इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग १

इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग १

हैदर अलीचा उदय 

०१. १४ व्या शतकात विजयनगर साम्राज्य उदयास आले. म्हैसूरचा प्रदेश त्यात समाविष्ट होता. १५६५च्या तालीकोट लढाईत पराभूत झाल्याने विजयनगर साम्राज्य नष्ट झाले. १५६५ नंतर वोडीयार घराण्याची स्वतंत्र सत्ता या राज्यावर होती. 

०२. १८ व्या शतकात म्हैसूरमध्ये वाडियार घराण्याची सत्ता होती. पण राजा चिक्क कृष्णराज विलासी असल्याने राज्याची मुख्य सत्ता सेनापती देवराज आणि प्रधान नंजराज या दोन भावांच्या ही केंद्रित झाली. या पार्श्वभूमीवर हैदरचा उदय झाला . हैदरचा जन्म १७२२ मध्ये झाला. 


०३. म्हैसुरवर मराठ्यांची सतत आक्रमणे सुरु झाली. त्याचा सामना करण्यात म्हैसूरचे घराणे अपयशी ठरले. त्यामुळे १७६६ साली राजाच्या मृत्यूनंतर सर्वाना कैदेत टाकून हैदरअलीने म्हैसूरची सत्ता आपल्या हातात घेतली. त्याने बिदनूर, कॅनरा या प्रदेशाचा म्हैसूरमध्ये समावेश केला. त्यासोबतच बल्लारपूर, रायदुर्ग, चितळदुर्गच्या राजांना आपले मांडलिकत्व स्वीकारावयास भाग पाडले.

०४. हैदरने फ्रेंचांच्या मदतीने दिंडीगल येथे एक शस्त्रनिर्मितीचा कारखाना काढला व आपल्या सैन्याला पाश्चिमात्य पद्धतीचे युद्धशिक्षण दिले. १७६१ ते १७६३ या काळात त्याने हेस्कोत, दोडबेलापूर, शिरा इत्यादी ठिकाणे जिंकली. दक्षिणेतील पाळेगारानाही त्याने आपल्या नियंत्रणात ठेवले. त्यामुळे हैदरच्या नेतृत्वाखाली मैसूर दक्षिणेतील एक प्रबळ राज्य बनले.


०५. पेशव्यांनी म्हैसूरवर सतत हल्ले करून हैदरअलीला पराभूत केले व तेथून बराच प्रदेश व पैसा मिळविला. हैदरला चौथाई देण्यास भाग पाडले. पण १७७२ मध्ये झालेल्या पेशवा माधवरावच्या मृत्यूनंतर हैदरने १७७४ ते १७७६ दरम्यान आपला प्रदेश परत मिळविला शिवाय बेल्लारी, कडप्पा, गुत्ती, कर्नुल इत्यादी कृष्ण व तुंगभद्रेच्या खोऱ्यातील प्रदेश जिंकला. थोड्या काळानंतर त्याने पेशव्यांना चौथाई देण्यास बंद केले.





प्रथम इंग्रज म्हैसूर युद्ध (१७६७-१७६९)

०१. बक्सारच्या लढाईनंतर इंग्रजांना बंगाल, बिहार, ओरिसा हे प्रांत मिळाले. पण तेथे त्यांना प्रत्यक्ष प्रशासन करावे लागत नव्हते. कारण रॉबर्ट क्लाइव्हने त्या प्रांतात दुहेरी राज्यव्यवस्था लागू केली होती. बंगालनंतर इंग्रजांनी आपली नजर दक्षिणेकडे वळविली. 


०२. दक्षिण भारतात त्या वेळी मराठे, निजाम आणि हैदरअली अशा तीन प्रमुख सत्ता होत्या. या तीन सत्ता एकत्र आल्या तर आपला निभाव लागणार नाही हे इंग्रज जाणून होते.म्हणून इंग्रजांनी भेदनीती वापरली. निजामाला त्यांनी प्रादेशिक लाभाचे आमिष दाखवते. यामुळे निजामाने कधीच इंग्रजांविरुध्द संघर्ष केला नाही.


०३. १२ नोव्हेंबर १७६६ रोजी इंग्रज निजाम तहानुसार इंग्रजांनी निजामाला हैदरविरुद्ध मदत करावी मोबदल्यात इंग्रजांना उत्तर सरकारचा प्रदेश निजामाने द्यावा असे ठरले होते. हैदरचे मराठे तसेच कर्नाटक सोबतही भांडण होते. त्यामुळे हैदरविरुद्ध निजाम, मराठे, कर्नाटक नवाब व इंग्रज असा संघ निर्माण झाला. 


