाही. त्यामुळे फ्रेंचांचा व्यापार दिवसेंदिवस कमी होत गेला.
०८. इंग्रज व्यापारीदृष्ट्या व आर्थिकदृष्ट्या फ्रेंचापेक्षा वरचढ होते. इंग्रजांचा भारतातील व्यापार फ्रेंचापेक्षा तिपटीहून जास्त होता. इंग्रजांनी व्यापारावर अधिक लक्ष केंद्रित केले होते, प्रादेशिक लाभ त्यांनी दुय्यम मानला होता.
०९. रोबर्ट क्लाइव्ह सारख्या हुशार व कर्तबगार अधिकाऱ्यावर कंपनीच्या संचालकांनी त्याच्या चुका व दोष बाजूला ठेऊन त्याला सर्वप्रसंगी मदत केली. त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे नैतिक धैर्य वाढले व त्यांनी स्वतःला कामात झोकून दिले. इंग्रजांची फौज उत्तम प्रशिक्षित, शस्त्रसज्ज व शिस्तबद्ध होती. फ्रेंच फौज इंग्रजांच्या दर्जाची नव्हती.
इंग्रज फ्रेंच युद्ध – भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.