१८५७ चा उठाव – भाग २
१८५७ च्या उठावाची कारणे
राजकीय कारणे :-
०१. १६०० मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. व्यापार करणे हा कंपनीचा मुख्य हेतु होता. परंतु भारतातील अस्थिर राजकीय परिस्थितीचा फायदा घेऊन कंपनीने सत्ताविस्तारास सुरुवात केली. कंपनीच्या या राजकीय हस्तक्षेपामुळे ज्या संस्थानिकांच्या सत्ता नामशेष झाल्या ज्यांचे व्यापार, उद्योग बुडाले ते लोक असंतुष्ट झाले. कंपनीचे साम्राज्यवादी धोरण याला कारणीभूत होते.
०२. वेलस्लीने तैनाती फौजेच्या पध्दतीचा अवलंब करून साम्राज्य विस्तारावर भर दिला. वेलस्लीने अनेक संस्थाने बरखास्त केली. ब्रिटिशांची मुत्सद्देगीरी भेदनीती साम्राज्यवाद भारतीय संस्थानिकांना ओळखला आला नाही. परिणाम त्यांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्या. लॉर्ड वेलस्लीची तैनाती फौज हे दुसरे कारण होते.
०३. संस्थानांचे विलनीकरण आणि खालसा पध्दती हे सुद्धा महत्वाचे कारण ठरले. १८५७ पूर्वी डलहौसी या गव्हर्नर जनरलने आसाम, कूर्ग, सिंध, पंजाब व ब्रह्मदेशातील पेगू हे प्रांत हस्तगत केले होते. लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थाने खालसा केली. डलहौसीच्या या आक्रमक धोरणामुळे अनेक संस्थानिक दुखावले गेले, तर शिल्लक असणारे संस्थानिक भयभीत झाले.
०४. लॉर्ड डलहौसीने अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द करण्याचा सपाटा चालविला. मोगल सम्राट बहादूरशहा याचा बादशहा हा किताब व त्यास मिळणारी पेन्शन रद्द करण्याचा प्रयत्न केला. पेशवा दुसरा बाजीराव याचा दत्तक पुत्र नानासाहेब मिळणारी पेन्शन डलहौसीने बंद केली. इंग्रजांनी अनेक संस्थानिकांच्या पदव्या व पेन्शन रद्द केल्यामुळे त्यांची मने दुखावली गेली.
०५. कंपनीच्या भरभराटीसाठी लॉर्ड बेंटिकने अनेक योजना आखल्या होत्या. भारतातील अनेक संस्थानिकांनी लोकांना इनाम म्हणून जमिनी दिल्या होत्या. बेंटिकने अशा जमिनीची चौकशी करून ज्यांच्याकडे पुरावे नव्हते. त्यांच्या जमीनी काढून घेतल्या. अनेक जहागिरींची जप्ती केली. र्लॉड डलहौसीने जमिनींच्या चौकशीसाठी एक कमिशन नेमले. या कमिशनने पंचवीस हजार इनामी जमिनींची चौकशी करुन एकवीस हजार जप्त केले यामूळे लक्षावधी लोक नाराज झाले.
०६. कंपनी सरकारने बेन्टिकच्या काळात ठग आणि पेंढारी यांचा व समाजातील इतर गुंड लोकांचा बंदोबस्त केला होता. लुटालूट व दरोडेखोरी हा त्यांचा धंदा होता. त्यामुळे ते लोक ब्रिटिशावर अत्यंत संतप्त झाले. अशा वेळी संस्थानिकसुद्धा बंडखोरीच्या पावित्र्यात उभे होते. ब्रिटिशाविरुद्ध असे दोन्ही असंतुष्ट गट एकत्र आले व उठावाला जोर चढला.
आर्थिक कारणे :-
०१. १८ व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली. येथील कारखान्यांना लागणारा कच्चा माल भारतातून नेण्यात येऊ लागला व तयार झालेला पक्का माल भारतीय बाजारपेठेत आणून विकला जाऊ लागला. कारखान्यात तयार झालेला माल अत्यंत सुबक सुंदर व टिकाऊ होता. परिणामत भारतीय लघुद्योगातून यार झालेलया मालास उठाव राहिला नाही. इंग्रजांच्या व्यापारी धोरणामुळे येथील उद्योगधंदे बुडाले लक्षावधी कारागीरांवर बेकारीची वेळ आली.