०४. १७६३ च्या सप्टेंबरमध्ये मराठ्यांनी निजामाला राक्षसभुवनच्या लढाईत पराभूत केले व त्यानंतर निजाम व मराठे यांच्यात मैत्रीचे संबंध प्रस्थापित झाले. पेशवा माधवरावाचेही निजामाशी सख्य असल्याने हैदरअलीने मराठ्यांशी तह केला व निजामाला ब्रिटिशांच्या गोटातून फोडले. मुत्सद्देगिरीने हैदरने ३५ लाख रुपये चौथाई देण्याचे मान्य करून मराठ्यांना शांत केले व प्रदेशाचे आमिष देऊन निजामाला आपल्याकडे वळवले. 


०५.  ब्रिटिशांना हे वृत्त कळेपर्यंत निजाम व हैदरअलीच्या संयुक्त फौजांनी इ.स. १७६७ च्या सुरूवातीला कर्नाटकात स्वारी करून कावेरीपट्टणमला वेढा दिला. हैदरने कर्नाटकवर आक्रमण केल्याने प्रथम इंग्रज म्हैसूर संघर्ष सुरु झाला. 


०६. इंग्रज फौजांनी जोसेफ स्मिथच्या नेतृत्वाखाली म्हैसूरवर हल्ला केला. काही काळ इंग्रज सेनापती स्मिथने हैदरला रोखून धरले पण हैदरने आक्रमक धोरणाचा अवलंब करून इंग्रजांना आपल्या तलवारीचे पाणी पाजले. निजाम व हैदर अली यांनी इंग्रजांवर हल्ला करून तिरूवन्नामलई व चंदगामा येथे कर्नल स्मिथचा १७६७ मध्ये पराभव केला


०७. स्मिथ वूडच्या फौजेला त्रिनोम्मली येथे जाऊन मिळण्यास निघाला. हैदरअलीला ही खबर मिळताच त्याने चंगमा येथे स्मिथच्या फौजेला अडविले. तेथे अटीतटीच्या झालेल्या युद्धात हैदरअली व निजामाच्या संयुक्त फौजेचा पराभव झाला. त्याननंतर स्मिथ आणि वूडच्या सेना त्रिनोम्मली येथे एकत्र आल्या व त्यांनी २६ सप्टेंबर १७६७ रोजी हैदरअली व निजामाच्या फौजांचा परत एकदा दारूण पराभव केला. 

०८. मुसळधार पावसामुळे हैदरअलीला युद्धभूमीवरून माघार घ्यावी लागली. ब्रिटिशांनीही त्यांच्या फौजा मागे घेतल्या. यानंतर फेब्रुवारी १७६८ मध्ये ब्रिटिशांनी निजामाला परत आपल्या गोटात ओढले. मार्च १७६८ मध्ये हैद्राबादच्या निजामाला पराभवाचे वृत्त कळाले व त्याने हैदरशी संबध तोडले आणि इंग्रजांशी मसुलीपट्टमचा तह केला.



०९. तहान्वये निजामाने पूर्वी इंग्रजांशी केलेल्या तहातील अटींची अंमलबजावणी करण्याचे मान्य केले आणि हैदर अलीस म्हैसूरवर राज्य करण्याचा अधिकार नाही म्हणून ते राज्य इंग्रजांनाच मिळावे अशी भूमिका जाहीर केली. त्याचप्रमाणे म्हैसूर जिंकण्यासाठी इंग्रजांना सहकार्य करण्याचे निजामाने मान्य केले. 


१०. निजाम सोडून गेला तरी हैदरने युद्ध सुरूच ठेवले. त्याने इंग्रजांचा पराभव करून मंगलोर जिंकले. या युद्धात इंग्रजांच्या बऱ्याच तोफा हैदरला मिळाल्या. मार्च १७६९ मध्ये हैदरअली थेट मद्रासपर्यंत पाच मैलांच्या परिसरात गेला व तेथील ब्रिटिश फौजेला त्याने युद्धाचे आवाहन दिले. 


११. हैदरअलीच्या अचानक हल्ल्याने ब्रिटिश भयभीत झाले आणि त्यांनी हैदरअलीशी सामना करण्याऐवजी त्याच्यापुढे तहाचा प्रस्ताव ठेवला. भयभीत होऊन ४ एप्रिल १७६९ रोजी इंग्रजांनी हैदरशी मद्रास तह केला. त्यानुसार परस्परांचे जिंकलेले प्रदेश परत करण्यात आले व संकटसमयी एकमेकांना मदतीचे आश्वासन देण्यात आले.



‘इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग २’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

‘इंग्रज म्हैसूर युद्धे – भाग ३’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Scroll to Top