संसदीय प्रश्नोत्तराचा तास

संसदीय प्रश्नोत्तराचा तास

०१. संसदेच्या दोन्ही सभागृहाचा पहिला तास हा प्रश विचारणे व उत्तर देणे यासाठी उपलब्ध असतो.  या तासात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मंत्री देतात. प्रश्नांची नोटीस सदस्याने लिखित स्वरुपात महासचिव यांना संबोधून द्यावी लागते. 



०२. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मंत्रालयाची विभागणी पाच गटांत करण्यात आली आहे. अ, ब, क, ड, इ या गटातील मंत्र्यामार्फत अनुक्रमे सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार या दिवशी उत्तरे दिली जातात. 





प्रश्नांचे प्रकार
०१. तारांकित प्रश्न (Asterisk Question)
– या प्रश्नांच्या सुरवातीला * असे चिन्ह असते म्हणून यांना तारांकित प्रश्न म्हणतात. अशा प्रश्नांची उत्तरे तोंडीच दिली जातात. 
– ज्या प्रश्नातून पुरवणी प्रश्न उद्भवू शकते असेच प्रश्न तारांकित प्रश्न म्हणून विचारण्याचे सदस्यांना सांगण्यात येते. 
– अशा प्रश्नांच्या उत्तरावर सदस्य उपप्रश्न (पुरवणी प्रश्न) विचारू शकतात. ज्या प्रश्नात केवळ आकडेवारीची मागणी केलेली असते असे प्रश्न तारांकित असू नये अशी अपेक्षा असते. 
– पीठासीन अधिकाऱ्यास वाटल्यास तो तारांकित प्रश्नाचे रुपांतर अतारांकित प्रश्नात करू शकतो. 


०२. अतारांकित प्रश्न
– या प्रश्नांवर * हे चिन्ह नसते. या प्रश्नांची उत्तरे तोंडी देता येत नाहीत. प्रश्नाचे उत्तर मंत्र्यामार्फत लिखित स्वरुपात प्रश्न काळाच्या शेवटी सभागृहाच्या पटलावर मांडून दिले जाते. तोंडी उत्तर द्यायचे नसल्याने या उत्तरांवर पुरवणी प्रश्न विचारले जात नाहीत. 
– आकडेवारीची मागणी करणारे, दीर्घ तपशिलाचा समावेश असलेले, स्थानिक महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश असलेले, प्रशासकीय तपशिलाचा समावेश असलेले इत्यादी प्रश्न सहसा अतारांकित असतात. 


०३. अल्प सूचनावधी प्रश्न 
– सर्वसाधारण प्रश्नांसाठी १० दिवसांची पूर्वसूचना आवश्यक असते. परंतु अल्पसुचनावधी प्रश्नांना त्यापेक्षा कमी दिवसांची सूचना दिली जाते. हे प्रश्न तातडीचे व सार्वजनिक महत्वाचे असतात. 
– पीठासीन अधिकाऱ्यांचा व संबंधित मत्र्यांच्या पूर्वसंमतीशिवाय कोणताही सदस्य कोणत्याही मंत्र्याला प्रश्न विचारू शकत नाही. आपल्याला असा प्रश्न विचारायचा आहे अशा अर्थाची सूचना सदस्याने संबंधित सभागृहाच्या महासचिवाला द्यावी. 
– ज्या दिवशी प्रश्नाचे उत्तर अपेक्षित असेल, त्या दिवसापूर्वी १० दिवसापेक्षा जास्त व २१ दिवसापेक्षा कमी अशा कालावधीत हि सूचना महासचिवांना मिळावयास हवी. 





प्रश्न कसे स्वीकारले जातात
०१. प्रश्न तथ्यावर आधारित असेल व एखाद्या विशिष्ट वर्गाशी वा संस्थेशी संबंधित (वैयक्तिक नसेल) तरच तो स्वीकारला जातो अन्यथा नाही. अभिकथनात्मक (तथ्याला धरून नसलेले आरोपात्मक प्रश्न) प्रश्न साधारणतः स्वीकारले जात नाही. 


०२. ज्या परराष्ट्राशी भारताचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत अशा राष्ट्रांबद्दल प्रश्नांमध्ये सौजन्यपूर्ण शब्द वापर्लील नसतील तर तसे प्रश्न स्वीकारले जात नाहीत. भारत सरकारचा ज्या बाबीशी संबंध नाही अशा बाबीसंबंधी प्रश नसावेत. 


०३. व्यक्तीविषयक प्रश्नही विचारायला परवानगी नसते. परंतु एखाद्या वरिष्ठ पदावरील व्यक्तीच्या संबंधात प्रश्न असेल किंवा तत्व वा धोरणासंबंधी प्रश्न उठविण्यात आला असेल तर तो स्वीकारला जातो. 


०४. ज्या प्रश्नात वादाचे मुद्दे असतात, अनुमान काढलेले असते, अवमानकारक कथन असते किंवा कार्यालयीन वा सार्वजनिक कामाबद्दलचा नाहीतर केवळ वैयक्तिक चारित्र्य वा वर्तनाचाच उल्लेख असतो व माहिती मागण्यापेक्षा माहिती देण्याकडे ज्या प्रश्नांचा कल असतो असे प्रश्न स्वीकारले जात नाहीत. 


०५. ज्याबद्दल पुरवणी प्रश्न उद्भवू शकतात. असे सार्वजनिक महत्वाचे प्रश्न हे तोंडी उत्तरासाठी निवडले जातात. अध्यक्षांना योग्य वाटेल त्याचप्रमाणे प्रश्न तोंडी किंवा लेखी उत्तरांकारिता ठेवणे हे अध्यक्षांच्या स्वेच्छाधिकारात असते. 