०२. शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता. शेतकऱ्याना उत्पन्नाच्या २/३ हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता. दुष्काळाच्या परिस्थितीतही शेतसाऱ्यामध्ये सूट देण्यात येत नसे. याउलट वेळेवर कर न भरल्यास जमिनींचे जाहीर लिलाव केले जात. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड आर्थिक शोषण होऊ लागले. ब्रिटिशांनी शेती सुधारण्यापेक्षा कर वसुलीकडे अधिक लक्ष दिले. कराच्या ओझ्याखाली शेतकरी दबला गेला व असा शेतकरी ब्रिटिशांच्या विरोधात उभा राहिला .
०३. सरकारी अधिकाऱ्यानी जमीन महसूल कृषी उत्पनाच्या स्वरूपात घेण्याऐवजी रोख रकमेचा आग्रह धरला. शेतकऱ्याकडे रोख रक्कम नसल्याने शेतकऱ्यावर अन्याय अत्याचार करण्यात आले. मद्रासमधील सरंकारी निवेदनात म्हटल्यानुसार शेतसारा प्राप्त करण्यासाठी उन्हात उभे करणे, जेवण न देणे, फटके मारणे अशा शिक्षा दिला जात होत्या. जमीनदारांकडून वेळेवर जमीन महसूल न आल्यास जमिनी लिलावात काढण्याचा ‘लिलाव कायदा’ ब्रिटिशांनी लागू केल्यामुळे अनेक जमीनदार भूमिहीन होण्याची पाळी आली.
०४. कंपनीने भारताची आर्थिक लूट केली. भारतातील प्रत्येक प्रांत कोणत्या ना कोणत्या उत्पनासाठी प्रसिध्द होता. आसाम चहासाठी, महाराष्ट्र व गुजरात कापसासाठी, पंजाब व बंगाल धनधान्यासाठी प्रसिध्द होता. मात्र ब्रिटिशांनी भारतातील चहा, कॉफी, मसाल्याचे पदार्थ, खनिजे, लाकूड, इत्यादी माध्यमातून आपले साम्राज्य निर्माण केले होते. या साम्राज्याच्या रक्षणासाठी ब्रिटिशांना आपले लष्कर सतत सज्ज ठेवावे लागे. हा खर्च भारतीय तिजोरीतून दिला जाई.
सामाजिक – सांस्कृतिक कारणे :-
०२. भारतीयांच्या सामाजिक जीवनात बदल करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिकने अनेक कायदे पास केले. १८२९ मध्ये सती बंदीचा कायदा केला. त्याचप्रमाणे १८५६ साली विधवा पुनर्विवाह संमती कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा असे कायदे पास केले. ब्रिटिशांनी हे सर्व कायदे आपला धर्म व संस्कृती बुडविण्यासाठी केले आहेत. असे काही सनातनी भारतीयांना वाटू लागले.
०३. १८५० मध्ये ब्रिटिशांनी जातिभेद रद्द करण्याचा कायदा केला व या कायद्यानुसार वारसाहक्क व मालमत्ता हक्कामध्ये काही बदल केले. हिंदू वा मुस्लीम धर्मातर करुन ख्रिश्चन धर्मात गेला, तरी त्याचा वारसाहक्क व मालमत्ता प्राप्ती हक्क या कायद्यानुसार कायम राहणार होता. इंग्रजी अधिकाऱ्यानी सार्वजनिक दवाखान्यांतून स्त्रियांच्या पडदापद्धतीची उपेक्षा केल्यामुळे ते आपल्या चालीरीतींत ढवळाढवळ करीत आहेत, अशी लोकांची समजूत झाली.
०४. भारतात ब्रिटिशांनी पाश्चात्य शिक्षणव्यवस्था सुरु केली. देशभर ख्रिश्चन मिशनरी शाळा सुरु झाल्या. ब्रिटिशांच्या या धोरणामुळे भारतीय समाजरचना कोलमडेल असे लोकांना वाटू लागले. हिंदूंना उच्च पदाच्या जागा नाकारल्यामुळे सुशिक्षित वर्ग असंतुष्ट झाला. यामधून भारतीयांच्यात असंतोष निर्माण झाला.