०६. लोकसभेच्या सदस्याने तारांकित व अतारांकित असे पाचपेक्षा अधिक प्रश्न विचारू नये. सदस्यांकडून राज्यसभेत तीनपेक्षा अधिक व लोकसभेत एकाहून अधिक प्रश्न एका दिवशी स्वीकारण्यात येऊ नये. 


०७. तारांकित प्रश्नांच्या एका दिवसाच्या सुचित २० पेक्षा अधिक प्रश्न नसतात. अतारांकित प्रश्नाच्या लोकसभेच्या सुचित दिवसाला जास्तीत जास्त २३० प्रश्न असतात. राज्यसभेत अशी मर्यादा ठरलेली नाही पण साधारणतः दिवसाला २०० पेक्षा कमीच अतारांकित प्रश्न असतात. 



प्रश्न कसे विचारले जातात
०१. ज्या दिवशी सदस्यांचा तारांकित प्रश्न स्वीकारण्यात आला त्या दिवशी अध्यक्ष / सभापती सदस्याला प्रश्न विचारावयास सांगतात. सदस्य आपल्या जागी उभा राहतो प्रश्नाचा मजकूर न उच्चारता फक्त प्रश्नाचा क्रमांक सांगतो व त्यानंतर मंत्री उत्तर देतात. 


०२. प्रश्नोत्तराच्या तासाला कोणत्याही प्रश्नावर व त्याच्या उत्तरावर वाद घालण्याची परवानगी नसते. परंतु दिलेल्या उत्तराबद्दल पुरवणी प्रश्न विचारण्याची मुभा असते. ज्या सदस्याच्या नावाने प्रश्न असेल त्याला असे दोन पुरवणी प्रश्न विचारता येतात. 


०३. अधिकाधिक तोंडी प्रश्नांना उत्तरे मिळावीत म्हणून प्रश्नोत्तराच्या तासात साधारणतः एका प्रश्नासाठी ८ मिनिटापेक्षा अधिक वेळ जाणार नाही याच्याकडे अध्यक्षांचे लक्ष असते. अध्यक्ष / सभापतींना वाटले कि उत्तर पुरेसे आहे तर ते सूचीतील दुसरा प्रश्न ज्याच्या नावे आहे त्या सदस्याला प्रश्न विचारावयास सांगतात. 


०४. प्रश्नोत्तराचा तास १२ वाजेपर्यंतच चालतो. राहिलेल्या प्रश्नांच्या बाबतीत त्यांची उत्तरे सभागृहाच्या पटलावर संबंधित मंत्र्यांनी ठेवली आहेत असे मानतात. अतारांकित प्रश्नांची उत्तरेही प्रश्नोत्तराच्या तासाला शेवटी सभागृहापुढे ठेवतात. 





गैर सरकारी सदस्यांचे प्रश्न
०१. प्रश्न जर अशा विधेयकासंबंधी वा ठरावासंबंधी किंवा सभागृहाच्या क्रमांकासंबंधी असेल तर त्या बाबींशी संबंधित असलेल्या गैरसरकारी सदस्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 


०२. लोकसभेत असे प्रश्न विचारण्याची वेळ क्वचितच येते. अशा प्रश्नाचं उत्तरावर पुरवणी प्रश विचारता येत नाही. अल्पावधी सूचना प्रश्न गैर सरकारी सदस्यांना विचारत नाहीत. 





शून्य तास 
०१. दोन्ही सभागृहातील प्रश्नोत्तराचा तास संपण्याच्या वेळेला शून्य तास म्हणतात. ‘शून्य तास’ हा सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुद्दे उपस्थित करण्याचे एक महत्वाचे साधन आहे. प्रश्न काल व दैनिक अजेंडा यातील काळ म्हणजे शून्य काळ होय. 


०२. संसदेच्या नियमावलीत किंवा कार्यपद्धतीत शून्य तासाचा कोठेच उल्लेख नाही. १९६० ते १९७० च्या दशकाच्या सुरवातीच्या वर्षात (१९६२ पासून) वृत्तपत्रांनी ‘शून्य तास’ हा शब्द प्रयोग सुरु केला. 


०३. तो दुपारी १२ वाजता म्हणजेच शून्यापासून सुरु होतो. पूर्वी तो दुपारी १ वाजता जेवणाच्या सुटीपर्यंत चालायचा. ७व्या व ८व्या लोकसभेत तो ५ ते १५ मिनिटेच चालायचा. ८व्या लोकसभेत या शून्य तासाने घेतलेला जास्तीत जास्त वेळ ३२ मिनिट आहे. 


०४. अल्पकाळ टिकलेल्या ९ व्या लोकसभेत (१९८९-१९९१) यात बदल झाला. त्यावेळचे अध्यक्ष रवी रे यांनी अर्धशून्य बनत चाललेल्या शून्य तासाला, खरोखर तास बनविण्याचा व त्याला त्याचे संस्थात्मक रूप देण्याचा प्रयत्न केला. परिणामी हा तास लांबू लागला नंतर तर कधी कधी हा तास २ तास चालायचा. 




‘संसद सदस्यत्वासाठी पात्रता व अपात्रता’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
‘संसद सदस्यांचे पगार व भत्ते’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
‘संसदेची अधिवेशने, तहकुबी व विसर्जन’ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
Scroll to Top