०५. १८४३ मध्ये ब्रिटीश सरकारने हिंदी शिपायांना अफगाण युद्धासाठी पाठविले. हिंदी समाजाला हे आवडले नाही. युद्ध संपल्यावर हिंदी सैनिक परत आले मात्र त्यांना समाजाने स्वीकारले नाही.
धार्मिक कारणे
०१. कंपनीने आर्थिक सोबतच धार्मिक साम्राज्यवादाचाही पुरस्कार केला. १८१३ च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली. अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले. कंपनीच्या या धर्मप्रसारामुळे भारतीयांना असे वाटू लागले की इंग्रजानी आपला व्यापार उद्योग बुडविला आता इंग्रज आपला धर्मही बुडविणार.
०२. १८५६ च्या Religious Disabilities Act नुसार या काळात ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्याला वडिलोपार्जित संपत्तीत त्याचा हक्क मिळे. अनाथ बालकांना सेवा सुविधा देऊन ख्रिश्चन धर्माची दीक्षा दिली जाई. ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्याला नोकरीत सामावून घेतले जाई. जे नोकरीत असतील त्यांना बढती दिली जाई. ख्रिश्चन मिशनऱ्याच्या शाळांतून ख्रिश्चन धर्माची शिकवण व तत्वज्ञान दिले जाई. तुरुंगवास भोगणाऱ्या भारतीयाने ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास त्याची मुक्तता होई.
०३. कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सपैकी एक चेयरमन मैंगल्स याने पार्लमेंटमध्ये असे निवेदन केले कि, “भारताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत ख्रिश्चन धर्म विजयी करण्याचे महत्वकार्य, दैवानेच इंग्रजी साम्राज्यावर सोपविले आहे. यामुळे हिंदी समाज इंग्रजांकडे ‘धर्मबुडवे’ म्हणून पाहू लागला.
०४. इंग्रजांनी सुरु केलेल्या शाळांमध्ये सर्व धर्मांची, जातीपातीची मुले एकत्रच बसतात. त्यांना ख्रिश्चन धर्माची शिकवण दिली जाते. जात पात नष्ट केल्याने समाजात गोंधळ माजणार आहे, असे हिंदू लोकांना वाटू लागले. राम व रहीम यांना बदनाम करण्याचे काम इंग्रज मुलकी व लष्करी अधिकारी करत आहेत असे सावरकरांनी म्हटले. त्यामुळे असंतोष वाढला.
०५. कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतली. यामुळे धर्मगुरु व मौलवींची अप्रतिष्ठा झाली. यामुळे धार्मिक असंतोष वाढीस लागला.
लष्करी कारणे
०१. कंपनी सरकार व हिंदी सैनिक यांत बरेच दिवस तेढ निर्माण झाली होती. या उठावापूर्वी हिंदी सैनिकांनी १८०६ पासून १८५० पर्यंत वेलोर, बरेली, बराकपूर, जबलपूर, फिरोझपूर इ. ठिकाणी बंडे केली होती. हिंदी सैन्याच्या बळावर इंग्रजांनी आपली सत्ता बळकट करून साम्राज्यविस्तार केला होता. परंतु पदव्या व बक्षिसे मात्र इंग्रज अधिकाऱ्याना दिली जात. त्यातल्या त्यात ख्रिश्चन धर्मांतरित शिपायांना अनेक सोईसवलती दिल्या जात असत.
०२. हिंदी सैनिकांना दूरवरच्या आघाड्यांवर जाण्यासाठी दिलेला जादा भत्ता बंद केला होता. १८५७ च्या सुमारास ब्रिटिशांचे हात यूरोप, चीन आणि इराण येथील युद्धांत गुंतले असल्यामुळे कलकत्ता ते अलाहाबाद या प्रदेशात फक्त एकच यूरोपीय फलटण होती. मुख्य लष्करी ठाणी हिंदी सैन्याच्या हातात होती. कंपनी सरकारचे राज्य हिंदी सैन्यावर अवलंबून आहे, अशी समजूत लष्करात पसरली.
०३. त्यामुळे युरोपीय शिपायांचे वर्चस्व हिंदी शिपायांना सलत होते. भारतातील युरोपियन सैन्य वाढविण्याची मागणी डलहौसीने केली होती, परंतु त्यावेळी इंग्रज सैन्य क्रिमियन युद्ध व चीनमधील अफूचे युद्ध यात गुंतले होते. त्यामुळे डलहौसीची मागणी ब्रिटिशांनी पूर्ण केली नाही.
०४. १८३९-१८४२ च्या पहिल्या अफगाण युद्धात ब्रिटिशांना पराभव पत्करावा लागला. क्रिमियन व इराण युद्धातसुद्धा इंग्रजांना माघार घ्यावी लागली. त्यामुळे इंग्रज अजिंक्य आहेत या समजुतीला तडा गेला. हिंदी शिपायांच्या ताब्यात मोठा दारुगोळा व शस्त्रसाठा होता. शिवाय बराकपूर व दिनाजपुर हे दोन लष्करी तळ वगळता दिल्ली ते कलकत्ता या भागात इंग्रज शिपायांचा एकही मोठा तळ नव्हता. अशा परिस्थितीत ब्रिटिशावर मात करता येईल असे हिंदी शिपायांना वाटत होते.
०५. ब्रिटिशांनी हिंदी शिपायांवर निर्बध लादले. १८०६ मध्ये कायदा करुन हिंदी शिपायांवर गंध न लावण्याची व दाढी न ठेवण्याची सक्ती केली. हिंदू सैन्यात समुद्र पर्यटन केल्यास धर्म बुडेल अशी समजूत होती. लॉर्ड कॅनिंगने ‘सामान्य सेवा भरती अधिनियम’ पास केला. या कायद्यानुसार भारतीय सैन्याला समुद्र पार करुन विदेशात पाठविले जाणार होते.
०६. १८५२ साली ब्रह्मदेशाच्या युद्धासाठी शिपायांवर समुद्र पर्यटनाची सक्ती करण्यात आली. काहींनी परदेशात जाण्यास विरोध केला तेव्हा त्यांना नोकरीस मुकावे लागले, अनेकांना तर शिक्षा सुद्धा झाल्या. त्यामुळे पोटासाठी सैन्यात दाखल झालेल्या सैनिकांच्या धर्मभावना दुखावल्या गेल्या.
०८. संस्थान खालसा झाल्याने व तैनाती फौजेची पद्धत लागू केल्याने शेकडो सैनिक बेकार झाले होते. त्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच नष्ट झाल्याने त्यांच्यात असंतोष धुमसत होता. बंडाचा झेंडा उभारल्यास बेकारी नष्ट होईल व कदाचित सत्ताही प्राप्त होईल अशी आशा त्यांच्यात निर्माण झाली.
०९. १७५७ च्या प्लासीच्या लढाईनंतर शंभर वर्षे झाली. त्यामुळे इंग्रजांची शंभरी भरली तेव्हा ते नष्ट होणारच. अशी एक मानसिकता सामान्य जनांत पसरली व ब्रिटीश राजवट नष्ट करण्याचा उत्साह लोकांमध्ये पसरला.
१०. काडतूस प्रकरणामुळे हिंदी सैन्यामधील असंतोष पराकोटीस पोहोचला. १८५७ मध्ये इनफिल्ड नावाच्या नवीन बंदुका वापरात आणल्या. या बंदुकांना लागणाऱ्या काडतुसांचे सील गाई व डुकराच्या चरबीने बंद केले. या काडतुसांचा वापर करते वेळी त्यावरील सील सैनिकांना दाताने तोडावे लागे. गाय ही हिंदूना पवित्र, तर डुक्कर हे मुस्लिमांना निषिध्द.
११. काडतूस प्रकरणामुळे हिंदू मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्या. या प्रकरणाची माहिती वाऱ्यासारखी सर्व भारतीय सैनिकांना मिळाली. त्यांनी काडतूसे वापरण्यास नकार दिला. नकार देणाऱ्या शिपायांवर खटले भरण्यात आले. १० वर्षापर्यत त्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या. या सैनिकांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. त्यामुळे लष्करी छावण्यांमध्यील परिस्थिती अत्यंत स्फोटक बनत गेली आणि १८५७ च्या उठावाचा भडका उडाला.
१८५७ चा उठाव भाग-१ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
१८५७ चा उठाव भाग-३ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.